स्वयंपाकात फोडणीसाठी कढीपत्त्याचा वापर आवर्जून केला जातो. डाळ, आमटी, भाजी किंवा चटणी अशा अनेक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कढीपत्ता महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेकजण बाजारातून कढीपत्त्याची जुडी आणून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, काही दिवसांतच त्याची पानं काळी पडू लागतात किंवा खराब होतात. अशावेळी कढीपत्ता फेकून द्यावा लागतो. पण काही सोप्या पद्धतींचा वापर केल्यास कढीपत्ता अधिक काळ ताजा आणि वापरण्यायोग्य ठेवता येऊ शकतो. जाणून घेऊया कढीपत्ता साठवण्याच्या दोन सोप्या ट्रिक्स.
कढीपत्ता फ्रिजमध्ये काळा का पडतो?
कढीपत्ता लवकर खराब होण्यामागे पानांमध्ये राहणारा अतिरिक्त ओलावा हे एक प्रमुख कारण आहे. कढीपत्ता धुतल्यानंतर तो पूर्णपणे न वाळवता डब्यात किंवा पिशवीत ठेवल्यास पानांवर ओलावा साचतो. त्यामुळे काही दिवसांत पानांवर काळे डाग पडू शकतात आणि ती खराब होऊ लागतात. याशिवाय फ्रिजमधील तापमानात वारंवार होणारे बदलही पानं खराब होण्याची प्रक्रिया वेगवान करू शकतात. त्यामुळे कढीपत्ता साठवण्यापूर्वी त्यातील अतिरिक्त ओलावा काढून टाकणे महत्त्वाचे आहे.
पहिली ट्रिक : कढीपत्ता हलका कुरकुरीत करून ठेवा
कढीपत्ता अधिक काळ वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी तो हलका कुरकुरीत करून साठवण्याची पद्धत वापरता येते.
सर्वप्रथम कढीपत्त्याची पानं देठापासून वेगळी करून स्वच्छ धुवा.
त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने किंवा किचन टॉवेलने पानं पूर्णपणे कोरडी करा.
एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्हमध्ये एक ते दोन मिनिटे पानं हलकी कुरकुरीत होईपर्यंत ठेवा. ही उपकरणं नसल्यास नॉन-स्टिक पॅनवरही मंद आचेवर हलकी गरम करू शकता.
एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्हमध्ये कढीपत्ता गरम करताना तो पूर्णपणे वाळवून कुरकुरीत होण्याऐवजी हलकाच गरम करावा, अन्यथा पानं जळू शकतात.
पानं पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
या पद्धतीमुळे पानांमधील अतिरिक्त ओलावा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कढीपत्ता अधिक काळ वापरण्यायोग्य राहू शकतो.
दुसरी ट्रिक : कढीपत्त्याचे बर्फाचे क्यूब्स बनवा
कढीपत्ता अनेक आठवडे किंवा काही महिने साठवून ठेवायचा असेल, तर फ्रीजरमध्ये बर्फाच्या क्यूब्सच्या स्वरूपात ठेवण्याचा पर्याय वापरता येतो.
कढीपत्त्याची पानं देठापासून वेगळी करून स्वच्छ धुवा.
पानांवरील पाणी पूर्णपणे पुसून ती कोरडी करा.
आईस क्यूब ट्रेमधील प्रत्येक कप्प्यात काही पानं ठेवा.
त्यात पाणी घालून पानं पूर्णपणे बुडतील याची काळजी घ्या.
ट्रे फ्रीजरमध्ये ठेवून पाणी पूर्णपणे गोठू द्या.
बर्फाचे क्यूब्स तयार झाल्यानंतर ते झिप-लॉक पिशवीत भरून फ्रीजरमध्ये ठेवा.
जेव्हा स्वयंपाकात कढीपत्ता वापरायचा असेल, तेव्हा आवश्यकतेनुसार एक क्यूब बाहेर काढा. कोमट पाण्यात तो विरघळवून पानं वापरता येतील.
कढीपत्ता साठवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
कढीपत्ता जास्त काळ ताजा ठेवण्यासाठी काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पानं धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी झाल्याची खात्री करा. साठवणुकीसाठी हवाबंद डब्याचा वापर करा. यामुळे फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास कढीपत्त्याला लागण्यापासूनही बचाव होतो. तसेच पानं ओलसर अवस्थेत साठवणे टाळा.
या सोप्या पद्धती वापरल्यास कढीपत्ता वारंवार बाजारातून आणण्याची गरज कमी होऊ शकते आणि स्वयंपाकासाठी तो अधिक काळ वापरण्यायोग्य ठेवता येऊ शकतो.