आमची दिवाळी न्यारी! 
अक्षररंग

आमची दिवाळी न्यारी!

दिवाळीचा खरा प्रकाश पणत्यांतच असतो असं नाही; तो असतो लाल मातीने सारवलेल्या अंगणात, रांगोळीच्या रेषांत आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या परंपरांत. कोकणातली दिवाळी म्हणजे संस्कृती, निसर्ग आणि बालपणीच्या आठवणींचा मनोहारी संगम!

नवशक्ती Web Desk

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

दिवाळीचा खरा प्रकाश पणत्यांतच असतो असं नाही; तो असतो लाल मातीने सारवलेल्या अंगणात, रांगोळीच्या रेषांत आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या परंपरांत. कोकणातली दिवाळी म्हणजे संस्कृती, निसर्ग आणि बालपणीच्या आठवणींचा मनोहारी संगम!

तुम्ही म्हणाल सहा नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि आठ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी, मग दिवाळीचं हे आतापासूनच काय सुरू केलं? काय करणार बाबा.. मी पडलो कोकणी माणूस! आमच्या कोकणात दरवर्षी दिवाळीच्या दहा पंधरा दिवस आधी अंगण खोदून पुन्हा ठोकून बसवतात. ह्याला आमच्याकडं 'अंगण करणं' म्हणतात. नंतर त्यावर पाणी शिंपडून जमीन सारवतात. वसंत ऋतुच्या आगमना बरोबरच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत रोज सायंकाळी अंगणात सडा घालून चैत्रांगण रांगोळी काढली जाते. या रांगोळीत एका बाजूने उघडा असलेला दुहेरी चौकोन असतो . चौकोनात चंद्र -सूर्य, शंख-चक्र, गोपद्म ,नागयुग्म, राधा-कृष्ण, त्रिदल, तीन भुवने, तीन देव, तीन अवस्था , तीन काल यांचं म्हणजे पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वस्तांचं प्रतीक म्हणून रेखाटण्याची पद्धत आहे.

ह्यात त्रिदल म्हणजे बेल, तुळस,दुर्वा; तीन भुवने म्हणजेच भू , भुव:, स्व:; तीन देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू , महेश; तीन देवता -सरस्वती, लक्ष्मी, पार्वती; तीन अवस्था- चित्रकलेतील तीन प्रमुख आकार-चौकोन,त्रिकोण व गोल; तीन काळ- वर्तमान, भूत,भविष्य असा मोठा सांकेतिक प्रपंच ह्या मांडणीत असतो. शिवाय शक्तीची अभिव्यक्ती करताना शस्त्र आणि शृंगार निदर्शित करणारी तिची आभूषणेही आढळतात. शंख, चक्र, गदा, पद्मा, खडक अशी ही आयुधं देवीच्या महाकाली रूपाची आठवण करून देतात. देवी महाकाली ही तशी महालक्ष्मी आहे. त्यामुळे शृंगार दिग्दर्शित करणाऱ्या अनेक आकृती चैत्रांगणात असतात. फणी, आरशाची पेटी, कुंकवाचा करंडा, काजळाची डबी, मणी मंगळसूत्र असं सौभाग्यवाण असतं. लाल मातीनं सारवलेल्या अंगणात हे चैत्रांगण शोभून दिसतं. निमशहरी भागात यंत्र युगानं सारंच बदललं. सारवलेली अंगणं नाहीशी झाली. फरशीची अंगणं झाली. मात्र अजूनही कोकणातल्या छोट्या छोट्या खेडेगावात आपल्याला चैत्रांगण दिसतं आणि दिवाळीची चाहूल लागते.

मालवणी आणि दक्षिण कोकण संस्कृतीत दिवाळी साजरी करण्याची एक विशिष्ट आणि निसर्गाशी जोडलेली पारंपरिक पद्धत आहे. कोकणातील मालवणी पद्धतीचे प्रमुख दिवाळी विधी आणि प्रथा अशा आहेत:

रांगोळ्या : दिवाळीत दारासमोर रांगोळी काढणं ही कोकणच्या संस्कृतीतील अत्यंत शुभ, सुंदर आणि महत्त्वाची परंपरा आहे. रांगोळी ही समृद्धी, सुख आणि लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काढली जाते. रंगीबेरंगी रांगोळीमुळे घराचं वातावरण प्रसन्न आणि चैतन्यमय राहते.

यात कमळ, दिवा (पणती), गणपती, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, मोर आणि आंब्याची पानं यांसारख्या शुभ चिन्हांचा वापर केला जातो.

फुलांची रांगोळी : झेंडू, गुलाब आणि मोगऱ्याच्या ताज्या फुलांचा वापर करून सुबक रांगोळी तयार केली जाते.

पारंपारिक ठिपक्यांची रांगोळी : भूमितीय आकार आणि ठिपके जोडून काढल्या जाणाऱ्या डिझाईन्स आजही लोकप्रिय आहेत.

दीपकयुक्त रांगोळी : रांगोळीच्या मध्यभागी किंवा कडेला पणती किंवा दिवा ठेवून रोषणाई केली जाते.

मोराची व कलाकुसर डिझाईन : आकर्षक रंगांचा वापर करून मोराचा पिसारा असलेल्या किंवा वर्तुळाकार चित्राकृती काढल्या जातात.

कारिटं (कारीट) फोडणे (नरक चतुर्दशी) : नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी घराबाहेर किंवा अंगणात 'कारीट' नावाचं एक छोटं, कडू फळ डाव्या पायाच्या अंगठ्यानं चिरडण्याची/फोडण्याची मालवणी संस्कृतीत महत्त्वाची प्रथा आहे. हे फळ नरकासुराचं प्रतीक मानलं जातं. फळ फोडून त्याचा रस कपाळाला लावतात आणि अगदी थोडासा जिभेला लावतात, ज्याला दैत्याचं 'रक्त चाखणं' असं म्हणतात. हा विधी वाईट प्रवृत्तींचा नाश करणारा आणि चांगल्या आरोग्यासाठी उपकारक मानला जातो.

पाच पोह्यांचं वाण (नवे पोहे) : कोकणात दिवाळीला सुक्या फराळापेक्षा 'गोडे पोहे' आणि 'तिखट पोहे' यांना जास्त महत्त्व असतं. नरक चतुर्दशीच्या दिवशी नवीन भाताच्या पिकापासून बनवलेले पाच प्रकारचे पोहे (उदा. गुळाचे पोहे, दह्यातले पोहे, दुधातले पोहे, चहाचे पोहे आणि तिखट पोहे) देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि शेजाऱ्यांना 'वाण' म्हणून वाटले जातात.

बळीराजाची पूजा आणि इडा-पिडा टळू दे : दिवाळी पाडव्याच्या दिवशी शेतकरी आणि मालवणी बांधव शेतातील तसंच गोठ्यातील गुराढोरांची (गाई-बैलांची) पूजा करतात. तांदळाच्या पिठाची किंवा शेणाची बळीराजाची मूर्ती बनवून "इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना केली जाते. घराच्या मुख्य दरवाजावर आणि गोठ्यात झेंडूच्या फुलांची तोरणं लावली जातात. कोकणात झेंडूला गोंडे म्हणतात.

तुळशीचं लग्न आणि देवदिवाळी : मालवणी पद्धतीतील दिवाळीची खरी सांगता मुख्य दिवाळीनंतर येणाऱ्या 'देव दिवाळीला' (मार्गशीर्ष प्रतिपदा) किंवा तुळशीच्या लग्नाने होते. या दिवशी कोकणातल्या घराघरांमध्ये अंगणातील तुळशी वृंदावनामध्ये ऊस, चिंच आणि आवळे लावून,

अंतरपाट धरून आणि रीतसर मंगलाष्टका म्हणून तुळशीचं लग्न लावलं जातं आणि मोठा दीपोत्सव केला जातो.

लक्ष्मीपूजन नैवेद्य : कोकणात बहुतांश घरात लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याला शाकाहारी अन्नाचा नैवेद्य असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी मंडळी हिशेबाच्या चोपड्यांची विधिवत पूजा करून जमलेल्या मंडळींना आणि बाळगोपाळांना बत्तासे वाटतात. बाजारपेठेत रस्त्यावर फटाक्यांच्या माळा फुटत असतात.

आमच्या लहानपणी नरक चतुर्दशीच्या आधल्या दिवशी ,मागीलदारी तीन दगडांवर पाणी भरून ठेवलेल्या मडक्याला आम्ही गोंड्याच्या माळा बांधून ठेवायचो. नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आमच्या मारुती वाडीच्या कुठल्या तरी अंगणातून 'गोविंदा गोपाळा...यश्वदेच्या तान्ह्या बाळा..' अशी उंच आवाजातली आरोळी ऐकू यायची. आणि मस्त गोधड्यांच्या उबेत झोपलेल्या आम्हा पोरांच्या कमरेत लाथा घालून आई सगळ्यांना अंघोळीला उठवायची. थंडीनं कुडकुडत असलेले आम्ही अंगाखांद्यावर थंड उटणं चोळायचो आणि गरम पाण्याचे तांब्यांमागून तांबे,मध्येच वासाचा साबण लावत, अंगावर उपडे करायचो. अंघोळ झाली की तसेच धावत अंगणात यायचो आणि तुळशीपुढे ठेवलेल्या कारीटावर डाव्या पायाचा अंगठा दाबून मोठ्या आवाजात आरोळी द्यायचो, 'गोविंदा गोपाळाऽऽ' आणि मग आमची दिवाळी सुरू व्हायची..

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

Mumbai : पुनर्विकासात उशीर केल्यामुळे गृहनिर्माण संस्थेला ६.२० कोटींची भरपाई

कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे

Mumbai : बेस्ट बसमध्ये न घेतल्यास कोयता हाती घेऊ! मच्छिमार महिला संतप्त

Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज; झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज