संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

भारतीय अर्थव्यवस्थेपुढे कोणतेही आव्हान नाही; ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त GDP वाढेल, RBI पतधोरण समिती सदस्य नागेश कुमार यांना विश्वास

भारतीय अर्थव्यवस्था जोरदार वेगाने वाढत आहे आणि चालू आर्थिक वर्षात ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीचा दर गाठण्यात कोणतेही आव्हान असणार नाही, असे आरबीआय पतधोरण समितीचे (एमपीसी) सदस्य नागेश कुमार यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था जोरदार वेगाने वाढत आहे आणि चालू आर्थिक वर्षात ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीचा दर गाठण्यात कोणतेही आव्हान असणार नाही, असे आरबीआय पतधोरण समितीचे (एमपीसी) सदस्य नागेश कुमार यांनी रविवारी सांगितले.

कुमार यांनी पीटीआय व्हिडीओला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, सर्व अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी एक उज्ज्वल स्थान आहे. खरेतर, जागतिक अर्थव्यवस्थांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त अर्थव्यवस्था कर्जाच्या संकटात आहेत. औद्योगिकीकरणावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था खूप दबाव आणि उच्च चलनवाढ आणि आर्थिक विकासाच्या मंदीचा सामना करत आहेत, असे ते म्हणाले.

पण भारतीय अर्थव्यवस्था निर्यात किंवा व्यापाराने कमी, देशांतर्गत ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री आणि देशांतर्गत गुंतवणुकीने अधिक चालत असल्याचे सांगून कुमार म्हणाले की, भारत खूप मजबूतपणे वाढत आहे. चालू वर्षात आणि पुढील वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याचे कोणतेही आव्हान मला दिसत नाही. मला आशा आहे की, येत्या काही वर्षांत या प्रकारची वाढीची गती कायम राहील, परंतु कालांतराने ती ७-७.५ टक्क्यांपर्यंत मजबूत होईल, असे ते म्हणाले.

मागील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षातही देशाची अर्थव्यवस्था त्याच दराने वाढेल.

महागाईवरील प्रश्नाचे उत्तर देताना कुमार म्हणाले की, सध्याचा सीपीआय चलनवाढीचा दर सुमारे २ टक्क्यांच्या आसपास आहे आणि हे मुख्यत्वे एमपीसी (मौद्रिक धोरण समिती) किंवा आरबीआयने स्वीकारलेल्या धोरणाचा परिणाम आहे आणि आता हे लक्ष्य मर्यादेत आले आहे.

व्याजदर कपात ही महागाई व अन्य आकडेवारीवर अवलंबून

आरबीआयला पुढील व्याजदर कपात करण्याची संधी आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले, ते केवळ महागाईच्या आकडेवारीवरच नव्हे तर सर्व वेगवेगळ्या मॅक्रो आकडेवारीवर अवलंबून असेल. जर एका महिन्यात महागाई २ टक्क्यांपर्यंत खाली आली तर त्याचा अर्थ असा नाही की ती तिथेच राहील. आरबीआयने या वर्षी प्रमुख व्याजदरांमध्ये १ टक्क्यांची कपात केली आहे आणि जूनमध्ये महागाई ४ टक्क्यांच्या लक्ष्याऐवजी २.१ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे संकेत देणाऱ्या अधिकृत आकडेवारीमुळे आणखी सवलतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय नाणेनिधी समिती ऑगस्टमध्ये त्यांचे पुढील द्वैमासिक धोरण जाहीर करण्याची अपेक्षा आहे. म्हणून, एमपीसीला केवळ चलनवाढीचा डेटाच नाही तर इतर सर्व मॅक्रो-निकषांचा कल अंदाज पाहावा लागेल. त्यावर आधारित निष्कर्ष काढावा लागेल, असे कुमार यांनी निरीक्षण केले. भारताच्या अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार (बीटीए) बद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना कुमार म्हणाले, जर आपण या करारातून मार्ग काढू शकलो तर आपल्याला कामगार-केंद्रित क्षेत्रात अमेरिकेच्या विशाल बाजारपेठेत प्रवेश मिळेल जिथे आपल्या मुबलक कामगार संसाधनांमुळे भारताला स्पर्धात्मक फायदा आहे.

पहलगामच्या हल्लेखोरांचा खात्मा? श्रीनगरमध्ये ऑपरेशन 'महादेव'; चकमकीत ३ दहशतवादी ठार

नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय; बुद्धीबळ विश्वचषकात बाजी, ठरली पहिली भारतीय महिला विश्वविजेती

"प्रत्येक गोष्टीला..."; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

Baramati : नियतीचा क्रूर खेळ! दोन मुलींसह वडिलांचा अपघातात मृत्यू; धक्क्याने २४ तासांतच आजोबांनीही सोडला जीव

"आता इतक्या पैशांमध्ये..."; ‘शोले’च्या तिकीटाचा फोटो शेअर करत बिग बींची खास पोस्ट