विशेष
क्रांती गोडबोले-पाटील
काही मूर्ती पाहताना हात जोडले जातात; पण काही मूर्ती पाहताना त्या बाळाला अलगद कुशीत घ्यावंसं वाटतं. विशालदादा शिंदे यांच्या हातून साकारलेला बालगणेश असाच मनाला स्पर्शून जातो. गालावरची खळी, डोळ्यांतील निरागसता आणि हातातला मोदक घेऊन हसणारा हा बाप्पा म्हणजे केवळ कलाकृती नाही, तर एका कलाकाराच्या आयुष्यभराच्या साधनेतून जन्मलेलं देवाचं लाडकं बालरूप आहे.
एक तरी मोदक खा तू गणुल्या रे...
बाप्पा गणुल्या रे...
पार्वतीच्या गोलू मोलू सोनूल्या रे...’
गल्लीबोळातील स्पीकरवरून हे गाणं कानावर पडलं की, नजरेसमोर उभा राहतो तो भव्य मंडपात बसलेला धिप्पाड बाप्पा नाही, तर उघड्या अंगाने मातीत लोळणारा, हातातील मोदक तोंडाकडे नेणारा आणि गालावर सुरेख खळी पाडून गालातल्या गालात हसणारा एक लहानगा बालगणेश! आपण बालपणी आईच्या मांडीवर बसून जसे हट्ट करायचो, अगदी तसाच हट्ट करणारा हा गोजिरवाणा देव जेव्हा प्रत्यक्षात मातीत उतरतो, तेव्हा पाहणाऱ्याचे हात जोडले न जाता त्या बाळाला अलगद उचलून कुशीत घ्यावंसं वाटतं. प्रत्यक्षात जेव्हा हा अनुभव माझ्या वाट्याला आला तेव्हा मी पूर्णपणे भारावून गेले आणि ठरवलं की याबद्दल लिहायचंच. तर असे मोहक बालगणेश साकारणाऱ्या आणि चित्रकलेच्या कॅनव्हासवरून थेट शाडूच्या मातीत जीव ओतणाऱ्या विशाल शिंदे या एका अवलियाची ही गोष्ट.
आज ‘त्रिमूर्ती स्टुडिओ’ या नावाने विशालदादा अशा मोहक, गोंडस, लाडूल्या, लोभस मूर्ती ऑर्डरनुसार साकारतात. मूर्ती पाहताक्षणी काहीतरी वेगळीच अनुभूती येते आणि ती मूर्ती जिवंत वाटते. खरं तर तो करता करविता बाप्पाच, पण त्याने स्वतःला विशालदादांकडून असं काय घडवून घेतलंय, त्याला तोडच नाही.
विशालदादांच्या नावप्रमाणे त्यांचं कामही विशाल आहे. पण हे काम करताना विशालदादांना पाहणं म्हणजे सोने पे सुहागा. विशालदादांच्या कामात बारकाई, हुबेहुबपणा, बालरूपातील ती निखळ निरागसता एवढी भरभरून दिसते की, त्यांचं काम पाहताना आपणही नकळत त्या कामाशी समरस होऊन जातो. कसं जमतं ना हे? बरं यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? संयम लागतो. ज्ञान लागतं. विशालदादांनी हे सगळं कसं काय केलं असेल..? तर सांगते.
आटपाट नगर आहे त्यातील मुंबईच्या गिरणगावातील एका लहानशा चाळीत विशालदादांचं बालपण गेलं. वडील सूर्यकांत शिंदे ज्यांना सर्वजण प्रेमाने ‘नाना’ म्हणतात. ते मिल कामगार होते. मिलची कष्टाची नोकरी सांभाळून ते घरच्या घरी चाळीस-पन्नास गणपती बनवायचे. घरात सतत मातीचा दरवळणारा सुवास आणि बाप्पाचं घडणारं रूप. विशालदादांच्या आई सांगायच्या की, विशालदादा अगदी तीन-चार वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्या हातात माती खेळत होती. एकदा लहानपणी विशालदादांना प्रचंड ताप आला होता, तेव्हा त्यांना शांत ठेवण्यासाठी बाबांनी त्यांच्या हातात मातीचा एक गोळा दिला होता. त्या मातीच्या स्पर्शाने आणि बाप्पाच्या ध्यासाने चिमुकल्या विशालदादांच्या मनावर असं काही गारुड घातलं, की वयाच्या अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षी त्यांनी स्वतःच्या हातांनी ८ ते १० मूर्ती तयार करून लोकांच्या घरी पूजेसाठी पाठवल्या होत्या.
शाळेत असताना लेनवाला मॅडमसारख्या शिक्षकांनी त्यांच्यातील चित्रकाराची पारख केली. वयाच्या १४ व्या वर्षी, म्हणजे दहावीत असताना विशालदादांनी एक अद्भूत धाडस केलं होतं. कोणत्याही साच्याचा वापर न करता, थेट प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये त्यांनी शंकराच्या हातावर बसलेला, हातात डमरू घेतलेला पाच फुटांचा भव्य गणपती साकारला होता.
पण विशालदादांचं स्वप्न वेगळं होतं. त्यांना चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचं होतं. १९९६ ला दहावी झाल्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये BFA (पेंटिंग) साठी प्रवेश घेतला. तिथे जॉन्स फर्नांडिस आणि वासुदेव कामत यांच्या चित्रांचा त्याच्यावर खोल प्रभाव पडला. बरीच लोकं विचारायची, ‘शिक्षण पेंटिंगचं घेतलंस आणि मग मूर्तिकलेत कसा काय आलास?’ पण विशालदादांच्या मते, जे. जे. मधील पेंटिंगच्या अभ्यासक्रमामुळे त्यांना मानवी शरीररचना, प्रकाशाचा खेळ, रंगसंगतीचं जे ज्ञान मिळालं, त्याचाच उपयोग पुढे मातीकामात हुबेहूब जिवंतपणा आणण्यासाठी झाला.
२००२ मध्ये पास आउट झाल्यावर त्यांनी फ्रीलान्सर म्हणून कामं सुरू केली. २००७ मध्ये वांद्रे येथील एका अॅनिमेशन स्टुडिओमध्ये पार्श्वसंगीत व बॅकग्राउंड आर्टिस्ट म्हणून त्यांना तब्बल ५० हजारांची नोकरी मिळाली होती. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. वाटलं की आयुष्य सेट झालं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. २००८ मध्ये अमेरिकेत जागतिक मंदी आली, स्टुडिओचं काम ठप्प झालं आणि ७-८ महिने पगारच मिळाला नाही. अखेर ती नोकरी सोडावी लागली. आज मागे वळून पाहताना विशालदादा आवर्जून सांगतात की, “ती मंदी आली नसती आणि नोकरी टिकली असती, तर मी आज एखादा चांगला पगारदार कर्मचारी म्हणून जगलो असतो; बाप्पाचा हा लाडका रूपकार कधीच बनू शकलो नसतो.”
नोकरी सुटली आणि विशालदादा पुन्हा आपल्या मुळाकडे म्हणजे मातीकडे वळले. चाळीत राहताना गल्लीत खेळणारी लहान मुलं विशालदादा यांच्या नजरेत भरत होती. एखादं मूल गोट्या खेळताना कसं बसतं? मातीत खेळताना त्याचा पोश्चर कसा असतो? हीच लहान मुलांची सहजता त्यांनी बाप्पाच्या रूपात आणायचं ठरवलं. लहान मुलं जशी खेळतात, तसा जर गणपती खेळत असेल तर तो कसा दिसेल? विशालदादा ते कागदावर स्केच करायचे आणि मग मातीत उतरवायचे. तिथूनच ‘बालगणेशा’च्या संकल्पनेचा जन्म झाला.
मोदक लपेटून बसलेला, कमळाच्या पानावर झोपलेला, वाघाच्या पिल्लाशी खेळणारा किंवा पार्वतीच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकणारा, उंदरावर बसून गालावर खळी पडलेला हसणारा बाप्पा लोकांसमोर आला आणि महाराष्ट्राने या रूपावर उदंड प्रेम केलं.
वडील सूर्यकांत शिंदे, मोठा भाऊ सुनील आणि लहान भाऊ भूषण या तिघांच्या साथीने ‘त्रिमूर्ती स्टुडिओ’चा जन्म झाला. तीन भावांची ताकद आणि वडिलांचे आशीर्वाद यामुळे हे नाव घराघरांत पोहोचलं.
२०१० मध्ये विशालदादा यांनी आणखी एक धाडसी प्रयोग केला होता-‘गजमुख’. गणपतीचे वर्णन आपण ऐकतो की, गजाचं शिर आणि मानवाचं शरीर. पण बाजारात मिळणाऱ्या मूर्तींमध्ये टिपिकल मुकुट आणि सोन्याचे दागिने असायचे. विशालदादा यांनी थेट हत्तीचे मूळ स्वरूप, कानाची नैसर्गिक घडी, डोळ्यांमधील सात्विकता आणि गुलाबी रंगाचे स्पॉट्स असणारा ‘गजमुख’ साकारला. लोकांना हा प्रयोग विसंगत वाटू नये म्हणून त्यांनी पहिली मूर्ती स्वतःच्या घरच्या गणपतीसाठी बनवली होती. जेव्हा ती मूर्ती समोर आली, तेव्हा लोकांनी डोकं टेकवलं. “अरे, हे तर बाप्पाचं मूळ, शाश्वत रूप आहे!” अशी पोचपावती मिळाली. गेल्या १४ वर्षांत एकही वर्ष असं गेलं नाही, की गजमुखाची मागणी आली नाही.
त्यांच्या कामातलं खास वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाचा जवळ बसणारा पांढरा उंदीर. पण मग बाप्पाच्या जवळ बसणारा उंदीर काळा सोडून पांढरा का?
यामागेही एक रंजक कथा आहे. एका रिसर्च कामासाठी विशालदादा वैद्यकीय प्रयोगशाळेत गेले होते. तिथे शास्त्रज्ञ उंदरांवर संशोधन करत होते. विशालदादा यांनी केलेल्या स्केचमध्ये काळा उंदीर पाहून ते शास्त्रज्ञ म्हणाले, “विशालजी, उंदीर काळा नाही, पांढरा करा. कारण निसर्गाने उंदराची जी मूळ नैसर्गिक प्रजाती तयार केली होती, ती शुभ्र पांढरी होती. कालांतराने घाणीत राहून ती काळवंडली.” हा विचार विशालदादा यांच्या मनाला स्पर्शून गेला. स्वर्गातील देवासोबत असणारं वाहन-उंदीर काळकुट्ट कसा असू शकेल? तो तर शुभ्र, सात्विकच हवा! त्यांनी घरच्या गणपतीवर पांढरा उंदीर केला आणि तो लोकांच्या इतका पसंतीस उतरला की, आज त्रिमूर्ती स्टुडिओमधील प्रत्येक बाप्पाचा सखा असलेला ‘उंदीर’ शुभ्र पांढऱ्या रंगातच पाहायला मिळतो.
विशालदादा यांच्या मूर्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूर्तींची लहान उंची- केवळ १२ ते १५ इंच!
अनेकदा लोक विचारतात, “बाजारात ५-६ फुटांचे भव्य गणपती मिळतात, मग तुम्ही एवढ्या लहान मूर्ती का बनवता?” यावर विशालदादा शांतपणे उत्तर देतात. भव्य मूर्ती बहुतांश प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) असतात. मातीची मूर्ती वजनाने प्रचंड जड असते आणि ती नाजूक असते. एका मूर्तीला आकार देण्यापासून ते रंगवेपर्यंत ती २०-२५ वेळा हलवावी लागते. १५ इंचांपेक्षा मोठी मातीची मूर्ती हलवणं शारीरिकदृष्ट्या अत्यंत त्रासाचं ठरतं. शिवाय, शहरी भागात घरं लहान असतात, ट्रॅफिकची समस्या असते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, इको-फ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. मातीची छोटी मूर्ती घरच्या घरी बादलीत किंवा लहान हौदात अगदी सहज आणि सन्मानाने विसर्जित होते.
“देव हा प्रदर्शनाचा किंवा स्पर्धेचा विषय नाही. माझी मेहनत पाण्यात जाणार हे मला ठाऊक आहे, पण तो देव निसर्गातून आला आहे आणि निसर्गातच सुरक्षित विसर्जित झाला पाहिजे,” हा विशालदादा यांचा निश्छल अट्टहास आहे.
२०१५-१६ च्या सुमारास त्रिमूर्ती स्टुडिओकडे ३०० हून अधिक मूर्तींचं बुकिंग होतं. व्यवसाय शिखरावर होता. पण विशालदादा यांना जाणवू लागलं की, कामात एक साचेबद्धपणा आला आहे. आत्मा हरवत चालला आहे. एका खऱ्या कलावंताने दाखवावं तसं धाडस दाखवत त्यांनी २०१६ मध्ये एकही गणपती न बनवण्याचा ‘ब्रेक’ घेतला होता!
त्या एका वर्षात त्यांनी पुराणांचा अभ्यास केला, मानवी शरीररचनेचे विविध वयोगटातील स्केचेस केलेत, पेस्टल कलर्स आणि स्किन-टोनवर संशोधन केलं. २०१७ मध्ये जेव्हा त्यांनी पुनरागमन केलं, तेव्हा मातीतील त्या मूर्तींच्या अंगावरील घड्या, त्वचेचा नैसर्गिक टोन आणि डोळ्यांतील जिवंतपणा पाहून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला होता.
पण विशालदादा यांनी साकारलेल्या मूर्ती पाहिल्या की एक गोष्ट लगेच उठून दिसते; इतर मूर्तींसारखा अंगावर दागिन्यांचा भयंकर भरणा किंवा कानात खूप मोठे दागिने त्यांच्या बाप्पावर दिसत नाहीत. यामागचं लॉजिक विचारल्यावर विशालदादा सहजतेने समजावून सांगतात, “मी कलेचं रीतसर शिक्षण घेतल्यामुळे आणि आर्टिस्टिक माइंड असल्यामुळे कामात थोडं स्वातंत्र्य घेतो. मुळात गणपती हा देवच सोन्यासारखा आहे, त्याला अतिरिक्त सोन्याची काय गरज? मी याकडे एक ‘आर्टवर्क’ म्हणून बघतो. फर्निचर किंवा मेटलचं काम असो, ते त्या आर्टवर्कच्या गुणोत्तराला साजेसं असलंच पाहिजे. दागिन्यांचा अतिरेक केला तर मुख्य लक्ष विचलित होतं. प्रेक्षकाची नजर बाप्पाच्या शरीरावर वरपासून खालपर्यंत सहज फिरली पाहिजे आणि पाहणाऱ्याला एक खरा आनंद मिळाला पाहिजे. हत्तीचे कान मुळात नाजूक आणि हलणारे असतात, त्यावर मोठा दागिना चढवला तर ते विद्रूप दिसेल. म्हणून अगदी नाजूक बाळी पुरेशी असते.”
बाप्पाच्या मूर्ती साकारताना विशालदादा यांच्या आयुष्यात एक विलक्षण अध्यात्मिक प्रसंग घडला होता. २०१८ चा गणेशोत्सव संपल्यावर विशालदादा जुन्या ऑर्डर्सची यादी पाहत होते. २०१६ मध्ये एका मित्राने ‘शंकर माळा’ (एक अध्यात्मिक संत रूप) यांची मूर्ती बनवण्यासाठी दिलेली अॅडव्हान्स ऑर्डर थकीत दिसत होती. विशालदादा यांनी तात्काळ माती हातात घेतली आणि एकाच दिवसात पूर्ण तल्लीनतेने ती अवघड मूर्ती पूर्ण केली. संध्याकाळी असिस्टंट स्टुडिओत आला आणि आश्चर्याने म्हणाला, “दादा, तू आज मुद्दाम शंकर माळ्यांचे काम घेतलंस का? आज त्यांचा ‘प्रकट दिन’ आहे!” विशालदादा यांच्या अंगावर काटा आला होता. ३ वर्षांपूर्वीची थकीत ऑर्डर, वर्षभरात कधी न सुचलेलं काम आणि थेट प्रकट दिनाच्याच दिवशी ती साकार होणं हा कोणताही मानवी प्लॅन नव्हता, ती साक्षात बाप्पाचीच कृपा होती.
‘प्रथम तुज पाहता चित्त भुलले,
तुझ्या रूपाचे ध्यान मनी बिंबले...’
त्रिमूर्ती स्टुडिओत जेव्हा कामाचा हंगाम सुरू होतो, तेव्हाचं वातावरण एखाद्या मंदिरासारखं पवित्र असतं. नाना (वडील) वयाच्या ७५ व्या वर्षीही आजही आनंदाने स्वतःच्या घरचा बाप्पा हाताने साकारतात. विशालदादांच्या या वेगळेपणाबद्दल आणि कलासाधनेबद्दल त्यांचे वडील (नाना) अतिशय कौतुकाने आणि अभिमानाने सांगतात. “माझा मुलगा कामाच्या बाबतीत माझा बाप झाला आहे, त्याने माझी कला पुढे नेली आणि हजारो लोकांच्या घरात देव पोहोचवला, यापेक्षा मोठ्या गुरुदक्षिणेची अपेक्षा एका बापाने काय करावी?”
असं सांगताना नानांचे डोळे भरून येतात. ते म्हणतात, “विशालचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो दिलदार आहे. बरेच कलाकार आपली कला किंवा काम करण्याची पद्धत झाकून ठेवतात, गुप्त ठेवतात. पण विशालने स्वतःसोबत अनेक मुलांची फळी तयार केली आहे, त्यांना ही कला शिकवली आहे. कला ही पुढे गेली पाहिजे, अडवून ठेवणं चुकीचं आहे.”
नाना पुढे सांगतात की, “विशालच्या कामात एक वेगळाच ‘डोळसपणा’ आणि तपस्या आहे. तो जेव्हा रंगकामात किंवा मूर्ती घडवण्यात मग्न असतो, तेव्हा आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय याने त्याला फरक पडत नाही. त्याचे हात लीलया चालू असतात. आजकाल बाजारात विशालच्या मूर्तींची कॉपी करणारे, सेम पोज बनवणारे अनेक कलाकार झाले आहेत. अगदी सेम मूर्ती बनवली तरी विशालच्या मूर्तीमध्ये असणारा तो ‘भाव’ आणि ‘तेज’ दुसऱ्या कुठल्याच मूर्तीत येत नाही. जेव्हा विशाल स्वतःचं पूर्ण लक्ष आणि ध्यान त्या मूर्तीत ओततो, तेव्हाच ती मूर्ती बोलतेय असा आभास पाहाणाऱ्याला होतो. ही एक प्रकारची उपजत कला आणि दैवी शक्तीच आहे, ज्याच्या जोरावर त्यांच्या हातातून बाप्पा अत्यंत सुबकतेने साकारला जातो.”
बाप्पाची मूर्ती आपल्या घरी विराजमान व्हावी अशी इच्छा असणाऱ्या भक्तांसाठी विशालदादांच्या वर्कशॉपमध्ये बुकिंगचा एक खास काळ असतो- फेब्रुवारी ते एप्रिल. याच काळात लोक येऊन आपल्या लाडक्या बाप्पाची नोंदणी करतात. स्टुडिओमध्ये कामाची विभागणी अत्यंत नियोजनबद्ध असते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील ज्युनिअर, शार्दूल सावंतसारखे शिष्य आणि कॉलेजचे तरुण एकत्र येतात. कोणी मूर्ती घासण्याचं काम करतो, कोणी कपड्यांचे प्राथमिक रंग भरतो, कोणी पॉलिश करतो. पण मूर्तीचे मूळ शेडिंग आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे- ‘डोळे आखणं’ (नजर साकारणं) हे काम विशालदादा स्वतः करतात.
चित्रकलेच्या सूक्ष्म अभ्यासामुळे विशालदादा जेव्हा हातात ब्रश धरतात आणि बाप्पाच्या डोळ्यांत पापणीची एक बारीक रेष मारतात, तेव्हा ती मूर्ती जिवंत होते. ती भक्ताकडे बघून मंद हसल्याचा भास होतो. म्हणूनच बडोदा, सुरत, पुणे, कोल्हापूर, अगदी परदेशातून लोक वर्ष-दोन वर्षं वाट पाहून ‘त्रिमूर्ती’चा बाप्पा आपल्या घरी नेतात. लाकडी बॉक्समध्ये, थर्माकोलच्या बॉल्समध्ये अतिशय सुरक्षितपणे हा बालगणेश भक्तांच्या घरी पोहोचवला जातो.
पण या संपूर्ण प्रवासात सर्वात भावूक क्षण कोणता असतो तर, भाद्रपद शुद्ध चतुर्थी जवळ येते. स्टुडिओतील सर्व ४५०-५०० मूर्ती रंगवून तयार होतात आणि मग एक एक करून भक्त आपल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी स्टुडिओत येतात. वर्ष ज्या मूर्तींसोबत घालवलं, ज्यांच्या अंगावर मातीचा आणि रंगाचा साज चढला, त्या मूर्ती जेव्हा एकामागून एक स्टुडिओ सोडतात, तेव्हा संपूर्ण ‘त्रिमूर्ती’ स्टुडिओ अचानक सुनासुना होतो.
विशालदादा म्हणतात, “बाहेर सगळ्या जगासाठी गणेश चतुर्थीला आनंदाचा भरता आलेला असतो, पण आमच्या कारखान्यात मात्र शांतता-भाव पसरलेला असतो. एकही मूर्ती मागे उरत नाही. मन रिकामं होतं, डोळे आपोआप पाणावतात...”
कौशल्याचा अहंकार नाही, कलेचा व्यापार नाही आणि स्पर्धेची हाव नाही- केवळ मातीशी प्रामाणिक राहून देवाचं सात्विक रूप घडवणं, हीच विशालदादा आणि त्यांच्या टीमची साधना आहे. लोकांना विशालदादा ‘मिस्टर परफेक्टशनिस्ट’ वाटतात, पण ते स्वतः मात्र अजून खूप शिकायचं आहे असंच मानतात. निसर्गालाच देव मानणारे विशालदादा म्हणतात, “पावसाने भिजलेलं गवत किंवा हिरवं पान पाहून जसा आनंद होतो, तोच जिवंतपणा मला मूर्तीत ओतायचा असतो. केस, डोळे आणि त्वचा अगदी निसर्गाच्या जवळ जाणारी वाटली पाहिजे. बाप्पा समोर उभा राहिल्यावर ‘हा जिवंत आहे’ असं वाटणं, हीच माझी परफेक्टशनिस्टची व्याख्या आहे.”
बाप्पाचे ते गोंडस रूप, हातातील मोदक आणि गालावरची ती गोड खळी पाहून प्रत्येक भक्ताच्या मुखातून एकच आर्त हाक बाहेर पडते-
‘माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो
सुंदर निरागस रूप हे तुझे भक्तीत तल्लीन झाले मन माझे..
अशा या विशालदादांची ही कहाणी इथे सुफळ संपूर्ण पण त्यांच्या हातून अजून सुंदर, देखणी बाप्पाची रूपं घडोत ही त्याच बाप्पाचरणी प्रार्थना.
krantip183@gmail.com