ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एमएमआरडीएमार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
एमएमआरडीएमार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, कासारवडवली ते खारबाव खाडीपूल, कोलशेत ते काल्हेर खाडीपूल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल-मलवाहिन्यांचे स्थलांतरण यावर या बैठकीत चर्चा झाली.
गायमुख ते पायेगाव या खाडीपुलाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादन, सीआरझेड वनविभाग अधिक क्षेत्राचा विस्तृत आराखडा पंधरा दिवसांत तयार करण्यात यावा, असे निर्देश अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिले. घोडबंदर रोड आणि सेवा रस्ता एकत्रिकरण करण्याच्या प्रकल्पात महावितरणच्या वीज वाहिन्यांचे स्थलांतरण हे मोठे आव्हानात्मक काम असेल. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका यांनी पुढील आठ दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावे. तसेच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
१२.५९ हेक्टर जागेचे संपादन
ऐरोली ते कटाई नाका या उन्नत रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेसाठी भूसंपादन करण्याचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, तसेच या वाढीव भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ऐरोली ते कटाई या रस्त्यासाठी १२.५९ हेक्टर जागेचे संपादन ठाणे महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी मूळ प्रस्ताव २५३ कोटी रुपयांचा होता. त्यात वाढ होऊन आणखी जागा किती लागेल, तसेच त्याचा खर्च किती येईल, यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर, भूसंपादन आणि वाढीव खर्च या दोन्हींचे सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सुरक्षा अनामत रकमेबाबत सवलत
नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, वृक्ष कापणीसाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा अनामत रकमेत एमएमआरडीएला सवलत देण्यासाठी कायद्याचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उद्यान विभागाला दिले. त्याचप्रमाणे, बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन झाडे लावणे ही कामेही ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येतील. त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीएकडून दिला जाईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.