काबूल : पाकिस्तान सीमेजवळ शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत अफगाण सैन्याने ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले, असा दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकने काबूलवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे. तर आम्ही अफगाण चौक्या व पोस्टवर अचूक हल्ले करून २०० तालिबानी जवानांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, अफगाण सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या २५ सैनिकी चौक्यांवर कब्जा मिळवला आहे. या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून ३० जण जखमी झाले आहेत.
अफगाण संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आमचे ऑपरेशन मध्यरात्री संपले. पाकिस्तानने पुन्हा अफगाण सीमारेषेचे उल्लंघन केल्यास, आमचे सैन्य देशाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
अफगाण अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर राजधानी काबूल आणि देशाच्या पूर्व भागातील एका बाजारावर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप केला होता. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
‘इसिस’च्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप
तालिबानने पाकिस्तानवर आरोप केला की, तो आपल्या भूमीवर ‘इसिस’च्या दहशतवाद्यांना आसरा देत आहे. या दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानसह संपूर्ण जगासाठी धोका असल्याचे सांगत त्यांना पाकिस्तानमधून बाहेर काढावे किंवा अफगाणिस्तानकडे सोपवावे, अशी मागणी तालिबानने केली.
तालिबानी प्रवक्त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानने देशातील अस्थिरता पसरवणारे सर्व घटक नष्ट केले होते, परंतु आता त्यांच्या नव्या तळांची निर्मिती पाकिस्तानातील खैबर-पख्तुनख्वा भागात करण्यात आली आहे. या तळांवर कराची आणि इस्लामाबाद येथून नव्या लढवय्यांना आणले जाते आणि त्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी दावा केला की, इराण आणि रशियातील हल्ल्यांची योजनादेखील या पाकिस्तानी तळांवरून आखली गेली होती.
सौदी, कतारच्या मध्यस्थीनंतर मोहीम स्थगित
अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, सौदी, कतारच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तानविरोधातील कारवाई शनिवारी रात्री १२ वाजता स्थगित केली आहे. अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. अवैध कारवायांना मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध केला आहे.
पाकिस्तानने दावा केला की, पाक सैन्याने २०० हून अधिक तालिबानी जवानांना ठार केले, तर या कारवाईत २३ पाक सैनिक ठार झाले. मात्र, अफगाणिस्तानने पाकचे ५८ सैनिक मारल्याचा दावा केला. तसेच २५ पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचे सांगितले.
अफगाणिस्तानचा ६ ठिकाणांहून हल्ले
रेडिओ पाकिस्तानच्या माहितीनुसार, अफगाण हल्ले सीमेजवळील सहा भागांत झाले. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्यानेही प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. लढाईदरम्यान पाकिस्तानी सैन्याने तीन अफगाण ड्रोन पाडले, ज्यांच्यात बॉम्ब असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आम्हाला शांतता हवी, गरज पडल्यास पर्याय खुले - मुताक्की
भारताच्या दौऱ्यावर असलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताक्की म्हणाले की, अफगाणिस्तानला शांतता हवी आहे. आमचे दरवाजे चर्चेसाठी खुले आहेत. आम्ही आमच्या देशात शांतता आणली आहे. मात्र, शांततेचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यास आमच्याकडे अन्य पर्याय शिल्लक आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
दुसऱ्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना आमंत्रण
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताक्की यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी त्यांनी महिला पत्रकारांना आमंत्रित केले होते. यावेळी खुलासा करताना मुत्ताक्की म्हणाले की, तो एक तांत्रिक मुद्दा होता. आमच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांची एक मर्यादित यादी तयार केली होती, ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आले. त्यामागे इतर कोणताही हेतू नव्हता. ही पत्रकार परिषद अतिशय अल्पावधीत बोलावली होती आणि त्यामुळे फक्त निवडक पत्रकारांनाच आमंत्रित करण्यात आले. हा पूर्णपणे प्रशासकीय निर्णय होता, त्यात कोणताही भेदभाव करण्याचा उद्देश नव्हता, असे ते म्हणाले.
पाकिस्तानची फुशारकी ‘भारतासारखेच उत्तर देऊ’
पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, अफगाणिस्तानलाही भारतासारखेच प्रत्युत्तर दिले जाईल, जेणेकरून तो पाकिस्तानकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही. अलीकडच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान गप्प बसणार नाही, ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’, असा इशारा पाक गृह खात्याने दिला आहे.