ठाणे : अनधिकृत शाळांविरोधात पालिकेच्या कारवाईचा बार फुसका निघाला आहे. अनधिकृत शाळाचालकांना ठोठावण्यात आलेला दंड भरण्यास शाळाचालक टाळाटाळ करत असून दंडाच्या एक टक्का रक्कम वसूल करण्यात देखील पालिकेच्या मालमत्ता विभागाला अपयश आले आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील ८१ अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्याने ३१ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आता ५० शाळा बंद करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुन्हा मोहीम उघडली आहे. परंतु असे असतांना महापालिकेने या अनधिकृत शाळांना ५२ कोटींचा दंड ठोठावला होता. त्यातील फक्त २ लाखांचीच वसुली करण्यात पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यश आल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार शहरात ८१ शाळा अनधिकृत शाळा असल्याची माहिती समोर आली होती. त्यातही यात सर्वाधिक ६५ शाळा या दिवा भागात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. ८१ अनधिकृत शाळांवर पालिकेने कारवाई करीत थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून ३२ शाळांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुसरीकडे ३१ शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येऊन येथील विद्यार्थ्यांचे आजूबाजूच्या शाळांमध्ये समायोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४५०० विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
या शाळांविरोधात दंडाची कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर ५२ कोटींचा दंड लावण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. हा दंड मालमत्ता कर स्वरूपात वसूल करण्यात यावा, असेही सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार मालमत्ता कर विभागाने वसुली सुरू केली असली तरी देखील आतापर्यंत केवळ २ लाखांचा दंड वसूल करण्यात यश आले आहे.
विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर कारवाई अवलंबून
शाळा बंद करीत असताना आता ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट कमी असेल, अशा शाळांवर पहिल्यांदा कारवाई करण्यात येत असून ज्यांचा पट अधिक आहे, त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचा दावाही शिक्षण विभागाने केला आहे.
५० शाळा बंद करण्याचे प्रयोजन
दिव्यातील महापालिकेच्या चार शाळा या दोन सत्रात सुरू करण्याचे प्रयोजन आखण्यात आले आहे. परंतु त्या ठिकाणी लागणारे अतिरिक्त शिक्षक कसे मिळविता येतील? याचे प्रयत्न आता शिक्षण विभागाने सुरू केले आहे. यासाठी दुसऱ्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक त्या ठिकाणी वळविले जाऊ शकतात, असेही सांगण्यात येत आहे. यापुढे जाऊन ८१ अनधिकृत शाळांपैकी ३१ शाळा बंद करण्यात आल्या असून ५० शाळा आता येत्या महिनाभरात बंद करण्याचे प्रयोजन आहे.