

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि निर्णायक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित अनंतराव पवार यांचे आज (दि.२८) सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा भीषण अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह विमानातील ५ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या राजकारणात तीन दशकं दबदबा ठेवून असणाऱ्या या नेत्याच्या अकाली एक्झिटने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
२२ जुलै १९५९ रोजी जन्मलेल्या अजित पवार यांनी त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे पूर्ण केले. वडील अनंतराव पवार यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यामुळे पुढील शिक्षण पूर्ण न करता त्यांनी बारामतीमध्ये सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली.
सहकार चळवळीतून राजकीय प्रवासाची सुरुवात
महाराष्ट्रात "दादा" अशी ओळख असणारे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे होते. घरातील राजकीय पार्श्वभूमीमुळे राजकारणाबद्दलची आवड त्यांच्यात लहानपणापासूनच निर्माण झाली आणि त्याच दिशेने त्यांनी वाटचाल सुरु केली होती. कमी वयातच सहकार चळवळीतून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातून १९९१ पासून तब्बल ७ वेळा सलग आमदार म्हणून विजयी होत त्यांनी आपले स्वतंत्र राजकीय वर्चस्व निर्माण केले होते.
सहकार क्षेत्रातील घवघवीत पकड
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६ वर्षे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस कारखाने, दूध संघ आणि सहकारी संस्थांवर मजबूत पकड निर्माण केली आणि हीच त्यांची ताकद मानली गेली.
प्रमुख खात्यांवरील ठसा
अजित पवार यांनी राज्यातील जलसंपदा, ऊर्जा, ग्रामीण विकास, वित्त, सहकार या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळले होते.
सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख असलेले अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्री होते. सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.
२०१९ ची लक्षवेधी पहाट
२३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले, जे फक्त ८० तास टिकले होते. त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी निर्णायक पाऊल उचलत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि ते भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' हे नाव आणि 'घड्याळ' हे चिन्ह दिले.
स्पष्टवक्तेपणा आणि जलद निर्णयक्षमता
प्रशासकीय यंत्रणेत आणि अधिकाऱ्यांमध्ये अजित पवार यांची प्रतिमा 'झटपट निर्णय घेणारा नेता' अशी होती. 'कामात तडजोड न करणे, स्पष्टवक्ते, रोजची दिनचर्या सकाळी लवकर सुरु करणे, कार्यक्रमांना वेळेआधी हजर राहणे' हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
बारामती मतदारसंघ- राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू
सहकार चळवळीतून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास राज्याच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचला. या संपूर्ण वाटचालीत बारामती मतदारसंघ हा त्यांच्या राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू राहिला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व व नेतृत्वाला आकार देणारा घटक ठरला. बारामतीसाठी झटणाऱ्या अजित पवार यांचे निधन बारामतीमध्येच झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ ही दोन मुले आहेत. अजित पवार यांच्या निधनाने देशभरात विविध क्षेत्रांतून दुःख व्यक्त केले जात आहे.