बीजिंग : चीनचे संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू यांची मंगळवारी अचानक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते सार्वजनिक जीवनात कोठेही दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत गूढ वाढले आहे.
चीनमधील गेल्या काही महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी चीनने परराष्ट्र मंत्री किन गँग यांचीही अशीच हकालपट्टी केली होती. तेही तत्पूर्वी अनेक दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून दिसेनासे झाले होते. संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांनी संरक्षण दलांसाठी शस्त्रसामग्री खरेदी करताना लाच घेतली असे आरोप असून त्याबाबत चौकशी सुरू होती. तेव्हापासून ते जाहीरपणे फारसे कुठे दिसलेले नाहीत. शी जिनपिंग यांनी चीनच्या अध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाल सुरू केल्यापासून अशा घटनांमध्ये भर पडली आहे.