

फॅटी लिव्हरचा आजार आता केवळ मध्यमवयीन किंवा ज्येष्ठांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हा आजार झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या मते, आता २० ते ३० वयोगटातील अनेक तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचे निदान होत आहे. भारतातील जवळपास प्रत्येक तिसरी व्यक्ती या समस्येने प्रभावित असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा टाइप-२ मधुमेह आणि इतर चयापचयाशी संबंधित आजारांपूर्वीच फॅटी लिव्हरची समस्या उद्भवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
तरुणांमध्ये फॅटी लिव्हर का वाढतोय?
आजची बैठी जीवनशैली हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तासन्तास बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, अनियमित जेवण, प्रक्रिया केलेले (Processed) अन्न, तणाव आणि अपुरी झोप यामुळे शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. परिणामी, यकृतात (लिव्हरमध्ये) चरबी साचू लागते.
विशेष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हरची कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना समस्या गंभीर होईपर्यंत याची कल्पनाही येत नाही.
फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?
दररोज चालणे, स्ट्रेचिंग करणे किंवा थोडाफार व्यायाम करणे.
दीर्घकाळ एकाच जागी बसणे टाळणे.
घरचे ताजे आणि संतुलित अन्न खाणे.
जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे.
वजन नियंत्रणात ठेवणे.
पुरेशी झोप घेणे आणि तणाव कमी ठेवणे.
नियमित आरोग्य तपासणी करणे.
वेळेत काळजी घेणे महत्त्वाचे
तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हर हा आता तरुणांमध्येही सामान्य होत चाललेला आजार आहे. मात्र, योग्य आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि नियमित तपासणी यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट न पाहता तरुणांनी आतापासूनच आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.