"घर से निकल कर गए थे, घर से ही आ रहे हैं और घर ही जा रहे है" अनुभव सिन्हा यांच्या 'भीड' चित्रपटातील शहरातून पुन्हा आपल्या गावी स्थलांतर करणाऱ्या मजुराने बोललेल्या या ओळी तुम्हाला हादरवून टाकण्यासाठी, लॉकडाउनमधील प्रत्येकाचे वाईट अनुभव, आठवणी तुमच्या हृदयात पुन्हा जाग्या करण्यासाठी पुरेशी आहे...
तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर देशामध्ये सुरू असलेले मजूरांचे स्थलांतर संपूर्ण देशाने पाहिले. अनुभव सिन्हा यांचा 'भीड' हा चित्रपट, या स्थलांतरित मजुरांच्या घरी परतण्याच्या घटनांचे, त्यांच्या जगण्याचे, संघर्षाचे वर्णन करण्याचा, त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना काळात हजारो स्थलांतरित मजुरांना जो त्रास सहन करावा लागला, जे असहाय जीवन त्या दिवसांमध्ये जगावं लागलं यावर भाष्य करीत हा चित्रपट तुमच्या हृदयाला क्षणोक्षणी भिडतो.
लेखन, दिग्दर्शन : मुल्क', 'थप्पड', 'आर्टिकल १५', 'अनेक' या सारख्या वेगळ्या विषयांवर चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा हा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. 'भीड' चित्रपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे लेखन. कोरोना काळात भारतात अचानक लागलेल्या पहिल्या लॉकडाऊनमधील छोट्या छोट्या कथानकांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. सामाजिक विषमता वास्तववादी रुपात मांडणारा अनुभव सिन्हा हा एक संवेदनशील दिग्दर्शक आहे. प्रवाहाविरुद्ध लढणारी, धर्म, जात या पलीकडे जाऊन विचार करणारी व्यक्तिरेखा आणि त्यातून ठळकपणे संदेश देणं हा अनुभव सिन्हाच्या गेल्या काही सिनेमांचा आत्मा आहे.
'भीड' मध्ये माणसांची गर्दी आहे. या गर्दीतील प्रत्येक माणसाची एक गोष्ट आहे. या चित्रपटातील प्रत्येक माणसाची व्यक्तिरेखा त्यांच्या मागच्या कथांमध्ये फारशी गुंतवून न ठेवता प्रेक्षकांना त्याची पुरेशी ओळख यात करून दिली आहे. सौम्या तिवारी आणि सोनाली जैन यांच्यासह अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. चित्रपटातील वास्तववादी संवाद दमदार झाले आहेत. हे संवाद तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शकाला या चित्रपटाच्या निमित्ताने कोरोनाच्या काळातील सामाजिक विषमतेचे वास्तव मांडायचे आहे, हे वारंवार जाणवत राहते.
कथानक : सार्वजनिक प्रवासाची व्यवस्था पूर्णपणे बंद झालेली असताना शहरातून गावाकडे पायी निघालेल्या स्थलांतरित मजुरांची ही गोष्ट आहे. शहरात प्रवेशापासून रोखणाऱ्या ‘चेक पोस्ट’चा ‘इनचार्ज’ असलेला सूर्यकुमार सिंग टिकस (राजकुमार राव) या कथेचा नायक आहे. पोलीस इन्स्पेक्टर (आशुतोष राणा), सुर्यकुमारची प्रेयसी रेणू (भूमी पेडणेकर) या सहव्यक्तिरेखा चित्रपटामध्ये आहेत. दुसरीकडे शहरात वॉचमन म्हणून काम करणारा आणि गावाकडे परत येण्यासाठी आतुर असलेला बलराम त्रिवेदी (पंकज कपूर) ही आणखी एक व्यक्तिरेखा यात महत्वाची आहे.
‘लॉकडाउन’च्या परिणामांचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार आहेत. तेजपूर गावाच्या सीमेवर या सर्वांना अडवले जाते. शहरांमधून घराच्या ओढीने गावांकडे निघालेल्या या व्यक्तिरेखा, त्यांच्या गोष्टी, त्यांच्या आयुष्यात या पूर्वी घडलेल्या गोष्टी आणि ‘लॉकडाउन’मुळे नशिबी आलेलं असहाय जगणं हे सारं काही लेखक-दिग्दर्शक इथे मांडतो. हा चित्रपट व्यथा मांडतांना अधिक वास्तववादी आणि प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शकाने ' ब्लॅक अॅण्ड व्हाईट' रुपात कथा दर्शवल्या आहेत.
कथानक कोरोना आणि लॉकडाऊन मधील स्थलांतरित मजुरांपर्यत मर्यादित न राहता, लेखक आणि दिग्दर्शकाने त्यात प्रामुख्याने उत्तर भारतातील सामाजिक विषमता आणि त्यांच्यातील आजही अस्तित्वात असलेला जातीपातीतील भेदभाव यावरही भाष्य केले आहे. 'भीड'मध्ये अनुभवी कलाकार असल्याने अभिनय दर्जा झाला आहे. राजकुमार राव, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा, पंकज कपूर या कलाकारांनी त्यांच्या भूमिका कमाल साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या वाट्याला आलेली लहान व्यक्तिरेखा देखील योग्य न्याय देत साकारली आहे. बेघर झालेल्या हजारो स्थलांतरित मजुरांबद्दल खरोखरच आत्मीयता असेल, तर एक संवेदनशील, वास्तववादी कलाकृती म्हणून ‘भीड’ चित्रपट बघण्यास हरकत नाही.
चित्रपट : भीड (हिंदी)
निर्माता, दिग्दर्शक : अनुभव सिन्हा
लेखन : अनुभव सिन्हा, सौम्या तिवारी, सोनाली जैन
कलाकार : राजकुमार राव, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा, पंकज कपूर, कुमुद मिश्रा, दिया मिर्झा, वीरेंद्र सक्सेना.
छायांकन : सौमिक मुखर्जी
दर्जा : साडेतीन स्टार