जेरुसलेम : गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागावर शनिवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ७१ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले, तर हमासच्या लष्करी कक्षाला लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्याने सांगितले. खान युनुसमध्ये मोहम्मद देइफ याला लक्ष्य करण्यात आले, देइफ हा इस्रायलच्या दक्षिण भागात ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात १२०० जण ठार झाले होते.
इस्रायलने मोस्ट वॉण्टेड लोकांची यादी तयार केली असून त्यामध्ये देइफ हा अग्रस्थानी आहे. इस्रायलने यापूर्वी त्याला अनेकदा लक्ष्य केले होते, मात्र प्रत्येक वेळी तो बचावला होता. हमासचा अन्य एक म्होरक्या राफा सलामा यालाही लक्ष्य करण्यात आले, मात्र या हल्ल्यात देइफ आणि सलामा मारले गेले का, त्याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. इस्रायलच्या हल्ल्यात अन्य २८९ जण जखमी झाले आहेत. नासीर रुग्णालयामध्ये एका संस्थेच्या पत्रकाराला ४० मृतदेह पाहावयास मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.