बुक कट्टा
ललित, वंचित, शोषित, पीडितांचे अश्रू पुसणारा सहृदयी कार्यकर्ता, आपल्या मिश्किल कवितांमधून सर्वांना हसत ठेवणारा आपला माणूस, समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवणारा संघर्षशील नेता म्हणजे रामदास आठवले. ते सतत जनसामान्यांचे राम-दास म्हणून कार्यरत राहिले. दलित पँथरचा संघर्षमय काळ असो, की मराठवाडा नामांतराची चळवळ असो, त्यांच्या भोवतीचे कार्यकर्त्यांचे मोहोळ सदैव कायम राहिले. शोषित समूहाच्या भीमगीतांना प्रोत्साहन देऊन त्यांनी सामाजिक-सांस्कृतिक भान जपले. दलित चळवळ गटातटात विखुरली गेलेली असताना ‘रिपब्लिकन ऐक्य’ घडविण्यासाठी त्यांनी मंत्रीपद सोडण्याची तयारीही वेळोवेळी दर्शवली.
‘ऐक्य’ झाले नाही म्हणून त्यांच्यातील कार्यकर्ता थांबला नाही. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी भाजप-शिवसेना यांच्याशी मैत्री करीत ते पुढे जात राहिले. बदलत्या राजकीय प्रवाहातही आपले राजकीय अस्तित्व टिकवून सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याची कामगिरी त्यांनी चोख बजावली. अशा या संघर्षशील नेत्याने आपल्या संवादातून समाजमन केवळ जोडलेच नाही, तर ते टिकवलेही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर सातत्याने उमटवली. त्यामुळेच त्यांच्या सहवासातील काही कार्यकर्त्यांना सत्तेची फळे चाखता आली.
प्रवीण मोरे, चंद्रमणी जाधव यांनी संपादित केलेल्या ‘सहवासातले आठवले’ या पुस्तकामध्ये अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, सुरेश बारसिंग, सुधीर मुनगंटीवार, महादेव जानकर, संजय बनसोडे, वामन होवाळ, सुहास सोनवणे यांच्यासह जवळपास ८२ जणांनी आपले मनोगत मांडले आहे. तसेच रामदास आठवले यांच्या जीवनातील ठळक प्रसंगही छायाचित्राच्या माध्यमातून उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे हे पुस्तक आपल्या संग्रही असावे, असे त्यांच्या प्रत्येक चाहत्याला वाटेल, हे निश्चित.
पुस्तकाचे नाव : सहवासातले आठवले
लेखक : प्रवीण मोरे, चंद्रमणी जाधव
प्रकाशक : विनिमय पब्लिकेशन
मूल्य : रुपये ५००.