काठमांडू : नेपाळमध्ये बुधवारी (दि. २६) आलेल्या भीषण महापुरामुळे आतापर्यंत ६२६ जणांचा मृत्यू, तर २ हजारांहून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. रसुवा, नुवाकोट, चितवन, धादिंगसह आठ जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून, नेपाळ लष्कर आणि सुरक्षा दलांकडून शनिवारी (दि. २९) सलग चौथ्या दिवशी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. पुरामुळे घरे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आठ जिल्ह्यांतून ६२६ मृतदेह बाहेर
एनडीआरआरएमएनुसार, चितवनमधून सर्वाधिक २३३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नवलपरासी पूर्वमधून १५८, नुवाकोटमधून ५१, गोरखामधून ४८, नवलपरासी पश्चिममधून ४७, धादिंगमधून ४५, तनहूमधून ३१ आणि रसुवामधून १३ मृतदेह सापडले आहेत.
बुधवारी रसुवा आणि मध्य नेपाळच्या विविध भागांत आलेल्या अचानक पुरामुळे वस्त्या, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
बचावकार्य चौथ्या दिवशीही सुरू
महापुरानंतर सलग चौथ्या दिवशी शनिवारीही बचाव आणि मदतकार्य सुरू होते. नेपाळमधील सुरक्षा दलांनी ४,४०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, दुर्गम भागांमध्ये अद्याप अनेक नागरिक अडकले असून, २,४२६ जण बेपत्ता असल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
पुराचा धोका कायम असल्याने नदीकाठच्या आणि बाधित भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मृतदेहांची ओळख पटवणेही आव्हानात्मक
भोटेकोशीच्या पुरात वाहून गेलेले मृतदेह नदीच्या खालच्या प्रवाहातील चितवन, तनहू, नवलपरासी आणि इतर भागांत सापडत आहेत. त्यामुळे रुग्णालयांच्या शवागारांवर मोठा ताण आला आहे.
नेपाळमधील शवागारांची मर्यादित क्षमता लक्षात घेता मृतदेह ठेवण्यासाठी तात्पुरत्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नदीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची स्वच्छता करून फोटो घेतले जात आहेत. त्यानंतर मृतदेह बॅगमध्ये ठेवून टॅग लावण्यात येत आहे. बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक आल्यानंतर फोटोंच्या आधारे ओळख पटवण्याची प्रक्रिया केली जात आहे.
महाराष्ट्रातील १०० भाविकांना बिहार सरकारची मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १०० भाविकांना बिहार सरकारने सुरक्षित बाहेर काढले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर बिहार प्रशासनाने या भाविकांना नेपाळ सीमेवरून सुरक्षितपणे सीतामढी येथे आणले. त्यानंतर त्यांना रेल्वेने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आले.
खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र
नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या बचाव आणि स्थलांतर वेगाने करण्याची मागणी केली आहे. नेपाळ सरकारशी समन्वय साधून पूरग्रस्तांना मदत, अन्न, औषधे आणि निवारा उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
भारताकडून विशेष तांत्रिक मदत
नेपाळने परदेशी मदतीबाबत भूमिका स्पष्ट करताना मोठ्या प्रमाणावर सर्वसाधारण शोध-बचाव पथकांपेक्षा विशेष तांत्रिक मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे. बोगदा बचाव, पायाभूत सुविधा पूर्ववत करणे आणि मृतदेहांची ओळख पटवणे यांसारख्या कामांसाठी तज्ज्ञ मदतीची आवश्यकता असल्याचे नेपाळकडून सांगण्यात आले आहे.
भारताने बचाव व मदतकार्यासाठी तांत्रिक पथके, वैद्यकीय मदत, उपकरणे आणि बेली पूल उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. भारताकडून नेपाळला मदत सामग्रीही पाठवण्यात आली आहे. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनीही भारताच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
बचावकार्याला हवामानाचाही अडथळा
महापुरानंतर अनेक भागांत रस्ते आणि पूल वाहून गेल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. खराब हवामान, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि चिखलामुळे काही भागांपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर आणि इतर माध्यमांतून बचावकार्य सुरू आहे.
मृत आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता
बचावकार्य आणि मृतदेह शोधण्याची मोहीम अद्याप सुरू आहे. त्यामुळे मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या आकडेवारीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या भीषण आपत्तीनंतर नेपाळसमोर बचावकार्याबरोबरच पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी आणि हजारो बाधितांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.