आंतरराष्ट्रीय

भारतीय खलाशाचा मृत्यू; होर्मुझमध्ये इराणी हल्ल्यात बळी, भारताने केला निषेध

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर सहा भारतीय जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भारताने तीव्र आक्षेप नोंदवला असून, नवी दिल्लीतील इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना समन्स बजावून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

Swapnil S

दुबई : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर सहा भारतीय जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भारताने तीव्र आक्षेप नोंदवला असून, नवी दिल्लीतील इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना समन्स बजावून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत १४ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

भारताने यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ ही त्यांची राष्ट्रीय मालवाहू जहाजे ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना इराणने दोन क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे त्यांना लक्ष्य केले. या दोन्ही जहाजांवर मिळून एकूण ३० भारतीय खलाशी तैनात होते.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘मोम्बासा’ टँकरवर तैनात असलेल्या एका भारतीय खलाशाचा या हल्ल्यात मृत्यू झाला, तर इतर आठ जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे.

आवाहन आणि धिक्कार

पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी हिंसाचार त्वरित थांबवून दोन्ही देशांनी चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन भारताने पुन्हा एकदा केले आहे. खलाशांना लक्ष्य करणाऱ्या आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील सुरक्षित वाहतुकीला बाधा आणणाऱ्या या हल्ल्यांचा आणि हिंसक कृत्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असेही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

युद्धाचा भडका उडण्याची शक्यता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर पुन्हा एकदा नाकेबंदी करण्याची आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून सुरक्षा शुल्क वसूल करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, अमेरिकेने मंगळवारी पहाटे इराणवर मोठे हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या मित्रदेशांवर भीषण हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेच्या लष्करी सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणमधील किनारी संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र व ड्रोन तळ आणि सागरी क्षमतांना लक्ष्य केले आहे. इराणने या हल्ल्यांना दुजोरा दिला असला तरी जीवित किंवा वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्कराने सांगितले की, इराणी सैन्याला त्यांच्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्याची त्यांची क्षमता नष्ट केली जाईल.

ट्रम्प पलटले, टोल रद्द

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर २० टक्के ‘प्रतिपूर्ती शुल्क’ (टोल) आकारण्याचा आपला निर्णय अवघ्या २४ तासांत मागे घेतला आहे. या शुल्काऐवजी आता मध्यपूर्वेतील (आखाती) देश अमेरिकेशी मोठे व्यापारी आणि गुंतवणूक करार करणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर याबद्दल माहिती देताना ट्रम्प म्हणाले, मध्यपूर्वेतील देशांच्या नेतृत्वासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेच्या आधारे, मी जहाजांवर आकारला जाणारा २० टक्के ‘युनायटेड स्टेट्स रिइम्बर्समेंट फी’ (टोल) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, विविध आखाती देश आता अमेरिकेत मोठे व्यापारी करार आणि गुंतवणूक करतील.

अमेरिकेत होणारी ही गुंतवणूक "प्रचंड मोठी" असेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी गेल्या वर्षी केलेल्या मध्यपूर्व दौऱ्यादरम्यान जाहीर केलेल्या करारांपेक्षा हे करार वेगळे किंवा नवीन आहेत का, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

राज्यातील धरणांमध्ये ४४ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी

चेंबूर दुर्घटना प्रकरण : महापौरांनाच अहवाल अमान्य; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा - रितू तावडे

रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा

आजचे राशिभविष्य, १५ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत