मनोरंजन

"चित्रपटात काम करायचं स्वप्न नव्हतं, अभिनयापेक्षा लहानपणापासून मला..." : साजिरी जोशी

बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेक्षेत्रातही आता कलाकारांची नवी पिढी झळकत आहे. परंतु चित्रपटात काम करण्याची लहानपणापासून इच्छा होती का, असं विचारल्यावर साजिरी जोशीने मात्र वेगळं उत्तर दिलं.

निलीमा कुलकर्णी

कोकणातील श्रीवर्धनचं निसर्गरम्य सौंदर्य आणि हळुवार खुलत जाणारी मैत्री आणि सुट्ट्यांचे दिवस हा विषय आहे 'एप्रिल मे ९९' या आगामी चित्रपटाचा. प्रख्यात कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांचं दिग्दर्शनात पदार्पण होत आहे.

या चित्रपटात जाईच्या भूमिकेत दिसणारी साजिरी जोशी तिच्या सहज अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. साजिरी जोशीने नवशक्तिला दिलेल्या मुलाखतीत तिच्या अभिनयातील पदार्पणाविषयी सांगितलं.

साजिरी ही छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री ऋजुता देशमुखची मुलगी आहे. त्यामुळे अभिनयाचा वारसा तिच्याकडे चालत आला आहे. गोल चेहरा आणि कुरळे केस यामुळे ती ऋजुता देशमुखची मुलगी आहे हे लगेचच लक्षात येतं. बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेक्षेत्रातही आता कलाकारांची नवी पिढी झळकत आहे. परंतु तिला चित्रपटात काम करण्याची लहानपणापासून इच्छा होती का, असं विचारल्यावर तिने मात्र वेगळं उत्तर दिलं.

साजिरी जोशी सांगते, "मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षी रोहन मापुस्करकडून या चित्रपटासाठी विचारण्यात आलं. मला मात्र मी चित्रपटात काम करेन असं कधी वाटलंच नाही. अभिनयापेक्षा लहानपणापासून मला नृत्याची आवड होती आणि मी नृत्याचं शास्त्रीय शिक्षण घेतलं आहे. सोनिया परचुरे यांच्याकडून मी कत्थक शिकले आहे.

कॉलेजमध्ये एकांकिका करायला सुरुवात झाली. रोहन मापुस्कर यांनी ऑडिशनसाठी बोलावलं. तेव्हा सहज गंमत म्हणून मी गेले. पण त्यांच्या मनात चित्रपटाची कथा लिहितानाच जाई या भूमिकेसाठी मीच होते हे मला खूप नंतर कळलं. मला चित्रपटाचा आशय आवडला आणि मी होकार दिला. शूटिंग सुरु होण्यापूर्वी आमचं एक वर्कशॉपदेखील झालं. रोहन मापुस्कर यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. कोकणातील शूटिंगचा अनुभव फार छान होता. या चित्रपटात मी मुलांना इंग्रजी शिकवताना दिसत आहे. माझं इंग्रजी आणि मराठी शाळेपासूनच चांगलं आहे. आईकडून माझ्याकडे नव्वद टक्के अभिनय आला आहे आणि १० टक्केच फक्त माझं टॅलेंट आहे. पण बाकी सर्व श्रेय मी आईलाच देईन.''

साजिरी जोशीची अभिनयातील ही इनिंग तिला आईप्रमाणेच मोठी भरारी घ्यायला लावेल असं दिसतंय. 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट येत्या २३ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल