ठाणे

उल्हासनगर: चार्जिंग सुविधा उपलब्ध नसल्याने पहिल्याच दिवशी परिवहन बससेवा ठप्प; नागरिकांचा संताप

उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने रविवारी कोणतीही पूर्वतयारी नसताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात परिवहन सेवेचा घाईघाईने लोकार्पण सोहळा करण्यात आला. मात्र...

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने रविवारी कोणतीही पूर्वतयारी नसताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात परिवहन सेवेचा घाईघाईने लोकार्पण सोहळा करण्यात आला. मात्र सोमवारी पहिल्याच दिवशी चार्जिंगअभावी बस रस्त्यावर धावली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेच्या या भोंगळ कारभारावर सर्वत्र टीका होत आहे. तर उद्घाटन झाल्यावर पाहिल्याच दिवशी परिवहन सेवेला पनवती लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बससेवा सुरू करण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. शेवटी परिवहन बस सेवेचे रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिवहन सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख यांच्यासह महापालिका अधिकारी, विविध पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी बसमधून फेरफटका मारला. तसेच खासदार शिंदे यांनी बसची तिकिटे काढून सोमवारपासून नियमित बससेवा सुरू होणार असल्याचे जाहीर केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र सोमवारी महापालिका परिवहन बस रस्त्यावर उतरल्या नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांकडून संताप

शहाड डेपो येथे चार्जिंग स्टेशन बनविण्यात येणार आहे. मात्र त्या ठिकाणी अद्यापही विजेचे ट्रन्स्फार्मर बसवण्यात आले नाही. याशिवाय तिथे असलेल्या शौचालयात पाण्याची सुविधा नाही. बसच्या साफसफाई व दुरुस्तीसाठी रॅम बनविण्यात आला नसून बस धुण्याची कोणतीही सुविधा नाही. रिजेन्सी, उल्हासनगर रेल्वे स्टेशन पश्चिम आदी ठिकाणी बस डेपोच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. बस स्थानक तसेच बसचे मार्ग निश्चित करण्यात आलेले नाही. बससेवा सुरू करण्यापूर्वी कोणतीही तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली नसल्याने पालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. महापालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

"महापालिकेच्या सर्व बसेस ई-बस असल्याने, बसेसला मोठ्या प्रमाणात चार्जिंगची गरज असते, मात्र त्या क्षमतेचे चार्जिंग सुविधा उल्हासनगर महापालिका चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध नसल्याने बसची चार्जिंग झालीच नाही. त्यामुळे एक ही बस सोमवारी रस्त्यावर धावली नाही. पालिकेकडे असलेली चार्जिंग क्षमता पुरेशी नसल्याने, पुण्यावरून त्या अधिक क्षमतेची चार्जिंग मशीन मागवण्यात आली आहे." - अशोक नाईकवाडे, उपायुक्त उल्हासनगर महापालिका

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य