विशेष
शरद जावडेकर
महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते, युक्रांदचे संस्थापक, गांधीवादी विचारवंत आणि माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले. विद्यार्थी चळवळींपासून आणीबाणीविरोधी लढ्यापर्यंत आणि गांधीवादी विचारांच्या प्रसारापासून विधायक सामाजिक कार्यापर्यंत त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ स्मरणात राहील.
प्रत्येक व्यक्ति व संघटना त्या त्या काळाचे अपत्य असते. कुमार सप्तर्षी हे प्रामुख्याने 70 च्या दशकाचे अपत्य आहे! सत्तरच्या दशकाला भारतात ‘अस्वस्थतेचे पर्व’ म्हणावे लागेल! तो काळ संमिश्र स्वरूपाचा होता! स्वातंत्र्य मिळून 20-25 वर्ष होत होती. स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष योगदान देणारी त्यागी, ध्येयनिष्ट नेते- एसएम, नानासाहेब गोरे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, विनोबा भावे, अच्युतराव पटवर्धन, यशवंतराव चव्हाण हयात होते व सक्रिय होते. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचा ध्येयवाद जिवंत होता पण त्याचबरोबर भारतात आर्थिक सामाजिक तणाव वाढत होते. बेकारी, गरिबी, विषमता, दलितांवरचे अत्याचार वाढत होते. त्याच काळात कामगार चळवळी या जोषात आल्या होत्या. लोहियांचा ‘अँटिकाँग्रेस’ वाद वाढत होता तर, दुसरीकडे चारू मुजुमदार, कनू संन्याल यांची ‘नक्षलबारी चळवळ’ प.बंगालमध्ये रुजू लागली होती. महाराष्ट्रात शिवसेनेचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातल्या बेकारीच्या समस्येला महाराष्ट्रात बाहेरून येणारे प्ररप्रांतीयांचे लोंढे जबाबदार आहेत तसेच राखीव जागांमुळे बेकारी वाढत आहे अशी सोपी उत्तरे बेकारीच्या समस्येवर काढली जात होती! दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ‘दलित पॅन्थर’ व दलित साहित्याचा एल्गार महाराष्ट्रात घुमू लागला होता. सवर्ण व दलित यातील अंतर वाढत होते. या अस्वस्थतेच्या व तणावाच्या पार्श्वभूमीवर कुमार आणि ‘युक्रांद’ ही चळवळ पुढे आली व त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक चळवळीतील मोठी पोकळी भरुन काढली.
कुमारशी पहिला परिचय दुरून आला तो 1973 मध्ये औरंगाबादच्या ‘गुलमंडी’ चौकातल्या त्यांच्या भाषणातून! आक्रमक व तर्कशुद्ध मांडणी, बिनतोड उदाहरण व युक्तिवाद, विसंगतीवर नेमके बोट ठेवणारे व भारावून टाकणारे प्रभावी असे त्याचे वक्तृत्व होते. शंकराचार्यांशी त्यांनी घातलेल्या वादाच्या बातम्या आधी वाचल्या असल्यामुळे, त्यावेळी कॉलेज तरुणांमध्ये तो जबरदस्त मॅग्नेट होता! त्यांच्याशी जास्त मोकळेपणाने, मैत्रीच्या नात्याने संबंध आला तो आणीबाणीच्या काळातील येरवडा जेलमध्ये! त्यावेळेला भाई वैद्य, बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, सदानंद वर्दे, बागाइतकर इ. समाजवादी नेते ‘मिसा’ खाली जेलमध्ये होते. त्यांच्याशी चर्चा करण्याचीही संधी मिळाली होती तरी त्यांच्या बरोबर बोलताना आदरयुक्त अंतर वाटायचे! कुमारशी बोलताना पहिल्या भेटीतच अनोळखीपणाचे अंतर त्यांनी संपवले होते. मित्राशी बोलावे तसा तो फार जवळकीने बोलायचा!
1967 मध्ये ‘युक्रांद’ची स्थापना झाली. समाजवादी समाज, शोषण विरहित नवसमाज निर्मिती हे त्यावेळच्या अनेक संघटनांचे स्वप्न होते. कुमार सप्तर्षींवर एस एम, नानासाहेब गोरे, आचार्य दादा धर्माधिकारी, डॉ. राम मनोहर लोहिया, जे.पी., विनायकराव कुलकर्णी, बाळासाहेब भारदे या दिग्गजांचा प्रभाव होता! 70 मध्ये आधी ‘वर्ग’ लढा की आधी ‘वर्ण’ लढा असा अग्रक्रमाचा वाद मोठा चालायचा! कुमार तेव्हा असे म्हणायचे, की हा अग्रक्रमाचा मुद्दा नाही तर दोन्ही लढे एकाच वेळेला आपल्याला चालवावे लागतील. वर्गाला जातीचा कंगोरा आहे, तर जातीला आर्थिक शोषणाची बाजू आहे. म्हणून कुमार माओच्या ‘टू लेग थेअरी’चे उदाहरण द्यायचा! डॉ. लोहियांनी प्रतिपादलेले, ‘जात व वर्ग’ यांचे नाते तरुणांना तो समजावून सांगायचा व ही भूमिका तरुणांना भावायची!
याच अनुषंगाने त्यांनी अनेक चळवळी संघटित केल्या. युक्रांदचा कालखंड हा तसा 1967 ते 1977-78 असा दहा वर्षांचाच आहे. कुमारच्या नेतृत्वाखाली जी मोठी आंदोलने झाली ती प्रामुख्याने शिक्षणाच्या संदर्भात होती. 1968 पुणे विद्यापीठ फी वाढ विरोधी आंदोलन, 1971 चे म.फुले कृषी विद्यापीठ वशिलेबाजी विरोधी आंदोलन, 1972 दमाणीशेठचे सोलापूर मेडिकल कॉलेज, कॅपिटेशन फी विरोधी आंदोलन, 1973 दलित शिष्यवृत्ती वाढ आंदोलन, 1973 मालेगाव बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, 1974 मराठवाडा विकास आंदोलन व नंतरचे मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन! या सर्व आंदोलनात वर्ग व जात यांचा सांधा कुमारने कौशल्याने जोडला होता.
1972 मध्ये पुण्यात शंकराचार्यांबरोबर केलेला जाहीर वादविवाद यामुळे कुमार तरुणांच्या गळ्यातला ताईतच झाला होता! कुमारकडे संघटन कौशल्य, चळवळ उभी करून शेवटपर्यंत नेण्याचे कौशल्य जबरदस्त होते. त्यामुळे त्या काळात कुमारने ‘युक्रांद’ महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेली होती. अनेक खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात स्थानिक तरुण मुले ‘कुमार सप्तर्षी व युक्रांद’च्या नावाने परस्पर पाट्या लावून मोकळी होत असत. 70 च्या दशकात महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा झंझावातच होता!
सत्तरच्या दशकात मराठवाड्याची सामाजिक, राजकीय व आर्थिक मानसिकता निजामशाहीमुळे सरंजामशाहीचीच होती. खेड्यापाड्यात जातीव्यवस्थेची चौकट भक्कम होती’ परंतु विद्यार्थी चळवळीमार्फत सवर्ण व दलित ही दरी पुष्कळ कमी होत गेली व शैक्षणिक प्रश्नासाठी जात व धर्म विसरुन तरुण व्यवस्थेशी लढत होते हे आशादायक चित्र महाराष्ट्रभर निर्माण झाले होते. युक्रांदची मूळ भूमिका संसदीय राजकारणात न पडता जनआंदोलनाचे राजकारण करण्याची होती; परंतु आणीबाणीनंतरच्या काळात राजकीय परिस्थिती बदलली होती व लोणावळा शिबिरात कुमारसह अनेकांनी संसदीय राजकारणाचा पर्याय निवडला व दोन गट झाले! नंतर विधानसभेत आमदार म्हणूनही त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली!
कुमारने एसेएमना गुरु मानल्यामुळे त्यांचे ‘रचनात्मक संघर्ष’ हे सूत्र त्यांनी स्वीकारले होते, म्हणूनच 1971 मध्ये त्यांनी जेपीच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये दुष्काळग्रस्तांना मदत कार्य तरुणांच्या मदतीने संघटित केले होते, तर 1979 मध्ये ‘भारतीय समाज विकास व संशोधन’ संस्थेतर्फे ग्रामीण विकासाचे एक आदर्श प्रारूप त्यांनी उभे केले आहे! 2006 पासून ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’च्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली व मोठ्या प्रमाणात गांधी विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यात कुमार यशस्वी झाला!
सप्तर्षी जितके प्रभावी बोलायचे तितकेच त्यांचे लिखाण लालीत्यपूर्ण व प्रभावी होते! त्यांची एकूण दहा पुस्तके, अनेक पुस्तिका, सत्याग्रही विचारधारा मासिकात व अनेक वृत्तपत्रात लेख आहेत व सर्वच लिखाण चिंतनीय आहे! परंतु ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ व ‘व्यक्तीरंग’ ही दोन पुस्तके त्यात वेगळी वाटतात! पहिले आत्मचरित्र आहे, तर दुसरे 23 लोकांची व्यक्तिचित्रे आहेत. त्यात एस एम, दादा धर्माधिकारी, जॉर्ज फर्नांडीस, शंकरराव चव्हाण, निळू फुले, शरद पवार आदींचा समावेश आहे. हे वाचत असताना कुमार ‘शब्दांचे मूर्तीकार’ होतात व ती व्यक्ति वाचकांच्या डोळ्यासमोर उभी करतात व पुनर्प्रत्ययाचा आनंद देतात!
समाजवादी, गांधीवादी विचारवंत, प्रभावी संघटक, तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘विधायक पुंगीवाला’, तरुणांना निर्भय करून अहिंसक आंदोलनासाठी त्यांना तयार करणारा कृतिशील नेता, प्रभावी वक्ता व डॉ. राममनोहर लोहियांनी सांगितलेल्या ‘मतपेटी, तुरुंग व फावडे’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करणाऱ्या या कॉम्रेडला भावपूर्ण श्रद्धांजली!
कार्याध्यक्ष, अ. भा. समाजवादी
शिक्षण हक्क सभा