नवी दिल्ली : सरकारी मालकीची तेल व वायू विक्री व विपणन कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आंध्र प्रदेशात नवीन तेलशुद्धीकरण व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करणार आहे. देशाने शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऊर्जा संक्रमण योजना आखली असल्याने भारतातील हा शेवटचा ग्रीनफील्ड प्रकल्प असण्याची शक्यता आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियमच्या संचालक मंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत आंध्र प्रदेशाच्या पूर्व किना-यावर ग्रीनफील्ड रिफायनरी - पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापनेसाठी प्रकल्पपूर्व उपक्रमांना मान्यता दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६,१०० कोटी रुपये आहे.
भारत पेट्रोलियमने प्रकल्पाच्या क्षमतेची तसेच त्याच्या पूर्ण होण्याच्या कालमर्यादेची माहिती दिली नाही. रिफायनरीची क्षमता दररोज १.८० लाख बॅरल असू शकते. बीपीसीएल ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची तेल शुद्धीकरण कंपनी आहे. तिच्या मालकीच्या रिफायनरी मुंबई (१२ दशलक्ष टन वार्षिक क्षमता), केरळमधील कोची (१५.५ दशलक्ष टन) आणि मध्य प्रदेशातील बीना (७.८ दशलक्ष टन) येथे आहेत. बीपीसीएल १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
स्वच्छ ऊर्जा प्रकल्प
भारतात स्वच्छ ऊर्जेसाठी हरित हायड्रोजन इतर गॅस (सीएनजी/एलएनजी) आणि वीज (ईव्ही) यांना प्रोत्साहन दिले जात आहे. देशाने २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वर्ष २०४७ पर्यंत देशाच्या प्राथमिक ऊर्जा गरजेच्या ७ ते १० टक्के भागवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बीपीसीएलने २०४० पर्यंत शून्य-कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये नवीकरणीय ऊर्जा, हिरवा हायड्रोजन, संकुचित बायोगॅस, कार्बन कॅप्चर, आणि ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा यांचा समावेश आहे.
शेवटचा प्रकल्प?
आंध्र प्रदेशातील प्रस्तावित प्रकल्प देशातील शेवटचा ग्रीनफील्ड रिफायनरी प्रकल्प मानला जात आहे.
भारताकडे सध्या २५६.८० दशलक्ष टन तेल शुद्धीकरण क्षमता आहे. ती दशकाच्या अखेरीस ३०० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे नियोजन आहे.
तेलाची वार्षिक मागणी ४ ते ५ टक्क्यांनी वाढत आहे. प्रस्तावित प्रकल्पांमुळे वर्ष २०४० पर्यंतच्या इंधनाच्या मागणीची पूर्तता होण्याची शक्यता आहे.