

मधुमेह (डायबिटीज) असलेल्या रुग्णांसाठी संतुलित आहार घेणं आणि काही पदार्थांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. चुकीच्या वेळी जेवण करणं किंवा जेवण टाळणं यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींनी नियमित वेळेला जेवण करणं गरजेचं असून जास्त साखर, चरबी आणि मीठ असलेले पदार्थ व पेये टाळावीत. त्याऐवजी नैसर्गिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मधुमेहींसाठी उपयुक्त असणारे काही अन्नपदार्थ -
फळं आणि भाज्या : यामध्ये जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात.
धान्याचे पदार्थ : पांढऱ्या ब्रेडऐवजी गव्हाची पोळी, ब्राउन राईस आणि ओट्स यांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.
प्रथिनयुक्त अन्न : कडधान्ये, डाळी, सुकामेवा, अंडी, कमी चरबीचं मांस आणि मासे आहारात असणे गरजेचे आहे.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले मासे : मॅकरेल (बांगडा), सॅल्मन यांसारखे तेलकट मासे खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
कमी साखर व कमी चरबीचे दुग्धजन्य पदार्थ : लो-फॅट चीज, साखर न घातलेली दही, सायीचे दूध मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते.
योग्य आहार आणि नियमित सवयी पाळल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणं शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.