मुंबई : पॉर्नोग्राफीप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या घरावर तसेच ऑफिसमध्ये ‘ईडी’ने शुक्रवारी छापेमारी केली.
पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. गुन्हा दाखल केल्यानंतर शिल्पा आणि राज यांचे घर तसेच ऑफिसची झडती घेतली जात आहे. मुंबई, उत्तर प्रदेशातील १५ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली.
‘अश्लील’ चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा याला जून २०२१ मध्ये अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मिळाला. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात ४ फेब्रुवारी २०२१ मध्ये एक केस दाखल केली होती. मालवणी पोलीस ठाण्यात या रॅकेटसंदर्भात एका मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरुणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत, असा दावाही या तक्रारीत केला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड येथील बंगल्यावर छापा मारला. तो बंगला भाड्याने घेऊन तेथे पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात येत होते. पोलिसांनी छापा टाकून बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीसह ११ जणांना अटक केली होती.
शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की, शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा हे दोघेही तपास कार्यात सहकार्य करत आहेत. यातील सत्य लवकरच बाहेर येईल, असेही ते म्हणाले.