ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबून आपत्तीजनक परस्थिती उद्भवत असते. तसेच नाल्याचे व गटाराचे पाणी घरात शिरण्याचे प्रकार देखील घडत असतात. अशी पाणी तुंबणारी ५८ ठिकाणे पालिकेने निश्चित केली असून या ठिकाणी आपत्कालीन परस्थिती उपाययोजन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणची माहिती तत्काळ मिळून तेथील परस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.
पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने वेळेत नालेसफाई व्हावी, यासाठी नियोजन आखले आहे. असे असले तरी, यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच आलेल्या अवकाळी पावसाने नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहे. अशातच नुकत्याच झालेल्या पावसाने ठाणे शहरासह ग्रामीण भागात दाणादाण उडवून दिली आहे. अशातच ठाणे शहरात जिल्ह्यातील इतर भागाच्या तुलनेत कमी पाऊस झाल असला तरी आगामी मान्सूनच्या काळात ठाणे शहरातील विविध भागात नाले व गटारे तुंबून पाणी साचण्याची शक्यता नाकरता येत नाही. यावर उपाययोजना आखण्यास ठाणे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून हालचाली सुरू केल्या आहेत.
त्यानुसार ५८ पाणी साचण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या प्रत्येक ठिकाणी पावसाळ्याच्या काळात एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. हा कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाल्यास, पंप बसविणे, नाल्यात पावसाळ्यात आलेला कचरा अडकल्यास तो बाजूला करण्यासाठी जेसीबी बोलाविणे अथवा आवश्यक मनुष्यबळ वापरणे, चेंबर चोकप होणे आदी कामे करण्यात येणार आहे. यामुळे पाणी साचून निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवर तत्काळ उपाययोजन करण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे.
पाणी तुंबणारी ठिकाणे
चिखलवाडी, रतनभाई कंपाऊंड, सुर्वेवाडी, भटवाडी, सम्राट नगर, हाजुरी, चेंदणी कोळीवाडा, कळवा येथील रेल्वे कल्वर्ट परिसर आदी ५८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात थोड्या प्रमाणत पाऊस झाला तरी, अनेक ठिकाणी पाणी साचत असते. अशी ५८ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याच्या मध्यातून तेथील परिस्थितीचा आढावा घेता येणार असून त्या ठाणी पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाल्यास तत्काळ उपाययोजन करण्यास मदत होणार आहे. - मनीष जोशी, उपायुक्त, ठामपा.