MrBeast विकत घेणार TikTok? रविवारपर्यंत कंपनी बॅन होण्याची शक्यता, मस्कच्या नावाचीही जोरदार चर्चा सोशल मीडिया
बिझनेस

MrBeast विकत घेणार TikTok? रविवारपर्यंत कंपनी बॅन होण्याची शक्यता, मस्कच्या नावाचीही जोरदार चर्चा

अमेरिकेत 19 जानेवारीपासून TikTok बॅन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे अमेरिकेतील नेटकरी आणि टिकटॉक प्रेमींमध्ये हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच एलन मस्क टिकटॉक विकत घेणार, अशी चर्चा देखील सुरू आहे. तर जगप्रसिद्ध युट्यूबर MrBeast ने देखील TikTok विकत घेण्यात रुची दाखवली आहे. त्यामुळे अमेरिकेत टिकटॉक बंद झाल्यावर ते कोण खरेदी करणार याची चर्चा रंगली आहे.

Kkhushi Niramish

अमेरिकेत TikTok (शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप) वर बंदी जवळपास निश्चित असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासाठी अमेरिका TikTok वर प्रतिबंध घालण्याच्या तयारीत आहे. या दरम्यान उद्योजक आणि स्पेस एक्सचे सर्वेसर्वा एलन मस्क हे अमेरिकेतील टिकटॉकचे अधिकार विकत घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तर, जगप्रसिद्ध युट्यूबर MrBeast नेही एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत TikTok विकत घेण्यात रुची दाखवलीये. त्यामुळे अमेरिकेच्याच नव्हे तर जगभरातील सोशल मीडियात टीकटॉक बंद झाल्यास ते कोण खरेदी करणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अमेरिकेत TikTok का होणार बंद?

TikTok अॅप हे चिनी कंपनी ByteDance च्या मालकीचे आहे. अमेरिकेत याचे लाखो वापरकर्ते आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून अमेरिकन्सचा मोठा डेटा संग्रहित केला जात असल्याचा ठपका त्याची मूळ कंपनी 'बाईटडांस'वर ठेवण्यात आला आहे. अमेरिकन संसदेने कायदा पारित करून टिकटॉकला बॅन करण्याचे पाऊल उचलले. या कायद्या विरोधात टिकटॉकने तेथील न्यायालयात दावा दाखल केला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील हा खटला सुरू आहे.

काय आहे 'TikTok बॅन' संदर्भातील हा खटला?

एप्रिल २०२४ मध्ये तत्कालिन जो बायडन सरकारने फॉरेन ॲडव्हर्सरी कंट्रोल्ड अॅप्लिकेशन्सपासून संरक्षण करणारा कायदा पारित केला. या कायद्यानुसार TikTok ची मूळ कंपनी ByteDance ला त्याचे अधिकार अमेरिकेतील मान्यताप्राप्त खरेदीदाराला विकणे बंधनकारक करण्यात आले. यासाठी तेथील सरकारने TikTok ला काही दिवसांची मुदत दिली होती. तसेच, असे न झाल्यास अमेरिकेतील अॅप स्टोअर्सवर TikTok पूर्णपणे बेकायदेशीर असेल. यामुळे TikTok एक प्रकारे बॅन होणार आहे. या कायद्याविरोधात TikTok ने अमेरिकेच्या कोलंबियातील कोर्टात धाव घेतली. कोलंबिया न्यायालयाने सरकारने पारित केलेल्या कायद्याच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर TikTok ने या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश कायद्याच्या बाजूने

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात जलदगतीने हा खटला निकालात काढण्यासाठी कालावधी ठरवण्यात आला. अलीकडेच यावर पुन्हा सुनावणी झाली. बिझनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार, या सुनावणीत न्यायाधीश कायद्याच्या बाजूने बहुमताने निर्णय देण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास येत्या रविवारपासून (दि.१९) अमेरिकेत टिकटॉक पूर्णपणे बंद होऊ शकते.

एलन मस्क TikTok विकत घेणार?

दरम्यान, अमेरिकेच्या सोशल मीडियात TikTok बॅन झाल्यावर ते कोण खरेदी करणार याविषयी जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये एलन मस्क यांचे नाव टॉपवर आहे. तथापि, यावर TikTok कडून किंवा मस्क यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. एका रिपोर्टनुसार, टिकटॉकच्या अधिकाऱ्यांकडून या चर्चेचे खंडन करण्यात आले आहे. Byte Dance या टिकटॉकच्या मूळ कंपनीला टिकटॉक हे त्यांच्याच अधिकारात ठेवायचे असल्याचे त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

यूट्यूबर MrBeast देखील टीकटॉक खरेदी करण्याच्या शर्यतीत

दरम्यान, युट्यूबर Jimmy Donaldson उर्फ MrBeast ने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत TikTok खरेदी करण्यात त्याची रूची दाखवली. ही पोस्ट अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगात ब्रेकिंग न्यूज ठरली. ''ठीक आहे, मी TikTok विकत घेईन, जेणेकरून त्यावर बंदी येणार नाही'', असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याची ही पोस्ट लगेचच व्हायरल झाली आणि चर्चांना उधाण आले. तो टिकटॉक विकत घेण्याबाबत गंभीर आहे की नाही हे समजू शकले नाही. मात्र, नंतर त्याने अजून एक पोस्ट केली. त्यामध्ये, "मी हे ट्विट केल्यापासून अनेक अब्जाधीशांनी माझ्याशी संपर्क साधलाय, बघू हे करता येण शक्य आहे का" असे त्याने म्हटलंय. त्याच्या पोस्टखाली लाखो लोक प्रतिसाद देत आहेत.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप