अक्षररंग

चुकण्याची संधी देऊ या..

शिक्षण म्हणजे फळ्यावर लिहिलेल्या ओळी, वहीत उतरवलेली उत्तरं किंवा परीक्षेत मिळवलेले गुण एवढंच नसतं. शिक्षण म्हणजे मुलांच्या मनात उमलणारी भीतीमुक्तता, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि चुकून शिकण्याची हिंमत. ही हिंमत जिथे मिळते, तिथेच खरं शिक्षण घडतं.

नवशक्ती Web Desk

शिक्षणगुज

युवराज माने

शिक्षण म्हणजे फळ्यावर लिहिलेल्या ओळी, वहीत उतरवलेली उत्तरं किंवा परीक्षेत मिळवलेले गुण एवढंच नसतं. शिक्षण म्हणजे मुलांच्या मनात उमलणारी भीतीमुक्तता, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि चुकून शिकण्याची हिंमत. ही हिंमत जिथे मिळते, तिथेच खरं शिक्षण घडतं.

मुलांना गुरुजी आवडायला लागले की एक वेगळंच विश्व उघडतं. लेकरं मनातलं सगळं सांगू लागतात—आज काय जमलं, काय अडलं, काय आवडलं, काय नाही. गणितात अडखळलेली पायरी, इंग्लिशमधला न समजलेला शब्द, मित्राशी झालेला वाद, घरी आलेली अडचण—सगळं काही. अशा वेळी गुरुजी केवळ विषय शिकवणारे राहत नाहीत; ते मुलांचे विश्वासू साथीदार बनतात.

गुरुजींनाही जेव्हा स्वतःची खरी ताकद कळते, तेव्हा शिक्षणाचं रूप बदलतं. आपण केवळ शिकवण्यासाठी नाही, तर मुलांना संधी देण्यासाठी इथे आहोत ही जाणीव झाली की गुरुजी आपली जादू लेकरांमध्ये उतरवतात. ही जादू म्हणजे फळ्यावरचे उत्तर नाही, तर मनात निर्माण होणारा आत्मविश्वास असतो.दोन्ही बाजूंनी असा प्रयत्न झाला की शिकणं मजेचं होतं. वर्गात हशा असतो, प्रश्न असतात, चुका असतात—आणि त्या चुकांमधून उगवणारं ज्ञानही असतं.

मी प्रत्येक लेकराला संधी देतो. ही संधी म्हणजे—समोर उभं राहून बोलण्याची, फळ्यावर लिहिण्याची, मित्रांना समजावून सांगण्याची, सूत्रसंचालन करण्याची, प्रतिक्रिया मांडण्याची. संधी मिळाल्यावर लेकरं ती आजमवतात. आणि हो, ती चुकतात. पण त्या एका चुकीच्या बदल्यात जी शिकवण मिळते, ती कोणत्याही पाठ्यपुस्तकात सापडत नाही.

संधीचं सोनं करताना समोर कृती करणारा विद्यार्थी चुकला, तर खाली समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी त्या चुकीतून शिकतो. एक चूक—शंभर डोळ्यांनी पाहिलेली, शंभर मेंदूंनी विचारलेली. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ही म्हण वर्गात रोज अनुभवायला मिळते.

आता चुकण्याची संधी कशी उपयुक्त थाऱ्येवत्याची काही उदाहरणे  पाहू...

कल्याणीचा धडा – शंभरांचा पाठ

“चला आव्हान स्वीकारू” या उपक्रमांतर्गत कल्याणीने आपल्या मित्रांना सर्व tense समजावून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं. तिने simple present tense (S + V1 + O) ही रचना अत्यंत आत्मविश्वासाने मांडायला सुरुवात केली. हसत-खेळत उदाहरणं दिली. पण लिहिताना ती काही ठिकाणी अडखळली. काही अक्षरं चुकली, काही वाक्यरचना विस्कळीत झाली.

त्या क्षणी मी तिला थांबवलं नाही. वर्गही थांबला नाही. सगळ्यांनी निरीक्षण केलं. चर्चा झाली. दुरुस्ती झाली.

कल्याणी एकटी चुकली, पण त्या एका चुकीतून समोर बसलेल्या शंभर विद्यार्थ्यांना नवा पाठ मिळाला. आणि कल्याणी? ती आज अधिक ठामपणे म्हणू शकते—मी चुकले, पण मी शिकले.

ईश्वरीची पहिली भीती, आजचा आत्मविश्वास

ईश्वरी वर्ग पहिलीत असताना फळ्याजवळ उभी राहायला घाबरायची. आवाज थरथरायचा. पण तिलाही संधी दिली. चुका झाल्या. शब्द अडखळले. आज तीच ईश्वरी आत्मविश्वासाने प्रास्ताविक करते, निवेदन सादर करते. ती चुकली म्हणूनच आज न घाबरता बोलू शकते.

साक्षी आणि खुशी – चुकांतून उलगडलेली भाषा

साक्षीला लेखनाची भीती होती. खुशीला इंग्लिशमधील वाक्यरचना गोंधळात टाकायची. दोघींनाही लिहिण्याची, वाचण्याची, बोलण्याची संधी दिली. चुका झाल्या. दुरुस्त्या झाल्या. आज त्या प्रतिक्रिया देताना, परीक्षण करताना सहज व्यक्त होतात.

प्रयास, प्रतीक आणि गणिताची भीती

प्रयास आणि प्रतीक गणितात चुकले. फळ्यावर उत्तरं चुकली. पण त्या चुकांवर चर्चा झाली. चूक कुठे झाली? का झाली? हा प्रश्न विचारायला शिकले. आज गणित त्यांच्यासाठी भीती न राहता खेळ बनलं आहे.

कोमल, काजल, अजय, शीतल - संधीची बीजं

कोमलच्या सादरीकरणात शब्द चुकले. काजलच्या भाषणात मुद्दे विसरले गेले. अजयच्या सूत्रसंचालनात गोंधळ झाला. शीतलच्या निवेदनात थांबे आले. पण कुणालाही मागे बसवलं नाही. प्रत्येकाला पुन्हा संधी दिली.

आज हीच लेकरं आत्मविश्वासाने व्यासपीठ पेलतात.

गणित, इंग्लिश, विचारपीठ, सूत्रसंचालन, भाषण, प्रास्ताविक, निवेदन, परीक्षण, प्रतिक्रिया, सादरीकरण—अशा अनेक अंगांनी मी लेकरांना संधी दिली. शिकताना आनंद घेण्याची मुभा दिली. चुकण्याचा अधिकार दिला. आणि यातूनच माझी लेकरं समृद्ध झाली.

आज त्यांच्या गुणवत्तेकडे पाहिलं की मन भरून येतं. वाटतं—बरं झालं, मी त्यांना चुकण्याची संधी दिली.

शिक्षणगूज संदेश : खरंतर, चुकण्याची संधी देणं म्हणजे शिकण्याच्या हजारो वाटा खुल्या करून देणं होय. जिथे चूक मान्य आहे, तिथे शिकणं जिवंत असतं. आणि जिथे शिकणं जिवंत असतं, तिथे भविष्य उज्ज्वल असतं.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात

yuvrajmane892@gmail.com

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST च्या भाडेवाढीचा गणेशभक्तांना फटका; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"