Photo: X
आंतरराष्ट्रीय

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

चीन बुधवारी आपल्या वाढत्या राजनैतिक आणि लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहे. या वेळी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी संचलनात आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्रीचे प्रथमच अनावरण होणार आहे. या संचलनात २६ परदेशी नेते उपस्थित राहणार आहेत.

Swapnil S

बीजिंग: चीन बुधवारी आपल्या वाढत्या राजनैतिक आणि लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहे. या वेळी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी संचलनात आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्रीचे प्रथमच अनावरण होणार आहे. या संचलनात २६ परदेशी नेते उपस्थित राहणार आहेत.

हे संचलन दुसऱ्या महायुद्धातील जपानी आक्रमणाविरुद्ध चीनच्या विजयाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे.

या संचलनाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, उत्तर कोरियाचे नेता किम जोंग उन, पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुयिझू संचलनात सहभागी होतील.

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन २०१९ नंतर प्रथमच बीजिंगमध्ये आले असून हे त्यांचे चीनमधील दुसरे आगमन आहे. अलीकडील काळात पुतिनसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळे चीनशी मतभेद असल्याच्या चर्चेनंतर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

बीजिंगमध्ये शी जिनपिंग, पुतिन आणि किम जोंग उन यांची एकत्रित उपस्थिती, विशेषतः लष्करी संचलनात, अमेरिकेला आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनकडून दिलेला कडक संदेश मानला जात आहे. ट्रम्प यांनी पूर्वी पुतिन आणि किम दोघांनाही आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला होता. या संचलनात चीन आपली लष्करी ताकद दाखवणार असून चौथ्या पिढीची रणगाडे आणि विमानं, मानवरहित गुप्तचर उपकरणं, प्रगत क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंग प्रणाली यांचे प्रदर्शन होईल. सर्व शस्त्रास्त्रे चीनमध्ये तयार केलेली असून सध्या लष्करात सक्रिय आहेत.

बीजिंगच्या ऐतिहासिक तियानआनमेन चौकात हे संचलन होणार असून अध्यक्ष शी जिनपिंग परेडची मानवंदना स्वीकारतील व भाषण करतील.

ही परेड पीपल्स लिबरेशन आर्मीची सर्वात मोठी परेड मानली जात असून ती चीनच्या धोरणात्मक प्रतिरोधक क्षमतेचे दर्शन घडवेल, असे केंद्रीय लष्करी आयोगाच्या संयुक्त कर्मचारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी वू झेके यांनी सांगितले.

प्रदर्शनातील प्रगत शस्त्रास्त्रे चीनच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षेचे आणि विकासाच्या हिताचे रक्षण करण्याची क्षमता तर दाखवतीलच पण भविष्यातील युद्धे जिंकण्याचीही ताकद असल्याचे सिद्ध करतील, असे ते म्हणाले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश