ठाणे : अपंगांसाठी असलेल्या राखीव रेल्वे डब्यात विनापरवानगी घुसलेल्या महिला व पुरुषाने जागेवरून उठण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून महिला प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाणे ते पनवेलदरम्यान घडली. या वेळी संबंधितांनी तक्रारदार महिलेचा मोबाईल हिसकावून व्हिडिओ डिलीट करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ च्या कलम ९२ (अ) आणि ९२ (ब) अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपर येथील महिला शेअर मार्केट ट्रेडर असलेल्या तक्रारदार सोनाली तेरवणकर (४४) या १६ जुलैला रात्री एलटीटीहून तिरुनेलवेली एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होत्या. गाडी रात्री सुमारे ९.०९ वाजता ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ७ वर आल्यानंतर एक महिला आणि एक पुरुष अपंग नसतानाही अपंगांसाठी असलेल्या राखीव डब्यात चढले. तक्रारीनुसार, संबंधित पुरुषाने तेरवणकर यांना खिडकीजवळील जागेवरून उठवून स्वतः बसण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात करताच सोबतच्या महिलेने धमकी देत मोबाईल परत देण्यास नकार दिला. विरोध केल्यावर महिलेने त्यांच्या हातावर, पाठीवर मारहाण केली व मनगट ओरबाडल्याने त्यांना दुखापत झाली.
पनवेल स्थानकातून पसार
तेरवणकर यांनी रेल्वे हेल्पलाईन १३९ वर तक्रार नोंदवली. पनवेल स्थानकात संबंधित महिला व पुरुष चालत्या गाडीतून उतरून पसार झाले. रत्नागिरी स्थानकाबाहेरही ते दोघे पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरपीएफच्या मदतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला; मात्र, ते कारमधून पळून गेल्याचे तक्रारीत तक्रारदारांनी म्हटले आहे. त्या १८ जुलैला रत्नागिरीवरून आल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेज, पीडितेने चित्रीत केलेला व्हिडिओ आणि वाहन क्रमांकाच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.