हैदराबाद (तेलंगणा) : ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीच येथे ज्यू समुदायावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींपैकी एक असलेला साजिद अक्रम मूळचा हैदराबादचा असल्याचे तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले. याआधी हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचे असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते, मात्र ते चुकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. १४ डिसेंबर रोजी सिडनीतील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर ज्यू समुदायाच्या हनुक्का उत्सवावेळी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा ऑस्ट्रेलियन यंत्रणा तपास करत आहेत. या हल्ल्यात वडील-मुलगा अशा दोघांनी गोळीबार केला असून त्यात १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
हल्लेखोरांची ओळख ५० वर्षीय साजिद अक्रम आणि त्याचा २४ वर्षीय मुलगा नविद अक्रम अशी आहे. साजिद अक्रमला ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ठार केले. या दोघांवर इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
तेलंगणा पोलिसांच्या माहितीनुसार, साजिद अक्रमने हैदराबादमध्ये वाणिज्य शाखेतील (बी.कॉम) पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर रोजगाराच्या शोधात तो नोव्हेंबर १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला. पुढे त्याने युरोपीय वंशाच्या व्हेनेरा ग्रोसो हिच्याशी विवाह केला आणि कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत-नविद अक्रम हा मुलगा आणि एक मुलगी. साजिद अक्रमकडे भारतीय पासपोर्ट असून त्याची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियात जन्मलेली असल्याने ती ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत.
भारतामधील नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या २७ वर्षांत साजिद अक्रमचा हैदराबादमधील कुटुंबाशी फारसा संपर्क नव्हता. ऑस्ट्रेलियात स्थलांतर केल्यानंतर तो सहा वेळा भारतात आला होता. हे दौरे प्रामुख्याने कौटुंबिक कारणांसाठी, मालमत्तेशी संबंधित बाबींसाठी तसेच वृद्ध पालकांना भेटण्यासाठी होते. वडिलांच्या निधनाच्या वेळीही तो भारतात आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबीयांच्या मते, साजिद अक्रममध्ये कोणतीही टोकाची किंवा कट्टर मानसिकता असल्याची त्यांना कल्पना नव्हती, तसेच त्याच्या कट्टरतेकडे वळण्यामागील कारणांबाबतही त्यांना माहिती नाही. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की साजिद अक्रम आणि त्याच्या मुलाच्या कट्टरतेमागील कारणांचा भारत किंवा तेलंगणातील कोणत्याही स्थानिक घटकांशी संबंध आढळलेला नाही. या पार्श्वभूमीवर तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, १९९८ मध्ये भारत सोडण्यापूर्वी साजिद अक्रमविरोधात कोणतीही प्रतिकूल नोंद उपलब्ध नाही.
दरम्यान, या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीझ म्हणाले की, बॉन्डी बीचवरील गोळीबारामागे इस्लामिक स्टेटची टोकाची विचारसरणी कारणीभूत असल्याचे दिसून येते.