बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचा आज (दि. ८) ९० वा वाढदिवस आहे. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि देशभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. निधनानंतरचा हा त्यांचा पहिला वाढदिवस असल्याने सोशल मीडियावर कुटुंबीय आणि चाहत्यांकडून त्यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या जात आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
धरमजी, हॅप्पी बर्थ डे माय हार्ट... हेमा मालिनी यांची धर्मेंद्र यांच्यासाठी पोस्ट
सुंदर क्षणांचे जुने फोटो शेअर करत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी खास नोट लिहिली. त्यांनी लिहिले की, “धरमजी, हॅप्पी बर्थ डे माय हार्ट (Happy Birthday my heart). तुम्ही मला सोडून गेल्यापासून दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. या दुःखातून मी हळूहळू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही सदैव माझ्यासोबत असाल.”
"आपण एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण कधीही विसरता येणार नाहीत आणि त्या क्षणांना पुन्हा जगल्याने मला खूप शांती आणि आनंद मिळतो. आपण घालवलेली सुंदर वर्षे,आपले एकमेकांवरील प्रेम सिद्ध करणाऱ्या आपल्या दोन सुंदर मुली आणि माझ्या हृदयात कायम राहणाऱ्या सर्व सुंदर, आनंदी आठवणींसाठी मी देवाचे आभार मानते."
"तुमच्या नम्रतेसाठी, तुमच्या उदात्त हृदयासाठी आणि मानवतेवरील प्रेमासाठी तुम्ही ज्या शांती आणि आनंदासाठी पात्र आहात, देव तुम्हाला ते देवो अशी मी प्रार्थना करते."
"हॅप्पी बर्थ डे डियर लव्ह."
धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे. १९७० मध्ये आलेल्या "तुम हसीन मैं जवान" या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि चार मुलांचे वडील होते. हेमा मालिनी यांना भेटल्यानंतर त्यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत गेली. दोघांच्या नात्याबद्दल माध्यमांमध्ये विविध बातम्या येत असतानाही त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९८० मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केले.