Thane : पाण्यामुळे बजेट बिघडले; टँकरच्या पाण्यासाठी ठाणेकरांना रोज ४४,५०० रुपयांचा खर्च प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Thane : पाण्यामुळे बजेट बिघडले; टँकरच्या पाण्यासाठी ठाणेकरांना रोज ४४,५०० रुपयांचा खर्च

अपुरा पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे ठाणे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यातील कपात, जलाशयांमधील मर्यादित पाणीसाठा आणि वाढती मागणी यामुळे नागरिकांना खासगी तसेच महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Swapnil S

फरियाल सय्यद/ठाणे

अपुरा पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे ठाणे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यातील कपात, जलाशयांमधील मर्यादित पाणीसाठा आणि वाढती मागणी यामुळे नागरिकांना खासगी तसेच महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी ठाणेकरांना रोज सामूहिकरीत्या ४४,५०० रुपयांहून अधिक खर्च करावा लागत आहे. महिन्याला हा अतिरिक्त आर्थिक भार सुमारे १३ लाख ३५ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

शहरातील पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या घरखर्चाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सुमारे २७ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराला चार जलस्रोतांमधून रोज ५९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेता हा पुरवठा अपुरा ठरत आहे.

घोडबंदर रोड परिसरातील एका रहिवाशाने सांगितले की, आठवड्यातून होणारी पाणीकपात आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठ्यामुळे टँकरचे पाणी घेणे ही आता गरज बनली आहे. नियमित महापालिका कर भरूनही पाण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत असल्याने मासिक घरखर्चावर मोठा ताण येत आहे.

पाणीटंचाईवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेने घरगुती वापरासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. साकेत येथील महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रातून रोज सरासरी ७५ टँकर शहरातील नऊ प्रभाग समित्यांमध्ये पाठवले जातात. यापैकी २० टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो, तर उर्वरित ५५ टँकरसाठी शुल्क आकारले जाते.

पाणीपुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाणीटंचाईच्या काळात टँकरचालकांकडून नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी महापालिकेने निश्चित दर लागू केले आहेत. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे मागितल्यास नागरिकांनी तत्काळ पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करावी. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

घोडबंदर रोडला अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा

घोडबंदर रोड आणि वर्तकनगर परिसरातून टँकरच्या पाण्याला सर्वाधिक मागणी आहे. घोडबंदर परिसरातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने मुंबई मनपाकडे रोज अतिरिक्त ५० एमएलडी पाण्याची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळू शकले. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अद्यापही पुरेशा पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

असे आहे टँकरचे गणित

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या दरांनुसार टँकरच्या पाण्याचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

वाहतुकीसह महापालिका टँकर: १० हजार लिटरच्या एका टँकरसाठी १,००० रुपये.

खासगी टँकर भरणा शुल्क : १० हजार लिटरच्या एका टँकरसाठी ७०० रुपये.

रोज ७०० रुपये दराचे ३५ टँकर आणि १,००० रुपये दराचे २० टँकर यांचा विचार करता नागरिकांना एकूण ४४ हजार ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महागाईचा 'घाऊक' भडका; चलनवाढ १२.२९ टक्क्यांवर, ऑक्टोबरमध्ये नवीन उच्चांक

फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा

असभ्यता म्हणजे अश्लीलता नव्हे! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; एअर इंडिया क्रू मेंबरला दिलासा

आरक्षणाच्या चक्राकार धोरणाविरुद्धची याचिका रद्द; नियमांच्या पुनर्विचारासाठी सरकारकडे अर्ज करा - सुप्रीम कोर्ट

Mumbai : पालिका शाळेचा भूखंडही खासगी संस्थेच्या घशात? चारकोपमधील जागा भाडेपट्ट्याने देण्यास काँग्रेसचा विरोध