आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण विठ्ठलाच्या भक्तीत रमून उपवास करतात. उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ सात्त्विक आणि हलके असले तरी चवदार असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा वेळी बटाट्याची उसळ हा एक सोपा, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पदार्थ ठरतो.
बटाटा हा उपवासात सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. त्यात शेंगदाण्याचा कूट, तूप, जिरे आणि हिरव्या मिरचीची चव मिसळली की साधी उसळही खूप रुचकर लागते. ही उसळ दही, उपवासाची पुरी किंवा राजगिरा भाकरीसोबतही खूप छान लागते.
साहित्य
उकडलेले बटाटे - ३ ते ४
साजूक तूप - १ चमचा (किंवा शेंगदाणा तेल)
जिरे - अर्धा चमचा
हिरव्या मिरचीची पेस्ट - १ चमचा
भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट - २ ते ३ चमचे
चवीनुसार सैंधव मीठ
लिंबाचा रस - १ चमचा
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून त्यांची सालं काढा आणि मध्यम आकाराच्या फोडी करा.
कढईत तूप किंवा शेंगदाणा तेल गरम करून त्यात जिरे टाका.
जिरे तडतडल्यावर हिरव्या मिरचीची पेस्ट घालून काही सेकंद परता.
त्यानंतर बटाट्याच्या फोडी घालून हलक्या हाताने दोन मिनिटे परता.
आता शेंगदाण्याचा कूट आणि सैंधव मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या.
शेवटी लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
उपवासात कमी वेळात तयार होणारी ही बटाट्याची उसळ चवीसोबतच पोटभरही होते. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी नेहमीच्या पदार्थांऐवजी ही रेसिपी एकदा नक्की करून पाहा.