उल्हासनगर : ऐन नवरात्रोत्सवात उल्हासनगरमधील कौशलनगर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नळाला पाण्याचा थेंबही येत नसल्याने संतप्त महिलांनी पाण्यासाठी थेट महापालिका मुख्यालयावर धडक दिली. मात्र, तक्रार मांडण्यासाठी आलेल्या महिलांना सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावरच रोखल्याने त्यांच्या संतापात आणखी भर पडली. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा विभागाच्या सभापती दीपा नारायण पंजाबी यांच्याच प्रभागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने कौशलनगरमधील महिलांनी महापालिका मुख्यालय गाठत आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले.
कौशलनगरच्या नगरसेविका दीपा नारायण पंजाबी या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती आहेत. असे असतानाही त्यांच्या प्रभागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि त्यामुळे विस्कळीत होणारे दैनंदिन व्यवहार यामुळे रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.