Holi Special : लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत

होळी आली की घरात गोडधोडाचा बेत ठरलेलाच असतो. पण पुरणपोळीचा विषय निघाला की अनेक जणींच्या कपाळावर आठ्या पडतात. कारण पुरण नीट बसत नाही, पोळी लाटताना फाटते किंवा शेवटी कडक होते. तर दुसरीकडे कटाची आमटी कधी पातळच होते...
लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत
लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

होळी आली की घरात गोडधोडाचा बेत ठरलेलाच असतो. पण पुरणपोळीचा विषय निघाला की अनेक जणींच्या कपाळावर आठ्या पडतात. कारण पुरण नीट बसत नाही, पोळी लाटताना फाटते किंवा शेवटी कडक होते. तर दुसरीकडे कटाची आमटी कधी पातळच होते, हवी तशी चव येत नाही.. प्रत्यक्षात हे पदार्थ अवघड नाहीत; फक्त काही टप्प्यांवर संयम आणि योग्य प्रमाण महत्त्वाचं असतं आणि ते जमलं तर हा पारंपरिक बेत सहज आणि परफेक्ट जमू शकतो.

चला तर मग या दरवर्षी येणाऱ्या समस्यांच निराकरण करण्यापूर्वी जाणून घेऊयात या पदार्थांसाठी लागणारं साहित्य

साहित्य (पुरणपोळी)

  • १ कप चणा डाळ

  • १ कप साखर

  • १/४ टीस्पून हळद

  • १ टीस्पून वेलची पूड

  • १/२ टीस्पून जायफळ पूड

  • २ कप कणिक

  • १/४ टीस्पून मीठ

  • २ टेबलस्पून तेल

  • साजूक तूप

लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत
Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!

साहित्य (कटाची आमटी)

  • डाळीचं काढलेलं पाणी

  • १ टेबलस्पून लाल तिखट

  • १ टेबलस्पून गोडा मसाला

  • २ टेबलस्पून खोबरं

  • १ टीस्पून जिरे

  • १ टीस्पून मोहरी

  • हिंग, हळद

  • चिंच आणि गूळ

  • कढीपत्ता

  • मीठ

कृती करताना लक्षात घ्या..

◉ पुरण तयार करताना -

पुरणाची सुरुवात योग्य शिजवलेल्या चणा डाळीपासून होते. डाळ २-३ वेळा धुऊन किमान २-३ तास भिजत ठेवा. त्यामुळे ती लवकर आणि मऊ शिजते. डाळ पातेल्यात किंवा कुकरमध्ये पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवा.

डाळ शिजल्यानंतर तिचं पाणी पूर्ण निथळून वेगळं ठेवा - हाच कट पुढे आमटीसाठी वापरायचा आहे.

शिजलेली डाळ कुस्करून त्यात तेवढ्याच प्रमाणात साखर घाला. पातेलं मंद आचेवर ठेवून सतत हलवत राहा. साखर विरघळून मिश्रण घट्ट होऊ लागलं की वेलची पूड आणि जायफळ पूड घाला. पुरण पातेल्याला चिकटेनासं झालं की गॅस बंद करा आणि पूर्ण थंड होऊ द्या.

महत्त्वाची गोष्ट: पुरण गरम असताना वापरू नका; थंड झाल्यावरच गोळे करा, म्हणजे पोळी फुटत नाही.

लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत
Thane : होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?

कणिक आणि पोळी लाटण्याची योग्य पद्धत

२ कप कणकेत चिमूटभर मीठ आणि २ टेबलस्पून तेल घालून सैलसर कणिक मळा. आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मऊ करा. कणिक किमान ३० मिनिटे झाकून ठेवा.

कणकेचा गोळा करून त्याची छोटी पारी करा. त्यात पुरणाचा साधारण समान आकाराचा गोळा ठेवून व्यवस्थित बंद करा. तांदळाच्या पिठात हलके घोळवून सावकाश लाटा. जास्त दाब दिल्यास पोळी फाटू शकते.

पोळी भाजताना

तवा मध्यम आचेवर गरम असावा. पोळी दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने भाजा. दोन्ही बाजूंनी साजूक तूप सोडल्यास पोळी अधिक मऊ आणि खमंग होते. जास्त भाजल्यास ती कडक होऊ शकते, त्यामुळे आच नियंत्रित ठेवा.

◉ कटाची आमटी – चवीचा खरा राज

डाळीचं काढलेलं पाणी पातेल्यात घ्या. त्यात १ टेबलस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून गोडा मसाला, चिंच, गूळ आणि मीठ घाला.

२ टेबलस्पून खोबरं आणि १ टीस्पून जिरे हलके भाजून बारीक वाटून आमटीत मिसळा.

कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करा. ही फोडणी आमटीवर घालून ७-८ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. आमटी थोडी आटली की चव अधिक खुलते.

लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत
Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय

होळीच्या दिवशी गरमागरम पुरणपोळीवर तूप सोडून, सोबत कटाची आमटी आणि थोडं दूध दिलं की सणाचा आनंद दुप्पट होतो. यंदा थोड्या संयमाने आणि या छोट्या टिप्स लक्षात ठेवून बघा - पुरणपोळी नक्कीच मऊ, सुगंधी आणि परफेक्ट बनेल.

logo
marathi.freepressjournal.in