प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
साजूक तूप, रवा, दूध, साखर आणि केळ्याच्या संगमातून तयार होणारा गोडाचा शिरा म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच! प्रसादापासून घरच्या नाश्त्यापर्यंत मन तृप्त करणाऱ्या या गोड पदार्थाची चव आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणींचा हा गोड प्रवास.
गोडाचा शिरा किंवा प्रसादाचा शिरा अशा नावांनी खवय्यांमध्ये प्रसिद्ध असलेला हा पदार्थ. शिरा हा भारतीय उपखंडातील विविध प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी तयार केला जाणारा गोड पदार्थ आहे. रवा किंवा गव्हाच्या भरड स्वरूपापासून बनविल्या जाणाऱ्या या पदार्थाचे अनेक प्रादेशिक प्रकार आढळतात. उत्तर भारतात याच्याशी साधर्म्य असलेल्या पदार्थाला सूजी हलवा म्हणतात, तर महाराष्ट्रात त्याला प्रामुख्याने रव्याचा शिरा किंवा गोडाचा शिरा असं संबोधलं जातं.
विशेष म्हणजे, शिरा बनवण्यासाठी फार मोठी तयारी लागत नाही. घरात रवा, साखर आणि तूप उपलब्ध असेल, तर काही वेळातच हा पदार्थ तयार होऊ शकतो. त्यामुळे तो सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात शिरा सहज स्थान मिळवतो.
महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात शिऱ्याला विशेष महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये पूजा, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव किंवा इतर शुभकार्यांच्या वेळी शिरा नैवेद्य म्हणून तयार केला जातो. काही ठिकाणी केळी घालून तयार केलेला शिरा प्रसाद म्हणून वाटला जातो.
शिरा तयार करणं ही एक साधी कृती असली, तरी त्याची चव उत्तम होण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे रवा भाजण्याची पद्धत.
रवा कढईत घालून मंद किंवा मध्यम आचेवर सतत हलवत भाजला जातो. भाजताना त्याचा रंग फार गडद होऊ न देता त्यातून खमंग सुगंध येईपर्यंत तो परतणं आवश्यक असतं. रवा नीट भाजला गेला, तर शिऱ्याला उत्तम स्वाद आणि मोकळा पोत मिळतो.
तूप हा शिऱ्याच्या चवीचा दुसरा महत्त्वाचा घटक. तुपामुळे रव्याला खमंगपणा येतो आणि पदार्थाला समृद्ध चव मिळते. मात्र, तुपाचं प्रमाण प्रत्येक घरात आवडीनुसार बदलतं. काहींना भरपूर तुपातला मऊ, लुसलुशीत शिरा आवडतो, तर काहींना कमी तुपातील साधा शिरा अधिक रुचतो. सोबतीला वेलची पूड आणि पिकलेलं केळं. मऊसूत शिरा बनण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. साजूक तुपात भाजलेला रवा, दूध, साखर, वेलची, बेदाणा आणि केळं यांच्या संयोगामधून बनणारं अप्रतिम खाद्यव्यंजन म्हणजे गोडाचा शिरा.
अनेक मंडळी त्यात काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अशा अवांतर गोष्टी भरगच्च प्रमाणात टाकून त्याला श्रीमंती रूप देण्याचा घाट घालतात. अस्सल गोडाच्या शिऱ्याला या कशाचीही गरज नसते. तो वर उल्लेखलेल्या चार पदार्थांनी अगदी छान चविष्ट बनतो. अहो, मूळ शिऱ्याचा आनंद घेताना सतत हे सुके मेवे जिभेवर येऊ लागले, तर शिऱ्याच्या चवीची गंमत काय उरणार??
आता, गाजर हलवा हा तयार झाल्या झाल्या खाण्याची एक वेगळी मजा आहे. गरमागरम हलवा खाताना दूध, गाजराचा एकत्रित खरपूसपणा मुखात अवतरतो आणि आनंद देऊन जातो. तसं शिऱ्याचं होत नाही. अर्थात तयार झाल्या झाल्या आवडणाऱ्यांनी खावा शिरा तसा, पण पट्टीचा खवय्या शिरा गार होण्याची वाट पाहतो. जसजसा तो गार होतो, तसतसं केळं त्यात अधिक मुरत जातं. आता टोप उघडायचा आणि एका चांदीच्या वाटीत हवा तेव्हढा शिरा काढून घ्यायचा. आता चांदीच्या वाटीत का? हा प्रश्न तुमच्या मुखावर रेंगाळताना मला दिसतोय. पण घरगुती चक्का टांगून केलेलं श्रीखंड, दाट आटवलेली बासुंदी आणि गोडाचा शिरा हे पदार्थ चांदीच्या वाटीत खावेत असं का कोण जाणे, पण मला आपलं वाटतं इतकंच. फारतर स्टीलच्या वाटीत, पण काचेच्या, आइस्क्रीमच्या किंवा तत्सम प्रकारच्या बाऊलमध्ये अजिबात खाऊ नये. यात श्रीमंती किंवा मोठेपणा अजिबात नाही किंवा या बाऊलमध्ये खाल्ले तर ते पचणार नाही असंही नाही. पण हे गोड पदार्थ चांदीच्या वाटीत अधिक खुलतात.
आता कांदेपोहे, बटाटेपोहे, उपमा याबरोबर सोबतीला चहा हा मस्ट असतो. खातानाच असेल तर फारच छान. असं गोडाच्या शिऱ्याचं नसतं. त्याला कुणाच्याही साथीची, सोबतीची गरज नसते. तो एकटा रुबाबात मुखात शिरतो आणि चवीने पोटात उतरतो.
मला हा सकाळच्या नाश्त्याला, दुपारी जेवताना ताटात डाव्या बाजूला गोडाच्या जागी, संध्याकाळी खायला ते रात्री जेवणात, थोडक्यात कधीही चालतो. त्याचे पोहे, उपमा, खिचडीसारखे नखरे नसतात, फक्त सकाळच्या नाश्त्यालाच खायचा वगैरे. तो एव्हरग्रीन असतो.
कुणाकडे सत्यनारायण असला, पूजा आरती आटोपली, नमस्कार झाला आणि बटरपेपरच्या किंवा पानाच्या द्रोणातून तो हातात आला की त्याचा सुगंध आणि रूपाकडे पाहून मला धीर धरवत नाही. पहिल्या घासातच त्याला बनवणाऱ्याचा किंवा रिचा हात किती चवदार आहे किंवा गोडाच्या शिऱ्याशी किती जवळीक आहे हे लक्षात येतं. प्रसादाचा शिरा एका घासाएव्हढा देण्याची पद्धत का आहे कोण जाणे. असो, चाटून पुसून संपवायचा आणि....आणि काय? अजून एक द्या, असं सांगताही येत नाही, पण चुकून कुणी विचारलंच,
तुम्हाला मिळाला का प्रसाद?
तर मी मनोमन सत्यनारायणाची माफी मागून चक्क नाही म्हणतो आणि अजून एक प्रसादाचा द्रोण हातात पाडून घेतो.
आमच्याकडे अधूनमधून एखाद्या शनिवारी गोडाचा शिरा आणि बटाटावडा असा मस्ऽऽऽऽतं बेत असतो. इतकं अफलातून कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला सांगतो!
“कसा झालाय बघ रे शिरा....” असं म्हणून बायको लहान ताटलीत मला वाढून देते. आता तो गरम असतो, त्यामुळे नेमकी चव कळत नाही, पण तरीही न चव घेता त्याला अव्हेरणं मला जमत नाही आणि येणारा सुगंध हतबल करत असतो. आतून बायको विचारत असते, “काय रे, कसा झालाय, काही कमी आहे का?” मी मात्र शिऱ्याचा आस्वाद घेण्यात दंग असतो.
खमंग बटाटावडा, खोबऱ्याची हिरवी चटणी आणि गोडाचा शिरा, मस्त बेत जमतो, पोट तुडुंब भरतं आणि अभावितपणे तृप्ततेचा ढेकर येतो. तर असा हा-
शिरा त परमं द्रव्यं घृत-शर्करा संयुतम्मु खे पतति यस्यैव, तस्य मोक्षो न संशय:
अर्थात, तूप-साखरेने युक्त शिरा, हा जगातील सर्वश्रेष्ठ पदार्थ आहे, ज्याच्या मुखी हा पडतो त्याला त्याक्षणी मोक्ष (स्वर्गीय आनंद) मिळतो यात काहीच शंका नाही.
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com