फिटनेस, स्किनकेअर, करिअर… सगळ्यावर लक्ष देताना आपण हृदयाच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो? हृदयविकार ही फक्त वयस्क लोकांची समस्या असते, अशी समजूत होती. पण आता परिस्थिती वेगळी दिसत आहे. अवघ्या वीस-तीस वर्षांच्या तरुणांनाही हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर हृदयविकाराच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागतंय.
CARE हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स (हैदराबाद) येथील सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व रीजनल क्लिनिकल डायरेक्टर डॉ. एम. श्रीनिवास राव यांनी एचटी लाइफस्टाईलशी बोलताना या गंभीर परिस्थितीबद्दल इशारा दिला.
एचटी लाइफस्टाईलच्या वृत्तानुसार, डॉ. राव म्हणतात, “कामाचे लांब तास, ताण, अनियमित झोप, फास्ट फूड, उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्टेरॉल, मधुमेह, आनुवंशिकता, प्रदूषणाचा परिणाम आणि अधूनमधून धूम्रपान; या सगळ्यामुळे रक्तवाहिन्यांचे हळूहळू नुकसान सुरू होतं. बाहेरून माणूस फिट दिसला तरी आतल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक तयार होऊ शकतो. म्हणजेच रक्तवाहिन्यांवर चरबी, कोलेस्टेरॉल आणि कॅल्शियम यांचे थर साचू शकतात.”
वीस ते तीसच्या वयात आपण स्किनकेअर आणि फिटनेसवर जास्त लक्ष देतो, पण हृदयाकडे दुर्लक्ष होतं. प्रत्यक्षात सुरुवातीपासूनच जीवनशैलीत छोटे बदल केल्यास मोठा फरक पडतो. लिफ्टऐवजी जिने चढणं, रोज थोडा व्यायाम करणं अशा साध्या सवयी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फार महत्त्वाच्या ठरतात.
तरुण वयातच हृदयाची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देत, डॉ. राव यांनी या ५ सोप्या सवयी नियमित आचरणात आणण्याचा सल्ला दिला आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ५ सोप्या गोष्टी :
आहारावर लक्ष द्या: पालेभाज्या, ब्रोकोली, गाजर, संत्री, ओट्स, ब्राऊन राईस, सुका मेवा, बिया, ऑलिव्ह ऑईल आणि अवोकॅडो आहारात समाविष्ट करा. फास्ट फूड, जास्त साखर, प्रक्रियायुक्त स्नॅक्स आणि जास्त मीठ खाणं शक्यतो टाळा.
दर आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम: आठवड्यात किमान १५० मिनिटं वेगाने चालणं, सायकलिंग किंवा पोहणं असा व्यायाम आवश्यक आहे. त्याचबरोबर लिफ्टऐवजी जिने चढणं, थोडं जॉगिंग करणं यासारख्या छोट्या सवयीही हृदय निरोगी ठेवायला मदत करतात.
आरोग्य तपासण्या नियमित करा: रक्तदाब, कोलेस्टेरॉल, शुगर, वजन आणि कंबर यामधील बदल लक्षणं दिसण्याआधीच धोका दाखवतात. तरुणांना त्रास जाणवत नसला, तरी त्यांच्या धमन्यांवर ताण येत असतो. त्यामुळे वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे गरजेचे असते.
तणावावर नियंत्रण ठेवा: सततचा तणाव रक्तदाब वाढवतो आणि धमन्यांमध्ये सूज निर्माण करतो. योग, श्वसनाचे छोटे सराव किंवा दिवसातून १० मिनिटं मोबाईलशिवाय चालणे यांसारख्या सोप्या उपायांनी तणाव कमी करता येतो. तणाव व्यवस्थापन हे आहार आणि व्यायामाइतकेच महत्त्वाचे आहे.
धूम्रपान व मद्यपान टाळा: स्मोकिंग, व्हेपिंग, जास्त दारू पिणं हृदयाला मोठा धोका निर्माण करतं.
डॉ. राव सांगतात की, “हृदयविकार फक्त मध्यमवयीन लोकांसाठी थांबलेला नाही. त्यामुळे २० आणि ३० चं वय ‘मोकळेपणाने जगण्यासाठी’ म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उलट हाच काळ योग्य सवयी लावून घेण्यासाठी सर्वोत्तम आहे.”
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)