

आषाढी एकादशीच्या उपवासात बहुतेक घरांमध्ये साबुदाणा, बटाटा किंवा फराळाचे नेहमीचे पदार्थ बनवले जातात. मात्र याच पदार्थांचा कंटाळा आला असेल, तर यंदा उपवासासाठी राजगिऱ्याची सुकडी हा पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पर्याय नक्की करून पाहा.
राजगिरा हा ग्लूटेन-फ्री आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे उपवासात शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत होते. अवघ्या १० मिनिटांत तयार होणारी ही सुकडी चविष्ट तर आहेच, शिवाय बराच वेळ पोट भरल्यासारखेही वाटते.
उपवासासाठी राजगिऱ्याची सुकडी का ठरते उत्तम पर्याय?
उपवासाच्या दिवशी सतत साबुदाणा किंवा बटाट्याचे पदार्थ खाल्ल्याने काहींना अॅसिडिटी, जडपणा किंवा लवकर भूक लागण्याची समस्या जाणवू शकते. अशावेळी राजगिऱ्यापासून बनवलेली सुकडी हा उत्तम पर्याय ठरतो. राजगिरामध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक असल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनालाही मदत होते.
साहित्य
२ चमचे तूप
१ वाटी राजगिऱ्याचे पीठ
अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
चिरलेला सुका मेवा
१ वाटी गूळ
अर्धी वाटी पाणी
अर्धा चमचा वेलची पूड
कृती
सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यात राजगिऱ्याचे पीठ मंद आचेवर छान भाजून घ्या. पीठाला हलका सोनेरी रंग आला की ते वेगळे काढा. त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस हलका भाजून घ्या.
आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात गूळ आणि वेलची पूड घाला. गूळ पूर्णपणे विरघळून पाक तयार झाला की त्यात भाजलेले राजगिऱ्याचे पीठ आणि खोबऱ्याचा किस घालून पटकन एकजीव करा.
तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओता आणि वरून चिरलेला सुका मेवा पसरवा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर आवडीनुसार वड्या कापा. उपवासासाठी पौष्टिक आणि चविष्ट राजगिऱ्याची सुकडी तयार.
टीप
गुळाचा पाक तयार झाल्यानंतर मिश्रण लगेच एकजीव करणे महत्त्वाचे आहे. उशीर झाल्यास गुठळ्या होण्याची शक्यता असते.