नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर 
ठाणे

नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर

शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी मंगळवारी आक्रमक आंदोलन केले.

Swapnil S

शहापूर : शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी मंगळवारी आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरला. यावेळी महिलांनी पारंपरिक मंगळागौर खेळत एमएसआरडीसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.

विशेष म्हणजे माहिती देऊनही आंदोलन स्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यावेळी संतप्त महिलांनी आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार-खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का, असा सवाल करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

एमएसआरडीसी अंतर्गत सन २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य, चिखल आणि वाहतूककोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वारंवार निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

आमदार-खासदारांचे दुर्लक्ष

माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यावेळी संतप्त महिलांनी आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार-खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का, असा सवाल करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

...म्हणून अपघातांचा धोका वाढला

या महामार्गावरून शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी केला. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण होत असून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.

दखल न घेतल्याने आंदोलन

घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही अशी चिंता आता प्रत्येक कुटुंबाला वाटत आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि वाहतुकीची समस्या दूर करावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली. या आधीही महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मंगळागौरीच्या दिवशीच आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार सदानंद घुटे व पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

...तर आंदोलन अधिक तीव्र करू!

निर्धारित वेळेत काम सुरू न केल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल, असा इशारा चंद्रकला दुर्गे यांनी दिला. नडगाव, भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली, शेंद्रूण गावांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्या वेखंडे, अपर्णा खाडे, पुष्पा पानसरे, चंद्रकला दुर्गे, कमल रेरा, आशा मांजे, अनिता हरड, दर्शना भालके, सुनीता पवार, अनिता हरड, विजया बेलवले, हर्षला जागरे, सविता विशे, रेखा जागरे, जुही पवार, दीपिका भालके, वंदना हरड, भारती कदम, राधिका हरड, सारिका फर्डे आदी उपस्थित होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

कांदा एक्स्प्रेस आज दिल्लीत पोहचणार; ८०० टनाची पहिली खेप, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांची माहिती

...तर MSME चा निधी पुरवठा ठप्प होईल; ‘एफआयएसएमई’ची भीती; RBI चा NBFC च्या कर्जावर नियंत्रणाचा विचार

साखर किंचित ‘गोड’ झाली; कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घटून ५५ रुपयांवर