नवशक्ति - अक्षररंग
मनोरंजन

लिलिपुटांच्या राज्यात

लिलिपूट म्हणजे खुजी माणसं. सध्या अशा खुज्या माणसांचे साम्राज्य वाढते आहे. अशा साम्राज्यात कोणाला विनोद कळत नाही, की उपहास कळत नाही. किंबहुना विनोद का केला जात आहे, यामागचे वास्तव कोणाला समजून घ्यायचे नसते. खरे तर महाराष्ट्राला, देशाला विनोद समजणाऱ्या नेत्यांची, पत्रकारांची गौरवशाली परंपरा आहे.

नवशक्ती Web Desk

- दखल

- शरद जावडेकर

लिलिपूट म्हणजे खुजी माणसं. सध्या अशा खुज्या माणसांचे साम्राज्य वाढते आहे. अशा साम्राज्यात कोणाला विनोद कळत नाही, की उपहास कळत नाही. किंबहुना विनोद का केला जात आहे, यामागचे वास्तव कोणाला समजून घ्यायचे नसते. खरे तर महाराष्ट्राला, देशाला विनोद समजणाऱ्या नेत्यांची, पत्रकारांची गौरवशाली परंपरा आहे.

सध्या महाराष्ट्रात कुणाल कामरा व त्याचे गाणे, यावर भक्तमंडळींनी घातलेला धुडगूस पाहून व ‘कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री दिली पाहिजे’ असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांना पाहून १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळातील मंगेश पाडगावकरांची ‘सलाम’ ही कविता आठवते-

“सलाम भाईयों सलाम

याला सलाम, त्याला सलाम

लोकशाहीला सलाम, ठोकशाहीला सलाम

लोकशाहीच्या रक्षणासाठी

ठोकशाही करणाऱ्याला सलाम

गल्लीतल्या पुढाऱ्याला सलाम

दिल्लीतील पुढाऱ्याच्या, पुढाऱ्याला सलाम

याला सलाम, त्याला सलाम,

प्रत्येक सत्ताधाऱ्याला सलाम

उजवा हात गांडीवर ठेवून

डाव्या हाताने सलाम!”

जेव्हा राज्यकर्त्यांना व राजकीय नेत्यांना व्यंगचित्रकार, लेखक, कवी, कलाकार यांची भीती वाटायला लागते तेव्हा समजावे, की राजकीय नेत्यांचे कर्तृत्व व पाया फार भुसभुशीत झाला आहे. राजकारणाचा प्रवास एकाधिकारशाहीकडे चालू आहे व लोकशाही हे केवळ त्यांचे ‘अभराण’ आहे!

महाराष्ट्राला तीव्र प्रकारच्या राजकीय टीकाटिप्पणीची मोठी परंपरा आहे, पण कोणीही या टीकाटिप्पणीचा राग धरला नाही व खिलाडूवृत्तीने त्याकडे दुर्लक्ष केले. आचार्य अत्रे म्हणत असत की, राजकारणात ‘हार व प्रहार’ घेण्याची तयारी पाहिजे!

बाळासाहेब ठाकरे आचार्य अत्रेंना ‘वरळीचे डुक्कर’ म्हणत असत; तर शरद पवार साहेबांना ‘मैद्याचे पोते’ म्हणत असत! ‘मार्मिक’ पाक्षिकाचे जुने अंक काढले तर लक्षात येईल की बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या किती नेत्यांना घायाळ केले होते. तरीही जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार व इतर अनेक नेते बाळासाहेबांचे मित्र होते. म्हणून लोकशाही म्हणजे विरोध सहन करण्याची तयारी व आपल्याला विरोध करणाऱ्याचा दुसऱ्याचा हक्क मान्य करणे होय.

दादा कोंडके त्यांच्या ‘इच्छा माझी...’ व ‘गाढवाचे लग्न’ या वगनाट्यात राजकीय पुढाऱ्यांची खिल्ली उडवायचे. पण म्हणून कोणी दादांचे वगनाट्यांचे प्रयोग उधळले नाहीत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे नेहमी ‘संयुक्त महाराष्ट्र ‘झालाच’ पाहिजे’ असे म्हणत असत. यात ते ‘च’वर भर देत असत. त्यावेळी यशवंतराव चव्हाण अत्र्यांची खिल्ली उडवताना म्हणाले की, ‘तुम्ही प्रत्येक वेळी ‘च’वर भर का देता?’ त्यावर उत्तर देताना आचार्य अत्रे म्हणाले की, हा ‘च’ फार महत्त्वाचा आहे. तुमच्या नावातून ‘च’ काढून टाका, मग खाली काय उरते पहा’! यशवंतराव चव्हाणांनी या विनोदाकडे खिलाडूवृत्तीने पाहिले.

कधी अभिरूचीला सोडून विनोद केला गेला तर त्याकडे दुर्लक्ष करणे हाच मार्ग असतो. मुंबईत एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे व पु. ल. देशपांडे एकत्र होते. पुलंचे वय झाले होते. पुलं प्रथम बोलले. नंतर बोलताना बाळासाहेब ठाकरे बोलून गेले, ‘सध्या अनेक पूल मोडकळीस आले आहेत!’ हे अभिरुचीला सोडून विधान होते, पण महाराष्ट्राने या विधानाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

विनोद, विडंबन, सटायर्स हे काही अक्षर वाङ‌्मय नसते. ते फार अल्पजीवी असते. कुणाल कामराच्या कवितेकडे दुर्लक्ष केले असते, तर जनता एव्हाना हे गाणे विसरली असती. पण अपरिपक्व राजकारण्यांनी या गाण्याला कारण नसताना विरोध करून प्रसिद्धी दिली व स्वतःचेच हसे करून घेतले आहे. ज्या ‘सटायर्स’ना ‘अक्षर वाङ‌्मय’ म्हणता येईल अशा थोड्याच कलाकृती असतात. जॉर्ज ऑरवेल यांचे ‘अ‍ॅनिमल फार्म’, चार्ली चॅप्लीनचा ‘द ग्रेट डिक्टेटर’, जोनायन स्विफ्टचे ‘गलिव्हर ट्रॅव्हल्स’, लुईस कॅरोलचे ‘अ‍ॅलिस इन द वंडरलँड’ ही काही उदाहरणे आहेत. पु.ल. देशपांडे यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे कर्मठ गांधीवादावरचे विडंबन आहे, तर ‘पार्किन्सन लॉ ऑफ मॅनेजमेंट’ हे व्यवस्थापन शास्त्राचे विडंबन आहे. ‘येस मिनिस्टर’ ही मालिकासुद्धा राजकीय उत्कृष्ट सटायर आहे.

अ‍ॅरिस्टॉटलने प्राचीन ग्रीक नाटकाच्या संदर्भात विनोदी पात्रांचे वर्गीकरण केले आहे व त्यात ‘एरॉन’ हे एक पात्र आहे. ते पात्र वरवर मूर्खाचे सोंग घेते, पण ते तल्लख बुद्धीचे व व्यावहारिक शहाणपणा असलेले पात्र आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात व संस्कृत नाटकात ‘विदुषक’ हे एक पात्र असते. विदुषक हे केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे पात्र नसते, तर तो एक उत्कृष्ट भाष्यकार असतो. मराठी तमाशात ‘सोंगाड्या’ हे असेच एक पात्र आहे. ही पात्रे वास्तवातील विसंगतीतून विनोद निर्माण करतात. आणीबाणीच्या काळात यशवंतराव चव्हाण चुकून पुलंना ‘विदुषक’ म्हणाले व ते फसले!

कुणाल कामराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांवरही खटले भरले जात असतील तर या कार्यक्रमाला वीजपुरवठा करणाऱ्या वीज कंपनीवर व त्यांच्या अधिकाऱ्यांवर, प्रेक्षकांना घेऊन येणाऱ्या रेल्वे व बसच्या चालकांवर, तेथे चहा-सामोसे विकणाऱ्या उपहारगृहांच्या मालकांवर व नोकरांवर तसेच नाट्यगृहाबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांवरसुद्धा खटले भरायला हरकत नाही! जेव्हा दडपशाही अती होते, तेव्हा त्याचा विनोद होतो.

खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीमध्ये उच्च अभिरुचीपूर्ण टीका कशी करावी याचे स्वतः उदाहरण घालून दिले आहे. त्या वस्तुपाठाचे पालन सर्व लोकशाहीप्रेमींनी केले पाहिजे. सोनिया गांधींना ते ‘काँग्रेसची विधवा’, ‘जर्सी गाय’ म्हणाले होते, तर राहुल गांधींना वारंवार ‘पप्पू’ म्हटले गेले. महाराष्ट्रात काही नेत्यांना ‘भटकती आत्मा’ म्हटले गेले. किती उच्च अभिरुचीपूर्ण ही टीका आहे! यातून लोकशाही बळकट होत असते! क्षुल्लक पामर लोकांना काही कळत नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी पोलीस, तुरुंग, अधिकाधिक कडक कायदे, गुन्ह्याच्या मोघम व्याख्या आवश्यकच असतात. लोकशाहीच्या रक्षणासाठी कलाकाराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देणे किती आवश्यक आहे हे या देशातील मूर्ख लोकांना कळतच नाही. एकूण लोकशाही झिंदाबाद!

‘शंकर्स विकली’ या साप्ताहिकामध्ये तत्कालीन

पंतप्रधान पंडित नेहरूंवर तसेच त्यांच्या धोरणाची टिंगल करणारी भरपूर व्यंगचित्रे यायची. त्यावर नेहरूंनी शंकर यांना कळवले होते की, ‘डोन्ट स्पेअर मी शंकर.’ आर. के. लक्ष्मण यांच्या बोचऱ्या व्यंगचित्रांनासुद्धा पंडित नेहरू दाद द्यायचे.

कार्याध्यक्ष, अ. भा. समाजवादी

शिक्षण हक्क सभा

sharadjavadekar@gmail.com

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक