येत्या पाच वर्षांत उष्णतेचे सर्व रेकॉर्ड निघणार मोडीत; संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा  
आंतरराष्ट्रीय

येत्या पाच वर्षांत उष्णतेचे सर्व रेकॉर्ड निघणार मोडीत; संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा

सध्या जाणवणारा उन्हाचा चटका हा केवळ एक ट्रेलर असू शकतो, कारण पुढील पाच वर्षांत पृथ्वीवरील उष्णतेचा पारा भयानक पातळी गाठणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील ५ वर्षांत जागतिक तापमानाची पातळी ‘सुरक्षित मर्यादा’ ओलांडून पुढे जाईल आणि या काळात आतापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील.

Swapnil S

वॉशिंग्टन : सध्या जाणवणारा उन्हाचा चटका हा केवळ एक ट्रेलर असू शकतो, कारण पुढील पाच वर्षांत पृथ्वीवरील उष्णतेचा पारा भयानक पातळी गाठणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील ५ वर्षांत जागतिक तापमानाची पातळी ‘सुरक्षित मर्यादा’ ओलांडून पुढे जाईल आणि या काळात आतापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील.

जागतिक हवामानशास्त्र संघटना आणि ब्रिटनच्या हवामान कार्यालयाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ ते २०३० या कालावधीत जागतिक सरासरी तापमान औद्योगिकपूर्व काळाच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसने (२.७ अंश फॅरेनहाइट) वाढण्याची तब्बल ७५ टक्के शक्यता आहे. २०१५ च्या पॅरिस हवामान करारात जागतिक तापमानवाढीची हीच अंतिम सुरक्षित मर्यादा (२० वर्षांच्या सरासरीवर आधारित) निश्चित करण्यात आली होती.

संपूर्ण वर्षभर १.५ अंशांपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अर्थ असा आहे की, आपल्याला अशा टोकाच्या हवामानाचा सामना करावा लागेल ज्याचा अनुभव मानवाने यापूर्वी कधीही घेतलेला नाही. आपली शहरे, नियोजन आणि शेती यापैकी काहीही अशा परिस्थितीसाठी तयार नाही. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतील, अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडतील आणि जंगलातील वणवे अधिक तीव्र होतील.

आर्क्टिक क्षेत्रात उष्णतेचा हाहाकार

उत्तर ध्रुवावरील बर्फ आणि बर्फाच्छादित प्रदेश वेगाने वितळत असल्याने तेथे ‘दुष्टचक्र’ सुरू झाले आहे. बर्फ नसल्यामुळे सूर्याची किरणे अंतराळात परावर्तित होण्याऐवजी पृथ्वीद्वारे शोषली जात आहेत. यामुळे आर्क्टिक क्षेत्रातील तापमान उर्वरित जगाच्या तुलनेत ३.५ पटीने वेगाने वाढत आहे. पुढील पाच वर्षांत आर्क्टिकमधील हिवाळी तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा ५.१ अंश फॅरेनहाइटने (२.८ अंश सेल्सिअस) वाढण्याचा अंदाज आहे.

वणव्यांचा धोका वाढला

हा अहवाल जगाचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या ‘ॲमेझॉन’च्या जंगलासाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात तापमान वाढून अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे तेथील जंगलात भीषण वणवे लागण्याचा धोका आहे. जी ॲमेझॉनची जंगले आज हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून पृथ्वीचे रक्षण करतात, तीच जंगले भविष्यात कार्बन उत्सर्जित करून संकट वाढवू शकतात. दुसरीकडे, आफ्रिकेच्या दुष्काळी साहिल भागात मात्र नेहमीपेक्षा जास्त पाऊस होऊन पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

२०२७ ला उन्हाळा वाढणार

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या नैसर्गिक उष्णतेमुळे निर्माण होणारी ‘एल निनो’ ही स्थिती २०२८ पर्यंत कायम राहू शकते. यामुळे २०२७ हे वर्ष २०२४ पेक्षाही अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. जर पुढील पाच वर्षांची सरासरी १.५ अंशांपेक्षा जास्त राहिली, तर याचा अर्थ गेल्या एका दशकात पृथ्वीचे तापमान ०.२५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, जो तापमानवाढीचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान दर असेल.

ओला, उबरना परवाने बंधनकारक; महाराष्ट्राचे नवे ॲग्रिगेटर धोरण लागू, रिक्षा-टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅज बंधनकारक

Mumbai : ‘पारसी डेअरी’चा परवाना निलंबित; अन्न सुरक्षा उल्लंघनामुळे FDA ची कारवाई

कर्जत-लोणावळा आणखी एक मार्गिका पूर्ववत; अनेक गाड्या मूळ मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार, प्रवाशांना दिलासा

Mumbai : महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखा अचानक बंद; हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, तातडीने शासकीय हस्तक्षेपाची मागणी

Satara : फलटणमध्ये दूध संकलनात २७ हजार लिटरची घट; दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश, FDA च्या कारवाईनंतर संकलकांचा हात आखडता