आंतरराष्ट्रीय

सुदानमध्ये 'ऑपरेशन कावेरी'; भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने, जहाज तैनात

यादवीग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी 'ऑपरेशन कावेरी'ची घोषणा केली

प्रतिनिधी

यादवीग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी 'ऑपरेशन कावेरी'ची घोषणा केली आहे. सुदानमध्ये गेल्या आठवड्यापासून अंतर्गत यादवी माजली असून, तेथील परिस्थिती चिघळत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

'ऑपरेशन कावेरी'ची माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, "सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने आणि जहाज सज्ज ठेवण्यात आली आहेत. ५०० भारतीय सुदान बंदरावर पोहोचले आहेत. अन्य लोक बंदराकडे पोहोचत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' राबवले जात आहे. अमेरिका, इंग्लंड, स्विडन आणि फ्रान्ससह अन्य पाश्चिमात्य देशांनी आपल्या दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मायदेशी परत नेले आहे."

सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी वायुसेनेची दोन सी-१३० विमाने आणि आयएनएस सुमेधा जहाज सौदी अरेबिया आणि सुदानमध्ये पोहोचले आहे. वायुसेनेचे जहाज सौदी अरेबियाच्या हद्दीत तैनात आहे, तर आयएनएसचे सुमेधा जहाज सुदानच्या बंदरावर पोहोचले आहे. विविध देशातील १५० हून अधिक नागरिक शनिवारी सौदी अरेबियात पोहोचले. भारतातील फ्रान्सच्या दूतावासाने ट्विट करत म्हटलं आहे की, काल रात्री दोन लष्करी विमानांनी भारतीय नागरिकांसह २८ देशांतील ३८८ लोकांना बाहेर काढले आहे.

तोडग्याचे आवाहन

अंतर्गत यादवीमुळे तीन हजार भारतीय नागरिक सुदानच्या विविध भागांत अडकले आहेत, तर केरळचे रहिवासी अल्बर्ट ऑगस्टिन यांचा सुदानमधील गोळीबारात मृत्यू झाला आहे. सुदानी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यात अजूनही तोडगा निघण्याचा मार्ग दिसत नाही. यामुळे हे गृहयुद्ध आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. सैन्यदलाचे प्रमुख आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष जनरल अब्देल फत्ताह अल-बुऱ्हान यांनी अल् अरेबिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, सर्व योद्ध्यांनी सुदानी नागरिक म्हणून एकत्र बसायला हवे आणि सुदानची आशा आणि जीवन पुन्हा पल्लवित करण्यासाठी योग्य मार्ग काढला पाहिजे. या युद्धामुळे प्रत्येकाचे नुकसानच होणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत