‘शेंगदाणा’ पदार्थांचा कणा 
अक्षररंग

‘शेंगदाणा’ पदार्थांचा कणा

शेंगदाणा हा आयुष्यभर आपल्या चवीच्या आठवणींमध्ये रेंगाळत राहतो. कधी चिक्कीमध्ये, कधी चटणीत, तर कधी मिसळीच्या फरसाणात सामावलेला हा साधासुधा दाणा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनून गेला आहे.

नवशक्ती Web Desk

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

शेंगदाणा हा आयुष्यभर आपल्या चवीच्या आठवणींमध्ये रेंगाळत राहतो. कधी चिक्कीमध्ये, कधी चटणीत, तर कधी मिसळीच्या फरसाणात सामावलेला हा साधासुधा दाणा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनून गेला आहे.

वाटाणा फुटाणा शेंगदाणा

उडत चालले टणाटणा......

ही शाळेत ऐकलेल्या कवितेची ओळ. अगदी तेव्हापासून या शेंगदाण्याने जिभेवर गारुड केलं.

लहानपणी घर, भातुकली या खेळांसाठी भाजलेले शेंगदाणे आणि गूळ दिला जायचा. भात म्हणून गूळ आणि भाजी म्हणून शेंगदाणा, असा भातुकलीच्या जेवणाचा मेन्यू असायचा.

खारवलेले शेंगदाणे म्हणजे तर काय पर्वणीच. एक एक तोंडात टाकता टाकता, कधी फन्ना उडायचा आणि डबा किंवा पिशवी खाली व्हायची कळायचं सुद्धा नाही.

तसा शेंगदाणा हा पित्त प्रकृतीचा. फार खाल्ले तर एखाद्याला पित्ताचा त्रास होण्याची दाट शक्यता. आमच्या ऑफिसमध्ये महिन्यातून एका ठराविक वारी, एक विक्रेता सुरतच्या खाऱ्या दाण्यांची पाकिटं घेऊन येत असे. छान टप्पोरे खारवलेले शेंगदाणे. अख्खं ऑफिस येण्याच्या दिवशी त्याची वाट पहात असायचं. अल्प वेळात रिकामी पिशवी झटकून तो ऑफिसबाहेर पडायचा.

शेंगदाणा चिक्की माझ्या फार आवडीची आणि पूर्वी चिक्की म्हणजे शेंगदाण्याचीच मिळायची. पुढे या चिक्कीचं व्यावसायीकरण झालं आणि क्रश नट्स, काजू, ड्राय फ्रुट्स, राजगिरा आणि कशा कशाच्या चिक्क्या मिळू लागल्या. परंतु अख्ख्या शेंगदाण्याची चिक्की आणि तीही गुळाच्या पाकात केलेली, खाण्यात जी मज्जा होती त्याला तोड नाही. माझी आई शेंगदाण्याचे, तिळाच्या लाडूपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे लाडू करायची. आम्ही मुलांनी भूक लागली म्हटलं, की हातावर एक लाडू मिळायचा. दातांनी खटाखट तोडत तो चिकट लाडू खाण्यात काय आनंद होता म्हणून सांगू. कुटलेल्या शेंगदाण्यांचा लाडू खाण्याची मजा काही औरच असते. एक लाडू खाल्ला की पोट मस्त भरतं. आज बाजारात घरगुती या नावाखाली हे विकत मिळतात, पण अनेकदा शेंगदाणे खवट असतात, गूळ चिक्कीचा नसतो, साखरेच्या पाकात केलेले असतात आणि भारंभार किंमत देऊन लाडू खाण्याचा आनंद मिळत नाहीच. असो,

महाराष्ट्रातील अनेक भागात भाजी, आमटी किंवा स्वयंपाकाच्या इतर काही पदार्थांत शेंगदाण्याचं कुट असतंच. शेंगदाण्याची वाटलेली सुकी चटणी म्हणजे तर अहाहा! फक्त ती मिक्सरवर नाही तर खलबत्त्यात वाटलेली असायला हवी. मिक्सर शेंगदाण्याची धूळधाण करून टाकतो. खलबत्त्यात शेंगदाणे सरसरीत वाटून त्याची केलेली चटणी काय वर्णावी. जेवताना चमचाभर पानात घ्यावी, हवं असल्यास त्यात दही मिसळावं किंवा तशीच घ्यावी. गरमागरम भाकरीसोबत मस्त हाणायची. हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आमच्याकडे सोलापूरची शेंगदाणा चटणी बंद पाकिटात विकत मिळते. पावाच्या एका कापटीला लोण्याचा थर चढवायचा, त्यावर ही चटणी पेरायची, त्यावर लोणी लावलेली दुसरी कापटी ठेवायची आणि या संपूर्ण मिश्रणाचा पहिला घास मुखात गेला, की रसनेला होणारा आनंद काय वर्णावा. कधी दुसरा घास येतोय याची वाट पहात असते. सोबत फक्कड चहा मात्र हवा.

कोबीची पचडी हा खाद्यप्रकारात किसलेला कोबी, साखर, मीठ आणि फोडणी देण्यासाठी तेल, हिंग, मिरची, लिंबू या सगळ्यांसोबत शेंगदाण्याचं कूट नसेल तर पचडी खाण्याची मज्जाच सरून जाते.

साबुदाण्याच्या खिचडीत आणि वड्यात शेंगदाण्याच्या अस्तित्वाला पर्याय नाही. खिचडीत बटाटा वगैरे टाकतात अनेक लोकं. टाकोत बापडे, पण शेंगदाण्याचं कुट नसेल तर ती खिचडी दाताखाली येण्याचा आणि तिच्या चवीचा आनंद मिळतच नाही. अगदी तीच गोष्ट चिवड्याची. माझी आई चिवडा करायची, त्यात सुक्या खोबऱ्याचे तुकडे (कातळ्या) आणि शेंगदाणे मुबलक असायचे. मी ते अगदी निवडून खायचो आणि फक्त ते संपवतो म्हणून ओरडाही खायचो. चिवडा मग तो कसलाही असो, त्यात भरपूर शेंगदाणे हे हवेतच. विकतच्या चिवड्यात नावाला शेंगदाणे टाकलेले असतात, बाकी फक्त पोहे लागतात.

येता जाता, अधून मधून फारशी भूक नसेल पण काही तोंडात टाकायला हवं असेल, की भाजलेल्या शेंगदाण्याची बरणी उघडून, मूठभर दाणे उचलायचे आणि पेपर किंवा एखादं गुंतवून ठेवणारं पुस्तक वाचताना एकेक तोंडात टाकत टाकत राहायचं. देवाशप्पथ सांगतो, वाचनाचा आनंद दुपटीने वाढायचा.

अहो भुईमुगाच्या शेंगा भरपूर आणायच्या आणि मोठ्या टोपात छान उकडायच्या. सगळ्यांची जेवणं आटोपली की मध्ये शेंगांचा टोप ठेवून त्याच्या भोवतीने सगळ्यांनी बसायचं आणि त्या शेंगा हाणायच्या.

पोहे मग ते फोडणीचे असो, कांदेपोहे असो अथवा दडपे पोहे असो, त्यामध्ये तळलेले शेंगदाणे भरपूर टाकले की, खाताना मस्त मजा येते. काय असतं, पोहे मऊ, बटाटाही मऊ मग दाताखाली काहीच येत नाही. शेंगदाणे असतील तर पोह्यांची लज्जत अजून वाढते.

आणि अहो, मुखात उतरल्यापासून पोटात जाईपर्यंत प्रचंड आनंद देऊन जाणारी जी मिसळ, ती तर शेंगदाण्याशिवाय अपूर्ण आहे. मिसळीमध्ये जाणाऱ्या फरसाण, चिवड्यात जेवढं शेंगदाण्याचं अस्तित्व अधिक, तेवढा मिसळीचा आनंद मोठा. आजकाल उपवासाची मिसळ, हा मला तरी अजिबात न पटणारा पदार्थ हॉटेलमध्ये उदयाला आलेला आहे. मटकीच्या जागी बटाट्याची उपवासाची भाजी, त्यावर फरसाण, चिवड्याऐवजी बटाट्याचा चिवडा, बटाटा सळी आणि मस्त झणझणीत रश्श्याच्या जागी शेंगदाण्याची आमटी. खाणारे खावोत बापडे, मी मात्र विचार करतो त्या बिचाऱ्या शेंगदाण्याचा. काय वाटत असेल त्याला असं उपवासाच्या मिसळीत उतरताना. ‘भोग आहेत झालं’ असं म्हणत असेल स्वतःशीच. अर्थात शेंगदाण्याची आमटी गरमागरम वरीच्या भाताबरोबर छानच लागते, पण म्हणून तिने उपवासाच्या मिसळीत उतरावं हे अजिबात पटत नाही.

तर असा हा बहुपयोगी, प्रथिनांनी युक्त शेंगदाणा, पदार्थांना एक मस्त चव देऊन जातो आणि आपलं अस्तित्व सिद्ध करतो.

kprasad1959@gmail.com

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा