बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण आता हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत आहे. अभिनय, सौंदर्य आणि जागतिक प्रसिद्धीमुळे दीपिकाने भारतीय सिनेसृष्टीबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. आता तिने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. दीपिका पदुकोण ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’वर स्टार मिळवणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे.
२०२६ मध्ये 'वॉक ऑफ फेम'वर सन्मानित होणाऱ्या कलाकारांच्या यादीत दीपिकाच्या नावाची अधिकृत घोषणा बुधवारी हॉलिवूडमधील एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. या प्रतिष्ठित यादीत मायली सायरस, टिमोथी चालमेट, एमिली ब्लंट, राहेल मॅकअॅडम्स आणि सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे यांचाही समावेश आहे.
'हॉलिवूड वॉक ऑफ फेम' म्हणजे काय?
हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियातील एक प्रतिष्ठित फूटपाथ आहे. या ठिकाणी चित्रपट, संगीत, टेलिव्हिजन, रेडिओ आणि थिएटर क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या कलाकारांना पाच स्टारच्या स्वरूपात सन्मानित केलं जातं. 1960 साली सुरू झालेल्या या परंपरेत आतापर्यंत २,७०० हून अधिक कलाकारांना हा गौरव मिळाला आहे.
या सन्मानासाठी हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्स निवड प्रक्रीया पार पाडते. निवड झाल्यावर कलाकाराने प्रत्यक्ष समारंभात उपस्थित राहणे आवश्यक असते. दरवर्षी लाखो पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी लॉस एंजेलिसला भेट देतात.
दीपिकाने व्यक्त केली कृतज्ञता -
दीपिकाने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणावर प्रतिक्रिया दिली. कोणताही मोठा मजकूर न लिहिता, तिने आपल्या मनातील भावना “Gratitude...” (कृतज्ञता) या एका शब्दात व्यक्त केली.
दीपिकाचा हॉलिवूडमधील प्रवास -
दीपिकाने २०१७ मध्ये ‘XXX: रिटर्न ऑफ झेंडर केज’ या अॅक्शनपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने विन डिझेलसोबत प्रमुख भूमिका साकारली. यानंतर, मेट गाला, कान्स फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तिच्या आकर्षक उपस्थितीने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तिच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेला मान्यता देताना ‘टाईम’ मॅगझिनने तिला जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले होते. आता 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वरील स्टारसह दीपिकाने ग्लोबल सेलेब्रिटी म्हणून आपली ओळख आणखी भक्कम केली आहे.