संग्रहित छायाचित्र 
ठाणे

ठाणेकरांची भिस्त टँकरवरच; पाणी समस्या सोडविण्यास पालिकेला अपयश

एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पाण्याचा दुष्काळ यामुळे ठाणेकरांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Swapnil S

अतुल जाधव/ ठाणे

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाप्रमाणेच ठाणे शहरातील घोडबंदर भागातील कावेसर, मानपाडा, कासारवडवली, वाघबीळ, ओवळा मोघरपाडा आणि आनंद नगर, शिवाई नगर तसेच आदी भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पाण्याचा दुष्काळ यामुळे ठाणेकरांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

ठाण्यातील सर्वात वेगाने विकास आणि उच्चभ्रू परिसर म्हणून घोडबंदर परिसराची ओळख आहे. या परिसरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून रहिवाशांना कधी कमी दाबाने तर कधी पाणीपुरवठाच होत नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी येथील रहिवाशांना टँकरच्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. येथील परिसराला रोजच्या रोज २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यात टँकरपासून सुटका मिळावी यासाठी वाढीव पाण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही घोडबंदरला वाढीव पाणी उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या समस्या तीव्र होत असताना, आता शहरी भागात देखील पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहे. ठाणे शहरासह घोडबंदर परिसराचा विस्तार झपाट्याने होत आहे. या भागात निवासी गृहसंकुलांचे मोठमोठे इमले उभे राहू लागले आहे. मात्र, ठाणे पालिकेला येथील गृहसंकलांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्याच्या घडीला ठाणे शहराला चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर भागातील इमारतींमधील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

पाण्यासाठी नागरिकांची प्रतीक्षाच

ठाणे महापालिकेने भातसा धरणातून १०० दशलक्षलिटर तर मुंबई महापालिकेकडून २० दशलक्षलिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. मुंबई महापालिकेने २० दशलक्षलिटर वाढीव पाणी देण्यास मंजुरी दिली होती. मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलिटर इतके पाणी देण्यासाठी जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली असून यामुळे या तिन्ही भागांना फायदा होऊ लागला आहे. मात्र, अद्यापही घोडबंदरप्रमाणे इतर नागरिकांना मात्र पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ठाणे शहरात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असून यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टँकरच्या माध्यमातून पालिकेची कमाई

घोडबंदर भागातील कावेसर, मानपाडा, कासारवडवली, वाघबीळ, ओवळा मोघरपाडा आणि आनंद नगर आदी भागात प्रतिदिन सुमारे २५ टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये १० ठिकाणी मोफत तर, १५ ठिकाणी एक हजार रुपये आकारून महापालिकेच्या माध्यमातून टँकर देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे घोडबंदरवासीयांना टँकरशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या