शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका या महायुतीत लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. परंतु ठाण्यात शिंदे सेनेबरोबर युती नकोच, अशी ठाम भूमिका आता स्थानिक पातळीवरील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका या महायुतीत लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. परंतु ठाण्यात शिंदे सेनेबरोबर युती नकोच, अशी ठाम भूमिका आता स्थानिक पातळीवरील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युतीची नकार घंटा वाजवली आहे.

संपूर्ण ठाण्यातील १८ मंडल अध्यक्षांनी आपली भुमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे मांडत स्वबळावर लढा अन्यथा आम्ही कामच करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. तसेच स्वबळाचा नारा देत दोनही पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना त्यादृष्टीने कामाला लागा, असे आदेश दिले होते. परंतु निवडणुकीच्या तोडांवर दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी महायुतीतच निवडणुका लढविल्या जातील, असे स्पष्ट केल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदार संघातूनच युती नको, अशी पहिली ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता ठाण्यातील भाजपच्या १८ मंडल आणि प्रांताध्यक्षांनी युती नको, अशी भावना व्यक्त केली आहे. या युतीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. युती न केल्यास कार्यकर्त्यांना निवडणूक लढायला मिळेल.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आता २०२६ मध्ये निवडणुक होत आहे. या मोठ्या कालावधीत अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडल्या आहेत. ठाण्यात भाजपची ताकद वाढली आहे, पक्षातील आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये गड मजबूत केले आहेत. ज्या प्रभागात भाजप कुठेही नव्हती, त्याठिकाणी मोठी फळी निर्माण झाली आहे. त्यात २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता आतापासूनच त्याची तयारी करणे अपेक्षित असल्याचे मत मंडल अध्यक्षांनी आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष संदीप लेले यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. त्यात मागील काही वर्षात मतांचा टक्का वाढलेला आहे. त्यात स्वबळावर लढल्यास पक्षाला वाढण्यास पोषक वातावरण मिळणार आहे. त्यात आता संधी मिळाली नाही तर आधीच आमची चार वर्षे वाया गेली आहेत, त्यात आणखी पाच वर्षे वाया जाणार आहेत. त्यामुळे युती न करता स्वबळावर लढावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आम्ही शिंदे सेनेचे काम करणार नाही, वेळप्रसंगी पदाचा राजीनामा देऊन घरी बसू, असा इशाराही देण्यात आला आहे.

पुढील निवडणुकीची तयारी गरजेची

२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. कारण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करत होते. त्यांना तिकीट न मिळाल्यास त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

ठाणेकरांनो लक्ष द्या; पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागणार

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे