AI Photo
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प सरकारवर मस्क यांचा हल्लाबोल; म्हणाले - हे सहन करू शकत नाही; नवे कर-खर्च विधेयक म्हणजे घृणास्पद कृत्य!

मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या नव्या कर व खर्च विधेयकावर जोरदार हल्लाबोल करताना या विधेयकाचा घृणास्पद कृत्य असा उल्लेख केला असून या विधेयकामुळे खूप तोटा होईल, असे म्हटले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली आहे. मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या नव्या कर व खर्च विधेयकावर जोरदार हल्लाबोल करताना या विधेयकाचा घृणास्पद कृत्य असा उल्लेख केला असून या विधेयकामुळे खूप तोटा होईल, असे ‘एक्स’वर म्हटले आहे.

मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माफ करा, परंतु मी आता हे सहन करू शकत नाही. हे हास्यास्पद, घृणास्पद आणि महागडे विधेयक आहे. ज्या लोकांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे, त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी चूक केली आहे. मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला आहे की, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची तूट २.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल, यामुळे देशावरील कर्ज आणखी वाढेल.

सरकारचे प्रत्युत्तर

दरम्यान, मस्क यांची नाराजी तसेच सरकारच्या कर व खर्च विधेयकावरील टीकेला व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘या विधेयकाबद्दल मस्क काय विचार करतात हे ट्रम्प यांना आधीच माहिती होते. परंतु, मस्क यांच्या टीकेमुळे किंवा अशा निर्णयामुळे ट्रम्प यांचे किंवा प्रशासनाचे मत बदलणार नाही. हे एक मोठे विधेयक आहे, अध्यक्ष या विधेयकावर ठाम आहेत.

मस्क नाराज

अलीकडेच एलॉन मस्क यांनी ‘गव्हर्नमेंट एफिशिएन्सी’ विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. संघीय खर्च कमी करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, मस्क हे सरकारबरोबरच्या वादामुळे या विभागातून बाहेर पडले आहेत आणि आता त्यांनी स्वतःला नव्या वादग्रस्त विधेयकापासून दूर ठेवले आहे. सरकार स्थापनेनंतर अवघ्या चारच महिन्यांत एलॉन मस्क सरकारमधून बाहेर पडले आहेत. अर्थसंकल्पावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार