मुंबई : भारतीय भांडवली बाजारात आयपीओच्या माध्यमातून नव्या - २०२५ वर्षात २ लाख कोटी रुपये कंपन्या निधी उभारणी करतील, असा आशावाद पँटोमॅथ ग्रुपने ताज्या अहवालात व्यक्त केला आहे.
प्रमुख आर्थिक सेवा समूह असलेल्या पँटोमॅथ ग्रुपने "२०२४ ने काय दिले, २०२५ मध्ये काय होणार" हा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आर्थिक आणि बाजारातील प्रवाह, क्षेत्रीय कामगिरी, आणि अंदाज यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
वर्ष २०२४ मध्ये कंपन्यांमार्फत होणाऱ्या निधी उभारणीतील क्युआयपी अर्थात संस्थागत गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली असून विविध ९१ करारांमधून विक्रमी १,२९,२०० कोटी रुपये उभे केले गेले आहेत. गेल्या वर्षीचे ५२,३०० कोटी रुपये आणि वर्ष २०२० च्या ८०,५०० कोटी रुपयांच्या आधीच्या विक्रमी आकड्यांना मागे टाकून हा सर्वात उच्चांक ठरला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
अहवालात भारताच्या उत्कृष्ट आर्थिक प्रगती, क्षेत्रीय प्रगती आणि आयपीओ बाजारातील वर्चस्वाचा उल्लेख आहे. यामुळे भारत एक जागतिक आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान मिळवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भारताची विक्रमी आयपीओ कामगिरी
भारत आयपीओ जारी करण्याच्या संख्येत आघाडीवर राहिला असून अमेरिकेपेक्षा दुप्पट आणि युरोपपेक्षा २.५ पट अधिक आयपीओ भारतीय भांडवली बाजारात आले. वर्ष २०२४ पहिल्या ११ महिन्यात ७६ कंपन्यांनी १.३ ट्रिलियन रुपये निधी उभारणी केली. अनुकूल नियामक सुधारणा आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास यामुळे बाजाराचा वेग मंदीच्या काळातही वाढला, असे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.
जागतिक आयपीओ बाजाराचा प्रवास
जागतिक आयपीओ बाजारात १,२१५ व्यवहार झाले असून त्यातून १२१.२० अब्ज अमेरिकी डॉलर उभे करण्यात आले. ते २०२३ च्या पातळीपेक्षा किंचित कमी होते. मात्र, २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत कामगिरीत सुधारणा दिसून आली. अमेरिकेने आयपीओ निधी उभारण्याच्या बाबतीत पहिले स्थान मिळवले असून ५५% परदेशी जारीकर्त्यांचा विक्रमी सहभाग नोंदवला आहे.