गोष्ट
प्रेमा खांडवे
मामाच्या गावाला जायला नाखूष असलेल्या चिंटूला तिथे मिळालं असं सरप्राईज, की सुट्टीच त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरली!
“शाळा संपली, सुट्टी लागली,
आई, जाऊ ना गं बाहेरगावी!
झुकझुक गाडी नेईल गं गावी,
बघेन मी मग दुनिया न्यारी!”
चिंट्याने गाणं गात आईभोवती गिरकी घेतली आणि आरोळी ठोकली, “हुर्रे! शाळेला उन्हाळ्याच्या
सुट्ट्या लागल्या!”
“अरे, हो हो चिंट्या! किती नाचशील?”
“आई, तुला सांगून ठेवतो, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मामाच्या
गावी खेड्यावर येणार नाही. मला तिथे अजिबात करमणार नाही. ते खेडं एकदम बोअर! आपण छान
दुबईला जाऊ.”
“चिंट्या, अरे दुबईला जायला विमानाने जावं लागतं. विमानाच्या तिकिटांसाठी पैसे कुठून आणायचे,
सांग बरं?”
“अगं, बाबा देतील ना तिकीट काढून!”
“अरे, पण तिथे राहायचं कुठे?
तिथे आहे का कोणी आपलं?”
चिंटू विचारात पडला. खरंच, दुबईला आपलं कोणीच राहत नाही. आपले लाड करणारा मामा तर खेडेगावी आहे. त्या खेडेगावात जाणं आपल्याला बोअर वाटतं. आता काय करायचं?
मागच्या वेळी आपण मामाच्या गावी गेलो होतो, तेव्हा मामाने आपले किती लाड केले होते, हे चिंटूला आठवलं.
इकडे आईची बडबड सुरूच होती, “मामा एवढ्या प्रेमाने बोलावतो आणि तू त्याच्याकडे जायला कंटाळवाणं वाटतं असं म्हणतोस?”
यावर चिंटू महाराजांची बोलतीच बंद झाली. त्यालाही आठवलं की मागच्या वेळी मामाने आपले किती लाड केले होते. शेवटी एकदाचा चिंटू मामाच्या गावी जायला तयार झाला.
स्टेशनवर गाडी पोहोचली, तेव्हा मामा बैलगाडी घेऊन त्याला घ्यायला आला होता. मामाने छोटीशी, सुंदर सजवलेली बैलगाडी आणली होती. बैलगाडीला जुंपलेले पांढरे शुभ्र, तगडे बैल गाडीला शोभून दिसत होते. त्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा घंटानाद कानाला गोड लागत होता. बैलगाडीत कापसाच्या मऊ गाद्या घातल्या होत्या. बैलगाडीचं छत सुंदर कलाकुसर केलेलं आणि छोटे छोटे आरसे लावलेलं असल्यामुळे देखणं दिसत होतं.
बैलगाडी बघताच चिंटूच्या तोंडून शब्द निघाले, “अरे वा मामा, किती सुंदर बैलगाडी आहे ही!”
“आवडली ना? तुझ्यासाठी छान सजवून आणली बघ! तुझ्या कारपेक्षा छान आहे की नाही?”
“होय मामा, मला खूप आवडली!”
चिंटू महाराजांची गाडी एकदम खुश झाली आणि इकडे आईने समाधानाचा सुस्कारा टाकला. चला, चिंटूची कळी एकदाची खुलली!
घरी गेल्यावर मामीने चिंटूचं औक्षण केलं. भाकरतुकडा ओवाळून टाकला. चिंटूला आपलं जंगी स्वागत झालेलं बघून खूपच आनंद झाला. मामीने जेवणात पुरणपोळी केली होती. मग काय विचारता! चिंटूने जेवणावर असा आडवा हात मारला की विचारता सोय नाही. वरून म्हणतो कसा, “मामी, माझ्या आईला तुझ्यासारखी पुरणपोळी करता येत नाही. तुझी पुरणपोळी खूपच छान झाली आहे!”
“चिंटोबा, ही तर नुसती सुरुवात आहे. उद्यापासून बघा, आम्ही तुम्हाला आमच्या गावचं काय काय छान छान खाऊ घालतो ते!”
“हो रे मामा, खाण्याचं ठीक आहे रे; पण मी उद्यापासून दिवसभर काय करीन? मला बोअर होईल ना,
त्याचं काय?”
“चिंटोबा, तुला बोअर होणारच नाही. बरं, त्याची मी अगदी योग्य सोय केली आहे. ते आमचं बहीण-भावांचं गुपित आहे. ते सरप्राईज तुला
उद्याच कळेल.”
“ए मामा, सांग ना रे, काय सरप्राईज आहे? आई, तू तरी सांग ना गं!” असं म्हणतच चिंटू झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी खेड्यातील प्रसन्न पहाट चिंटूला सुखावून गेली. पहाटेचा शीतल वारा, पक्ष्यांचा मंजुळ आवाज, गोठ्यातील जनावरांच्या गळ्यातील घंटांचा गोड नाद, हे सारंच चिंटूला खूप आवडलं.
खरंच, खेड्यातील पहाट किती सुंदर असते ना! नाहीतर आपली शहरातली सकाळ! सकाळी सकाळी रस्त्यावरील वाहनांचे कर्कश हॉर्न, लिफ्टचा खडखडाट, दूधवाले आणि पेपरवाले यांचं कर्कश स्वरातलं ओरडणं!
“चिंटू महाराज, चला, लवकर आंघोळ वगैरे करून तयार व्हा. आपल्याला आमराईत जायचं आहे!” मामाची हाक आली.
“हो मामा, आलोच!” असं म्हणत चिंटू आंघोळ करून, व्यवस्थित कपडे घालून तयार झाला.
जायला कालचीच बैलगाडी होती. अर्ध्या तासात सारे आमराईत पोहोचले. मामाने चिंटूला सारी आमराई दाखवली. आंब्याचे वेगवेगळे प्रकार पाहून चिंटू तर आश्चर्यचकितच झाला.
आमराईत एका ठिकाणी आठ-दहा आंब्यांच्या झाडांचा एक मोठा गोल तयार झाला होता. गर्द झाडीच्या त्या गोलात एक खुर्ची, टेबल, बाजूला फळा, डस्टर आणि खडू ठेवले होते. फळ्यासमोर काही डेस्क-बेंच लावले होते. त्यांवर पंधरा-वीस म्हातारी माणसं बसली होती. चिंटूच्याच वयाची पाच-सहा मुलं रांगेने उभी होती.
मामा म्हणाला, “चिंटू महाराज, ही तुमची शाळा! तुम्हाला पंधरा दिवस चालवायची आहे. ही समोरची माणसं तुमचे विद्यार्थी बरं का! या सर्वांना तुम्हाला लिहिणं-वाचणं शिकवायचं आहे. काय, कशी वाटली तुमची औटघटकेची शाळा आणि तुमचे विद्यार्थी? हेच तुमचं सरप्राईज
बरं का!”
आश्चर्याच्या धक्क्याने गोंधळलेला चिंट्या उद्गारला, “मामा, मी शिकवायचं या सर्वांना?”
“हो तर! तू एक हुशार मुलगा आहेस ना? मग हे तुझ्यासाठी एक आव्हान आहे, समजलं?”
आनंदाने हरकून गेलेला चिंटू उद्गारला, “हो मामा, मी नक्की करीन!”
बघता बघता पंधरा दिवस कसे निघून गेले, ते चिंटूला समजलंच नाही. अखेर जायचा दिवस उजाडला. निरोपाच्या दिवशी सर्व वृद्धांनी गहिवरून म्हटलं, “चिंटूबाबा, तुमचे लय उपकार झाले! तुमच्यामुळे आम्ही लिहायला-वाचायला शिकलो. आमचं शिकण्याचं स्वप्न तुम्ही आमच्या म्हातारपणी पूर्ण केलं.”
चिंटूच्या साऱ्या शिष्यांनी त्याच्यासाठी काही ना काही भेट आणली होती. ते बघून चिंटूला तर गहिवरूनच आलं.
चिंटू जाण्यासाठी बैलगाडीत बसला, तेव्हा मामाने विचारलं, “काय चिंटोबा, कशी झाली तुमची आमच्या गावची सहल? तुमचा बोअरपणा, कंटाळलेपणा गेला की नाही?”
चिंटू गहिवरल्या स्वरात उद्गारला, “हो रे मामा, मला माझी चूक कळली रे! आता पुन्हा अशी चूक नाही होणार. मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी येईन आणि गावाच्या कल्याणाचं काही ना काही काम करीन. मला इथे कंटाळा येतो, असं कधीच म्हणणार नाही!”
“बाय-बाय, चिंटू!” असं म्हणत गावातील सर्वांनी हात हलवून चिंटूला निरोप दिला.
ज्येष्ठ लेखिका
premakhandwe8@gmail. com