अजब निसर्ग
मकरंद जोशी
अफाट निसर्गाच्या पसाऱ्यात प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी काही विशेष वरदानं मिळाली आहेत. यात सर्वात महत्त्वाचे ठरतात ते म्हणजे डोळे, ज्यांच्या अजब रचनेमुळे प्राणी या जगाकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतात.
सर्वसाधारणपणे सगळ्या सजीवांना निसर्गाने समान ज्ञानेंद्रिये दिलेली आहेत. म्हणजे सस्तन प्राणी असोत किंवा पक्षी किंवा कीटक सगळ्यांना तोंड, नाक, कान, डोळे ही इंद्रिये असतात. आता अपवाद म्हणून काही गट आहेत ज्यांना यातलं एखादं ज्ञानेंद्रिय नसतं, उदाहरणार्थ सरपटणारे साप; सापांना बाह्यकर्ण नसतात, त्यामुळे आपल्याला जसे हवेच्या माध्यमातून आवाज ऐकू येतात तसे सापांना येत नाहीत. त्यांना व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंदनांमधून आवाज कळतात. पण ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत, त्यातही डोळ्यांच्या बाबतीत सर्वात जास्त गमतीजमती पाहायला मिळतात त्या ‘इनव्हर्टिब्रेट्स’ म्हणजे कणाहीन प्राण्यांच्या गटात. कणा असलेल्यांच्या गटात पक्षी असो किंवा साप, मासा असो किंवा माकड, डोळे दोनच असतात. पण बिनकण्याच्या गटामध्ये मात्र डोळ्यांची संख्या काहीवेळा आपल्या कल्पनेबाहेर बघायला मिळते. संधीपाद वर्गातील, आपल्या शरीरातून तंतू बाहेर काढून त्याचे जाळे विणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोळ्याला जसे इतरांपेक्षा जास्त म्हणजे आठ पाय असतात, तसेच चक्क आठ डोळेही असतात. कोळ्याच्या डोक्यावर एकामागे एक अशा दोन रांगांमध्ये मिळून हे आठ डोळे असतात. यातील फक्त एकच जोडी जी मध्यभागी असते तीच खऱ्या अर्थाने ‘पाहण्याचे’ काम करू शकते. कोळ्याच्या डोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी प्रकाशात, काळोखातही त्यांना पाहता येते. ज्या डोळ्यांनी ते प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत अशा दुय्यम डोळ्यांमध्ये एक प्रकारचे अस्तर असते ज्याला ‘टॅपेटम’ म्हणतात, त्यामुळे कोळ्यांच्या डोळ्यात शिरणारे प्रकाश किरण तात्काळ परावर्तित होतात आणि कोळ्याला समोरच्या वस्तूबाबत अंदाज करता येतो. ‘वुल्फ स्पायडर’ जातीचे कोळी या रचनेमुळेच संध्याकाळच्या अंधूक प्रकाशात किंवा रात्रीच्या धूसर प्रकाशातही आपले भक्ष्य अचूक पकडू शकतात. आता कोळ्यांना असे आठ डोळे का असावेत? तर कोळ्यांना मान नसते, त्यामुळे इतर प्राण्यांसारखे ते मान हलवून दोन्ही बाजूंला बघू शकत नाहीत. ही उणीव दूर करायला त्यांना बाजूचेही बघता यावे म्हणून डोक्यावर अर्धवर्तुळाकार आकारात डोळे दिलेले आहेत.
कणाहीन प्राण्यांच्या गटातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण डोळे म्हणता येतील ते ‘चतुर’ अर्थात ड्रॅगनफ्लायचे. चतुरांचे डोळे हे कम्पाउंड आय म्हणजे ‘संयुक्त डोळे’ या प्रकारातले असतात. मुळात चतुराच्या डोळ्यांचा आकार त्याच्या डोक्याच्या आकाराच्या तुलनेने खूपच मोठा असतो. माणसाच्या शरीराशी तुलना करून सांगायचं झालं तर समजा आपले डोळे डोक्यात घालण्याच्या हेल्मेटच्या आकाराचे असते तर किती मोठे असते? तितके चतुराचे डोळे मोठे असतात. शिवाय माणसांच्या, पक्ष्यांच्या, इतर प्राण्यांच्या डोळ्यात एकच लेन्स असते पण चतुरांच्या डोळ्यामध्ये सुमारे तीस हजारांपर्यंत लेन्सेस - ज्यांना ओमाटिडिया म्हटले जाते - असतात. शंकूच्या आकाराच्या या लेन्सेस त्यांच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण करून चतुराच्या मेंदूकडे त्यांना दिसणाऱ्या प्रतिमा पोहोचवतात. डोळ्यांच्या या रचनेमुळे चतुराला एकावेळी ३६० अंशातले दृश्य दिसत असते. मात्र हजारो डोळे असूनही चतुराला माणसाइतके सुस्पष्ट दिसत नाही. त्याला माणसाप्रमाणे आपली नजर दूरच्या गोष्टीवर केंद्रित करता येत नाही, त्यामुळे फक्त जवळच्या वस्तूंच्या प्रतिमाच त्याच्या डोळ्यांमार्फत मेंदूवर नोंदल्या जातात.
दोनपेक्षा अधिक डोळे असलेल्या प्राण्यांचे प्रकार मुख्यतः इनव्हर्टिब्रेट्सच्या गटात सापडत असले तरी बहुदा नियमाला अपवाद म्हणून कणावान प्राण्यांमध्येही काही असे नमुने आहेत. त्यातला एक म्हणजे अमेरिका खंडाच्या सागरकिनाऱ्यांवर आढळणारा ‘ॲनाबेप्लिडे’ फॅमिलीतील एक मासा. या माशाला ‘फोर आईड फिश’ असेच नाव आहे. तसं बघायला गेलं तर या माशाला डोळे दोनच असतात मात्र त्यांची रचना अशी असते की एकाचवेळी तो स्वतंत्रपणे पाण्याखाली आणि पाण्यावरती पाहू शकतो. त्याचे बटबटीत डोळे त्याच्या डोक्यावर असतात. त्यांची विभागणी डॉर्सल (वरच्या बाजूला) आणि व्हेंट्रल (खालच्या बाजूला) अशी असते. प्रत्येक डोळ्यात दोन स्वतंत्र बाहुल्या आणि दोन नेत्रपटल असल्याने चार डोळ्यांनी हा मासा पाहू शकतो. जास्तीचा डोळा असलेला आणखी एक कणावान प्राणी म्हणजे न्यूझीलंडमध्ये आढळणारा ‘टुआतारा’. सरड्याशी साधर्म्य असलेल्या या रेप्टाईल गटातील प्राण्याच्या डोक्यावर तिसरा डोळा असतो. या डोळ्याला ‘पॅरीटल आय’ म्हणतात. टुआताराच्या बालवयात हा डोळा स्पष्टपणे दिसतो, नंतर मात्र अपारदर्शक खवल्याने तो झाकला जातो. तसाही या डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होत नाही तर शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी होतो.
सस्तन प्राण्यांमध्ये आपल्या अनोख्या डोळ्यांनी लक्ष वेधून घेणारा प्राणी म्हणजे आग्नेय आशियात आढळणारा टार्सियर. जेमतेम पंधरा-सतरा सेंटीमीटर आकाराच्या प्रायमेट्सच्या गटातील या प्राण्याचे डोळे मात्र त्याच्या शरीराला न शोभणारे, अगदी ‘गट्टाणे’ असतात. या प्रायमेट गटातल्या प्राण्याच्या डोक्यात जो मेंदू असतो, त्या आकाराचे त्याचे डोळे असतात. ज्या लहानशा डोक्यावर हे वटारलेले डोळे असतात, ते डोके टार्सियर दोन्हीकडे १८० अंशात फिरवू शकतो. त्यामुळे त्याला आपल्या भोवतीचे ३६० अंशातले दृश्य पाहता येते. टार्सियर जरी निशाचर असला तरी इतर निशाचर प्राण्यांप्रमाणे त्याच्या डोळ्यात प्रकाश किरण परावर्तित करणारे ‘टॅपेटम’चे पटल नसते. पक्ष्यांच्या राज्यात सर्वात मोठे आणि वैशिष्ट्यपूर्ण डोळे लाभलेले आहेत ते शहामृग या न उडणाऱ्या पक्ष्याला. मुळात पक्ष्यांमधला सर्वात वजनदार आणि सर्वात उंच असलेला शहामृग सर्वात वेगाने धावणारा पक्षीही आहे. त्याच्या उंचावलेल्या मानेवर जे लहानसं डोकं असतं, त्यात त्याचे ५ सेंटीमीटर आकाराचे डोळे असतात, म्हणजे माणसाच्या डोळ्यांपेक्षा साधारण पाच पट मोठे डोळे शहामृगाला लाभलेले आहेत. त्याच्या अक्रोडाच्या आकाराच्या मेंदूसमोर तर हे डोळे महाकाय ठरतात. या चेंडूसारख्या मोठ्या डोळ्यांनी शहामृग सुमारे साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरील आपला शिकारी पाहू शकतो.
निसर्गाने डोळ्यांच्या रचनेत केलेलं हे वैविध्य खरोखरच थक्क करणारं आहे. त्या तुलनेनं आपण माणसे फारच साधी आहोत. कीटकांमधील किंवा इतर प्राण्यांमधील हे डोळे दिपवणारे डोळे अजब निसर्गाची ओळख पटवून देतात.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.co