अजब निसर्ग
मकरंद जोशी
सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा स्वयंप्रकाशी स्रोत असला, तरी त्याच्याशिवायही निसर्गात अनेक जीव आणि बुरशी स्वतःचा प्रकाश निर्माण करतात. काजव्यांच्या लुकलुकत्या रोषणाईपासून ते समुद्राच्या अथांग गाभाऱ्यातील प्रकाशमान जिवांपर्यंत ‘बायोल्युमिनसेन्स’चे हे अद्भुत जग विज्ञानाइतकेच रोमांचक आहे.
निसर्गातील स्वयंप्रकाशी म्हटल्यावर कोणालाही चटकन फक्त सूर्याचेच नाव आठवले तर त्यात चूक काहीच नाही. आपल्या ग्रहमालेतील एकमेव तारा असलेला सूर्य त्याच्या प्रकाशाने आपल्या पृथ्वीला तर उजळून टाकतोच, शिवाय पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रालाही प्रकाशमान करतो. त्यामुळे आपल्यासाठी स्वयंप्रकाशी हे विशेषण फक्त सूर्यालाच लावले जाते. मात्र या सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवर निर्माण झालेल्या सृष्टीत, या निसर्गात याच सूर्याचे अगदी लहान स्तरावरील प्रतिस्पर्धी निर्माण झालेले आहेत जे स्वतःपुरता का होईना पण थोडासा प्रकाश निर्माण करू शकतात. आता हे वर्णन वाचल्यावर मात्र पावसाळ्याच्या सुरुवातील अवतिर्ण होणारे आणि आपल्या चमचमत्या प्रकाशाची रोषणाई करून निसर्गातील झाडांना लायटिंग करणारे काजवे नक्की आठवले असतीलच.
काजवे हे बीटल्स म्हणजे ढाल किड्यांच्या गटाचे सभासद आहेत. कॉलिओप्टेरा गणात (ऑर्डर) येणाऱ्या या किटकांच्या सुमारे दोन हजार जाती जगभरात आढळतात आणि त्यातल्या बहुसंख्य प्रकाशमान होणाऱ्या असतात. त्यांच्या कुळाचे म्हणजे फॅमिलीचे नावच ‘लॅम्पिरिडे’ म्हणजे ‘शायनिंग फायर’ असे आहे. इतर अनेक किटकांप्रमाणे काजव्यांच्याही ‘अंडी, अळी, कोश आणि कीटक’ अशा चार अवस्था असल्या तरी यातील अळी आणि प्रौढ कीटक अवस्थेतच ते स्वयंप्रकाशी असतात. उत्क्रांतीच्या चक्रामध्ये ‘लॅम्पिरिडे’ कुळातील अळ्यांना हा प्रकाश लाभला तो एक प्रकारे धोक्याचा इशारा म्हणून- ‘या अशा प्रकाशमान अळ्या खाण्यास योग्य नाहीत’ हे इतर किटकांना समजण्यासाठी पण पुढे प्रौढावस्थेत जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी या प्रकाशाचा उपयोग होईल म्हणून मग प्रौढ किटकांनाही हा प्रकाश लाभला. सर्वसाधारणपणे काजव्याचे नर आणि मादी दोघेही स्वयंप्रकाशी असतात, मात्र नरांना पंख असतात, त्यांचे डोळे पूर्ण विकसित झालेले असतात, तर माद्यांना पंख नसतात, त्यांचे डोळे कमी विकसित असतात. काजव्यांचा प्रकाश पांढरा, पिवळा, नारिंगी, हिरवा, तांबडा किंवा निळा असतो. काजव्यांच्या शरीरात हा प्रकाश ‘बायोल्युमिनसेन्स’ या रासायनिक प्रक्रियेमुळे तयार होतो. ही प्रक्रिया काही सागरी जीवांमध्ये आणि फंगी म्हणजे बुरशीमध्येही पाहायला मिळते. काजव्यांच्या पोटावर आतल्या बाजूला प्रकाशपेशींचा जाडसर स्तर असतो, या पेशींमध्ये ल्युसिफेरिन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज विकरांच्या सान्निध्यात ऑक्सिजनशी संयोग पावते आणि हा प्रकाश निर्माण होतो. मात्र अन्य प्रकाशासारखा (सूर्यप्रकाश किंवा लाकडे जाळून मिळणारा प्रकाश) हा उष्ण नसतो. काजव्यांचा प्रकाश थांबून थांबून पडतो. त्यामुळे एकाचवेळी हजारो काजवे प्रकाशमान झाले की तो परिसर लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईने उजळल्यासारखा दिसतो. प्रौढ काजव्यांना सहसा अन्नाची आवश्यकता नसते, मात्र काजव्यांच्या अळ्या प्रामुख्याने गोगलगाई खातात. नर मादीचे मिलन झाल्यानंतर नर मरण पावतात. मादी अंडी घालून मरते, त्यातून २० दिवसांनी अळ्या बाहेर येतात. अळ्यांची वाढ संथ गतीने- वर्ष-दीड वर्षाच्या काळात होते. नंतर त्या कोशावस्थेत जातात. कोशातून प्रौढ कीटक दोन एक आठवड्यात बाहेर येतात आणि आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करू लागतात.
निसर्गातील आणखी एक स्वयंप्रकाशी गोष्ट म्हणजे काही विशिष्ट जातीच्या फंगी अर्थात बुरशी. विशेषतः भरपूर पावसाच्या प्रदेशांमधील झाडांच्या खोडावर, ओंडक्यांवर वाढणाऱ्या बुरशीमधील काही प्रकार हे ‘बायोल्युमिनसेन्स’ म्हणजे स्वयंप्रकाशी प्रकारातले असतात. महाराष्ट्रातील आंबोली, भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, वानोशी, तिलारी येथील जंगलामध्ये ही रात्रीच्या अंधारात मंदपणे चमकणारी बुरशी पाहायला मिळते. जगभरात अशा बायल्युमिनसेंट फंगीचे सुमारे १०५ प्रकार आजपर्यंत नोंदवण्यात आलेले आहेत. ‘अगॅरिकल्स’ या ऑर्डरमध्ये प्रामुख्याने अशा चमकणाऱ्या स्वयंप्रकाशी बुरशीचा समावेश होतो. यातील ‘जॅक ओ लॅन्टर्न’ मशरुम ही विषारी (खाण्यास अयोग्य) असते. त्यामुळेच काजव्यांच्या अळ्यांच्या बाबतीत त्यांचा प्रकाश जसा धोक्याचा इशारा असतो तसाच या मशरुम्ससाठीही असतो असं म्हणता येईल. काजव्यांप्रमाणे या बुरशीचा प्रकाश लुकलुकणारा नसतो तर कायम असतो, मात्र हा मंद हिरवा प्रकाश पाहायला डोळे सरावलेले असावे लागतात. या स्वयंप्रकाशी बुरशीला आपले परागीभवन घडवून आणण्यासाठी किटकांना आकर्षित करायला हा प्रकाश उपयोगी पडतो.
स्वयंप्रकाशी प्राण्यांमध्ये सागरातील काही जीवांचा समावेश होतो. स्क्विड, काही प्रकारचे मासे, सी ककुंबर याबरोबर सागरातले काही सूक्ष्म जीवही प्रकाशमान असतात. याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे ‘ॲन्गलर फिश’ हा मासा. या माशाच्या डोक्यावर एखाद्या लटकत्या काठीसारखा एक अवयव असतो. या माशांमधल्या फक्त मादी माशांकडेच प्रकाशमान होण्याची क्षमता असते. या माद्या तरुण असताना प्रकाशमान नसतात. तेव्हा त्या सागराच्या पाण्यातील स्वयंप्रकाशी बॅक्टेरियांना आकर्षित करून आपल्या कल्ल्यांमध्ये जागा देतात. या बॅक्टेरियांना पुरेसे अन्न आणि ऑक्सिजन पुरवून सांभाळतात. त्यामुळे या स्वयंप्रकाशी बॅक्टेरियाच्या मदतीने त्यांना आयते दिवेच मिळतात, ज्याच्या प्रकाशात त्यांना अन्न शोधणे सोपे जाते.
सागरातील ‘जेली फिश’देखील स्वयंप्रकाशी असतात. जगभरात सापडणाऱ्या जेली फिशच्या एकूण प्रकारांपैकी सुमारे पन्नास टक्के जेली फिश बायल्युमिनसेंट असतात. ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’, ‘मेड्युसा’ असे काही प्रकार त्यांच्या आकर्षक प्रकाशासाठी प्रसिद्ध आहेत. प्रकाशनिर्मितीसाठी त्यांना त्यांच्या शरीरातील काही खास प्रकारच्या पेशी आणि प्रोटिन्सची मदत होते. जेली फिशच्या शरीरात असलेल्या ल्युसिफेरीनचा ऑक्सिजनशी संयोग झाला की प्रकाश निर्मिती होते. जेली फिशच्या जातींनुसार या प्रकाशाचा रंग बदलतो. जेली फिश निळसर किंवा हिरवट रंगाचा प्रकाश निर्माण करताना दिसतात. कारण हेच रंग खोल सागरातील पाण्यात दूरपर्यंत पोहोचू शकतात. सागराच्या अंतर्भागातील अंधारात भक्ष्याला आकर्षित करणे, जोडीदार मिळवणे, शिकाऱ्यांपासून बचाव करणे अशा विविध कारणांसाठी या प्रकाशाचा वापर केला जातो. समुद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो किलोमीटर आतमध्ये जिथे सूर्याचे किरण पोहोचूच शकत नाहीत तिथे जेली फिश आपल्या प्रकाशाने जणू उजेड पसरवतात.
त्यामुळे महासागरापासून ते जंगलातल्या लाकडाच्या ओंडक्यापर्यंत निसर्गातील स्वयंप्रकाशी गोष्टी पाहायला मिळू शकतात, मात्र त्यासाठी तुमच्याकडे ती नजर हवी आणि निसर्गाशी जवळीक हवी.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com