जगतवारी
मेधा आलकरी
जपानमधील क्योटो शहर आपल्या देखण्या मंदिरांसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यातील सर्वात आकर्षक म्हणजे किंकाकुजी सुवर्णमंदिर जे शांत सरोवरातील प्रतिबिंबामुळे अधिकच मोहक दिसतं. यासोबतच फुशिमी इनारी मंदिरचे हजारो केशरी तोरी, तोडायजी मंदिरमधील भव्य बुद्धमूर्ती आणि कियोमिझू-डेरा मंदिरचे निसर्गरम्य सौंदर्य जपानी संस्कृतीची अनोखी झलक देतात.
जपानमधील क्योटो शहर हे मंदिरांकरिता प्रसिद्ध! चाळीस फूट उंचीचं त्यांचं सुवर्णमंदिर त्यातील सर्वात मनोवेधक. किंकाकूजी नावानं प्रसिद्ध अशा या मंदिराचे वरील दोन मजले सोन्याचा मुलामा दिलेल्या पत्र्यांनी मढलेले आहेत. मृत्यूसंबंधी नकारात्मक विचारांचा अवरोध करण्यासाठी या सोन्याचं प्रयोजन. किंकाकूजी शब्दाचा अर्थच आहे- सोनेरी मंदिर!
या मंदिरात बुद्धदेवांचे अवशेष ठेवले आहेत. मंदिराच्या कळसावर ब्रॉन्झचा फिनिक्स पक्षी मोठ्या डौलात उभा आहे. खालच्या मजल्यावरील लाकडी कठड्याचा शिसवी रंग आणि मंदिराच्या पांढऱ्या भिंती यामुळे वरचे सोनेरी मजले अधिकच उठून दिसतात. मंदिराचं हे लोभस बाह्यरूप बघून आत जाण्याची इच्छा तीव्र ना झाली तर नवलच! परंतु आत जायला बंदी आहे. बुद्धदेवांचं ओझरतं दर्शन बाहेरून होतं त्यावरच समाधान मानायचं. सभोवताली मुद्दाम बांधलेल्या शांत सरोवरात पडणारं त्या सोनेरी मंदिराचं प्रतिबिंब प्रत्येक ऋतूत अप्रतिम दिसतं. वसंतात गुलाबी चेरीपुष्पांनी डवरलेल्या फांद्या, ग्रीष्मात हिरवाई, तर शिशिरात हिमचादरीची पार्श्वभूमी. आम्ही गेलो होतो तो स्वच्छ सूर्यप्रकाशाचा वसंतातील दिवस होता. शांत सरोवरात किंकाकूजी सुवर्णमंदिराचं स्वच्छ आणि अप्रतिम प्रतिबिंब पडलं होतं. “या जगात सर्वात सुंदर कोण?” हा हिमगौरीनं आरशाला विचारलेला प्रश्न तो या जलदर्पणाला विचारात असावा का? मध्येच वाऱ्याची एक झुळूक आली आणि चेरीच्या फुलांच्या पाकळ्या त्यावर उडू लागल्या. त्यातल्या काही सरोवरात जाऊन पडल्या आणि पाण्यावर हलके तरंग उठले. प्रतिबिंब किंचित हललं आणि पुन्हा स्थिर झालं. पाण्यात गुलाबी पाकळ्यांचा सडा पडलेला दिसत होता. त्यात पडणारं आपलं प्रतिबिंब पाहण्यात किंकाकूजी पुन्हा गढून गेला. चौदाव्या शतकातलं हे झेनमंदिर बऱ्याच युद्धांना सामोरं गेलं आणि त्यातून तगलंही! मात्र १९५० साली त्याच मंदिरातील एक बावीस वर्षीय तरुण पण वेडसर संन्याशाने ते पेटवून दिलं. त्याची डागडुजी करून त्याला पूर्वावस्थेत आणण्यास तब्बल पाच वर्षं लागली.
क्योटोमधील आणखी एक अनोखं मंदिर म्हणजे फुशिमी इनारी. शिन्तो पंथाच्या इनारी देवीचं हे मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी वसलंय. निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवरील शेंदरी रंगाचं वैभवशाली प्रवेशद्वार खूपच आकर्षक दिसतं. इनारी हा शेतकऱ्यांना संरक्षण देणारा धान्यदेव. मुख्यत्वे करून भाताचं पीक आणि त्यापासून तयार होणारी साके नावाची वाईन यांचं दैवत असलेला हा इनारी. हळूहळू शेती संपली आणि इनारी व्यापाऱ्यांचा आणि उद्योजकांचा देव झाला. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांस खेटून उभ्या, गडद केशरी रंगाच्या हजारो टोरींनी (प्रवेशद्वारांनी) बनलेला बोगदा. मंदिराच्या या टोरी म्हणजे नवसपूर्तीचं प्रतीक. उत्तराखंडातील गोलूदेवतेच्या मंदिरात मी, नवसपूर्तीच्या लहान-मोठ्या हजारो पितळी घंटा लटकवलेल्या पाहिल्या होत्या त्याची आठवण झाली.
मंदिराच्या आवारात आपल्याला कोल्ह्यांच्या दगडी मूर्ती पाहायला मिळतात. हे आहेत इनारी या धान्य देवतेचे दूत. कुणाच्या तोंडात भाताची लोंबी; तर कुणाच्या तोंडात भाताच्या गोदामाची भली थोरली चावी. पूर्वीच्या काळी जपानमध्ये भात हेच धन समजलं जात असे. काही कोल्ह्यांना एकापेक्षा अधिक शेपट्या. त्या बल आणि बुद्धीच्या द्योतक. एका कोल्ह्याच्या गळ्यात मवाली गुंडानं बांधवा तसा लाल स्कार्फ अडकवलेला होता. ते फडकं दुष्ट प्रवृत्तीच्या मवाल्यांना आणि दुर्धर आजारांना पळवून लावण्यासाठी बांधलेलं असतं हे कळल्यावर त्या विरोधाभासाची गंमत वाटली.
क्योटोपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या नारा या गावी बुद्धाचं प्रचंड मोठं लाकडी मंदिर आहे. या ‘तोडायजी’ मंदिरातील बुद्धाची मूर्ती पंधरा मीटर उंच आहे. म्हणून त्याला म्हणतात ‘जायंट बुद्ध’! प्रवेशद्वारावर कोरलेल्या डावी-उजवीकडील रक्षकांच्या मोठाल्या राक्षसी मूर्ती पाहून हबकून गेलेल्या आम्हाला गाईड म्हणाला, “गाभाऱ्यातील बुद्धाची मूर्ती पाहिलीत की या मूर्ती खेळण्यातल्या वाटतील तुम्हाला.” आता मात्र गाभाऱ्यातील जायंट बुद्धाला पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आत प्रवेश करताच मान वर करून पाहिलं आणि कमलासनावर बसलेल्या बुद्धाच्या महाकाय ब्रॉन्झ मूर्तीचं दर्शन घडलं. असं वाटलं आपण भगवंताचं विराट रूप पाहतोय. आपण आपोआप नतमस्तक होतो. ७५२ साली बांधलेल्या या मंदिरातील मूळ मूर्ती बाराव्या शतकात लागलेल्या आगीत भस्म झाली. आताची ही मूर्ती सतराव्या शतकात बनवलेली आहे. डावीकडून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि एका लाकडी खांबापाशी बरीच गर्दी पाहून उत्सुकतेपोटी तिथेच थबकले. खांबाच्या तळाशी असलेल्या छिद्रातून अंगाचं मुटकुळं करून लोक आरपार जाण्याचा प्रयत्न करत होते. चौकशीअंती कळलं की त्या छिद्राचा आकार महाकाय बुद्धाच्या नाकपुडीएवढा आहे. जो त्याच्यातून पार झाला त्याला मोक्षप्राप्ती निश्चित!
कान, डोळे आणि तोंड आपल्या तळव्यांनी झाकून घेणारी गांधीजींची तीन सदाचारी माकडं आम्हाला जपानमधील निक्को शहरातील ‘तोषूगु’ या चारशे वर्षं जुन्या बुद्ध मंदिरातील शिल्पात पाहायला मिळाली तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. गांधीजींना ही कल्पना बहुदा बुद्धाच्या शिकवणुकीतून मिळाली असावी. तिथे माकडांच्या जीवनातली आठ टप्पे दाखवणारी एकूण आठ शिल्प आहेत. हे तोषूगु मंदिर बांधलं गेलं तेव्हा त्याकाळी उपलब्ध असलेलं उच्च प्रतीचं बांधकाम तंत्र उपयोगात आणलं गेलं होतं. एक लाख सत्तावीस हजार कारागीर ते मंदिर सुशोभित करण्यात दिवसरात्र खपत होते. त्याच्या प्रवेशद्वाराला नाव आहे ‘संधिप्रकाश द्वार’! पाचशे शिल्प असलेलं त्याचं सौंदर्य निरखताना कधी संध्याकाळ होऊन जाईल त्याचा पत्ता लागणार नाही म्हणून हे समर्पक नाव. मंदिराच्या आवारातील वास्तूंवर असलेल्या अनेक शिल्पांपैकी एक आहे हत्तीचं. या शिल्पकाराने त्याच्या उभ्या आयुष्यात कधी हत्ती पाहिलेला नव्हता. त्याच्या कल्पनेतल्या हत्तीला सोंड होती आणि वाघनखंसुद्धा! गर्दी खेचणारं अजून एक शिल्प आहे निद्राधीन मनीमाऊचं. इडो राजाच्या थडग्याकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर ही मनीमाऊ पहुडली आहे आणि त्याच्या मागच्या बाजूस कोरले आहेत पंख पसरून आनंदात उडणारे पक्षी. मांजराचं भक्ष्य असलेल्या या पक्ष्यांवर भीतीचं किंचितही सावट नाही. याचा गर्भितार्थ असा की इडो राज्याच्या काळी प्रजा निर्भयतेने नांदत असे. या मांजराचं शिल्प हुबेहुब घडावं म्हणून हिदारी जिंगोरो या महान शिल्पकाराने आठ महिने एक मांजर पाळून दिवसरात्र त्याचं निरीक्षण केलं होतं. एका शिल्पासाठी किती ही साधना आणि निष्ठा!
‘कियुमिझु डेरा’ नावाचं डोंगरावरील प्रशस्त बुद्धमंदिर प्रसिद्ध आहे ते त्याच्या पुढे आलेल्या लाकडी वऱ्हांड्यामुळे. डोंगराच्या कड्यावर बांधलेल्या या मंदिराच्या वऱ्हांड्यात जाण्यास सुरक्षा कारणास्तव आता बंदी आहे. मंदिराच्या शेजारून एक खळाळता धबधबा वाहतो. त्या धबधब्याच्या पाण्याची मोठी मजेदार कथा आहे. त्याची संततधार तीन पन्हाळीतून खाली पडत असते. त्या प्रत्येक धारेच्या पाण्याला वेगवेगळं महत्त्व आहे. पहिल्या पन्हाळीतून पडणाऱ्या धारेचं पाणी प्राशन केलं तर मिळतं दीर्घायुष्य, दुसऱ्यामुळे यशप्राप्ती आणि तिसरी धारा देते प्रेमसाफल्य! तिथे भाविकांची मोठी रांग लागली होती. आपल्या इच्छेनुसार त्यांचं जलप्राशन चालू होतं. इथे एका वेळी एकाच धारेचं पाणी प्यायचं असतं. तिन्ही धारांचं जलप्राशन करणारा लोभी म्हणवला जातो. कियुमिझूचा अर्थ आहे शुद्ध जल. पहिल्या पन्हाळीतून पडणाऱ्या धारेचं तीर्थ घेऊन आणि दीर्घायुष्याचं वरदान पदरात पाडून आम्ही तिथून निघालो.
जपानमधील मंदिरं, मंदिरांच्या आख्यायिका आणि आजूबाजूचा परिसर यात जसं वेगळेपण आहे तसंच या मंदिराच्या आसपास असलेल्या काही विशिष्ट जागांचंही. तेन्यूजी मंदिराच्या बाहेर आलो की आपण एका बांबूच्या वनात शिरतो. हे काही दाट वन नाही. दोन्ही बाजूला आकाशाला भिडणारे हिरवेगार बांबू आणि त्या कमानीखालून जाणारी ही वाट. मान काटकोनात वर केली तरच त्या बांबूच्या झाडांचे शेंडे दिसतात. गुडघ्यावर बसत कॅमेरा वाकडातिकडा करून, सेल्फी स्टिक वापरून ते संपूर्ण चित्र कॅमेऱ्यात कैद करण्याचा निष्फळ प्रयत्न आम्ही केला. किमोनो घातलेली एक ललना छोटी छोटी पावलं टाकत आमच्यासमोरून तुरूतुरू चालत गेली. तिचा जोडीदारही सोबत होता. थोड्या वेळाने एक लालचुटुक हातरिक्षा आली आणि ती दोघं त्यात चढून बसली. ते हिरवागार बांबूचं बन, त्याच्या पानांची सळसळ, सूर्य क्षितिजाकडे कलायची वेळ, लालचुटुक हातरिक्षा आणि त्यात बसलेलं ते जपानी जोडपं. अगदी एखाद्या भेटकार्डावर रेखाटलेलं हुबेहुब चित्र.
किंकाकुजीचं भावंड गिंकाकुजी - रौप्यमंदिर! मंदिराच्या चढावाच्या रस्त्याला लागायच्या आधी उजवीकडे एक रस्ता आहे. ओढ्याला समांतर, चेरीच्या डवरलेल्या झाडांच्या सोबतीनं जाणारा हा शांत रस्ता म्हणजे निवांत फेरफटक्यासाठी उत्तम जागा. एक जपानी तत्त्वचिंतक विचारांच्या तंद्रीत विमनस्क अवस्थेत एकटाच या रस्त्यावरून फिरत असे. ‘चिंता करितो विश्वाची!’ तेव्हापासून या रस्त्याचं नाव पडलं ‘फिलॉसॉफर्स पाथ’! दीड-दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून चालल्यानंतर आम्हाला या तत्त्वचिंतकाच्या पावलावर पाऊल टाकल्याचं समाधान लाभलं.
वर्षाच्या पहिल्या दिवशी बेधुंद अवस्थेत उशिरापर्यंत लोळत पडण्यापेक्षा सकाळी मंदिरांपुढे रांगा लावणाऱ्या या उगवत्या सूर्याच्या देशातील भाविक प्रजेने माझं मन जिंकून घेतलं.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com