सेऊल : दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सूक येऊल यांनी देशात ‘मार्शल लॉ’ लागू केल्याबद्दल त्यांच्यावर महाभियोग चालवावा यासाठी विरोधी पक्षांनी बुधवारी नोटीस सादर केली. लोकप्रतिनिधींनी पार्लमेण्टच्या इमारतीच्या भिंतींवर चढून इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि अध्यक्षांचा आदेश रद्द करण्याचा एकमताने निर्णय दिला, त्यानंतर सशस्त्र सैनिकांनी पार्लमेण्टला वेढा घातला. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक योल यांनी मंगळवारी देशात ‘मार्शल लॉ’ लागू केल्याची घोषणा केली. संसदेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे, उत्तर कोरियासोबत सहानभूती ठेवणे आणि देशविरोधी कृत्य करून सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याचे आरोप यून यांनी विरोधकांवर केले. यून यांनी टीव्हीवरून ‘मार्शल लॉ’ची घोषणा केली
यून यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी पार्लमेण्टमधील दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा गरजेचा आहे. त्याचप्रमाणे नऊ सदस्यीय घटनात्मक न्यायालयातील किमान सहा न्यायाधीशांनी त्यावर शिक्कामोर्तब करणे गरजेचे आहे. मुख्य विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांनी संयुक्तपणे महाभियोग दाखल केला असून त्यावर लवकरात लवकर म्हणजे शुक्रवारी मतदान होण्याची शक्यता आहे.
संरक्षणमंत्री किम यांची राजीनाम्याची तयारी
यून यांचे ज्येष्ठ धोरण सल्लागार आणि संरक्षणमंत्री किम योंग ह्यून यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने बुधवारी किम यांच्याविरुद्ध स्वतंत्र महाभियोग दाखल केला आहे. किम यांनी यून यांना ‘मार्शल लॉ’ लागू करण्याचा सल्ला दिला होता.